आज डॉ. उत्तम पाचरणे यांचे स्वप्न अधुरंच राहिलं. दि. २५ डिसेंबरला पहाटे त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकलं आणि धक्का बसला. ते ललित कला अकादमीचे अध्यक्ष झाल्यानंतर जे. जे. आणि ललित कला अकादमी यांच्या संयुक्त सहयोगातून त्यांनी एक महिन्याचा मोठा उपक्रम महाराष्ट्रात साजरा केला होता. संपूर्ण भारतातून अनेक द़ृश्यकलाकारांनी (ज्ञात-अज्ञात) त्यांनी या सोहळ्यात सहभागी करून घेतले होते. मार्च २०१८चा तो काळ होता. माझ्या नियमित स्तंभासाठी त्यांची भेट घेण्याचा योग आला होता. अलीकडच्या पाच वर्षांच्या सहवासात त्यांचं आभाळाएवढं कला योगदान जवळून पाहण्याचं भाग्य मला लाभलं. यातून बसलेला ‘हा’ धक्का पचवणं, सहन करणं जड जातं आहे. मग गेली अनेक वर्षे त्यांच्या बरोबर कलाकार्य करणार्यांना किती मोठा धक्का बसला असेल, याची कल्पानाही करणं मुश्किल आहे.
डिसेंबर महिन्याची २० तारीख होती. सकाळीच डॉ. पाचरणे सरांचा फोन आला. ”शेपाळ सर, मी विजयच्या (ज्येष्ठ अॅनिमेटर, दृश्यकलाकार विजय राऊत, अमरावती) मुलीच्या लग्नाला अक्षता टाकून आलो की, आपण राजभवनला जाऊन संबंधित अधिकार्यांना भेटून येऊ. आझादीच्या ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राकडून महाराष्ट्रातील दृश्यकलाकारांकडून देशाप्रति अनोख्या भावना आपल्याला व्यक्त करायच्या आहेत. मला गेल्या तीन-चार दिवसांपासून जरा मानसिक आणि डोके दुखण्याचा त्रास होतो आहे. अस्वस्थता येते मधूनच. तुम्हाला सर्व जबाबदारी घ्यावी लागेल. पण, आपण दि. २६ डिसेंबरला राजभवनला जायचं आहे, एवढं डोक्यात ठेवा.” मी त्यांना म्हणालो की, ”तुम्ही असे निर्वाणीचं का बोलताय, आपण जाऊ. बोलू, दि. २२ ऑगस्टला मा. राज्यपाल महोदयांनीच तुमच्या प्रस्तावाला सादर करण्यास सांगून, सदर कॅम्प होण्याचे आश्वासन दिले आहे.“ म्हणाले की, “सर, जरा काहीतरी शरीराची गडबड वाटतेय. माहीत नाही, भविष्यात काय होईल ते!“
फारच कठीण जातंय, डॉ. पाचरणे सरांच्या आठवणीवर ‘मृत्युलेख’ लिहिण्याची वेळ येईल! दि. १९ ऑगस्ट २०२३ या ’रंगसभा’च्या व्यासपीठावर मा. राज्यपाल महोदय यांच्या एका बाजूस ललित कला अकादमी, नवी दिल्लीचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ शिल्पकार डॉ. उत्तम पाचरणे प्रमुख पाहुणे म्हणून बसावेत. त्या माझ्या इच्छेनुसार ते व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रम ’रंगसभा’ या ४०० पृष्ठांच्या १०० लेखांच्या रंगीत ग्रंथाच्या प्रकाशनाचा होता. दै. ’मुंबई तरुण भारत’च्या ’विविधा’ सदरामध्ये गेली अनेक वर्षं लेख प्रकाशित होत असत, यापैकी अलीकडच्या २०१८ नंतरच्या निवडक १०० लेखांचा ’रंगसभा.’ मात्र, सतत मनात ध्यास आणि उरी स्वप्न बाळगणारे डॉ. पाचरणे सर म्हणाले की, “महाराष्ट्रासाठी ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र व्हावे.” ज्यासाठी अग्रभागी सक्रिय असलेले ते स्वतः आणि त्यांचे समकालीन सहकारी अनेक वर्षांपासून प्रयत्न करूनही काम पुढे हलत नव्हते.
कार्यक्रमाला उत्तर देताना मा. राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणाची सुरुवातच फार आनंददायक केली. वस्तुस्थिती आणि सूक्ष्म निरीक्षणांनी ओतप्रोत अशी ती सुरुवात होती. ते म्हणाले की, “मुझे, सर जे. जे. स्कूल में आने की बहुत साल से इच्छा थी। लगा सब कलाकार बहुत आनंद लेके उनकी कलाकृतीया बनाते होंगे। लेकीन यहाँ आके महसूस हुआ... यहा सब दुःख फैला हुआ हैं। मेरे कार्यकाल में, में डॉ. पाचरणेजी को को आश्वासित करता हूँ की, महाराष्ट्र के लिए हम ललित कला अकादमी का विभागीय केंद्र बहुत जल्दी शुरू करेंगे।“ यावर दुसर्या दिवशीच्या बव्हंशी वृत्तपत्रात ’हीच’ मुख्य शीर्षक असलेली बातमी होती.
आज डॉ. उत्तम पाचरणे यांचे स्वप्न अधुरंच राहिलं. दि. २५ डिसेंबरला पहाटे त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकलं आणि धक्का बसला. ते ललित कला अकादमीचे अध्यक्ष झाल्यानंतर जे. जे. आणि ललित कला अकादमी यांच्या संयुक्त सहयोगातून त्यांनी एक महिन्याचा मोठा उपक्रम महाराष्ट्रात साजरा केला होता. संपूर्ण भारतातून अनेक द़ृश्यकलाकारांनी (ज्ञात-अज्ञात) त्यांनी या सोहळ्यात सहभागी करून घेतले होते. मार्च २०१८चा तो काळ होता. माझ्या नियमित स्तंभासाठी त्यांची भेट घेण्याचा योग आला होता. अलीकडच्या पाच वर्षांच्या सहवासात त्यांचं आभाळाएवढं कला योगदान जवळून पाहण्याचं भाग्य मला लाभलं. यातून बसलेला ’हा’ धक्का पचवणं, सहन करणं जड जातं आहे. मग गेली अनेक वर्षे त्यांच्या बरोबर कलाकार्य करणार्यांना किती मोठा धक्का बसला असेल, याची कल्पानाही करणं मुश्किल आहे.
डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहात ते जेजेत खास भेटायला म्हणून आले. माझ्याकडे मी, माझ्या सहाध्यायी राधिका, नीता मॅडम, राहुल, हेमंत आणि विश्वदीप सर यांना बोलावून घेतले. त्या दिवशी आणखी एक दुग्धशर्करा योग. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक यमाजी मालकर मला खास भेटायला आलेले होते. डॉ. पाचरणे सर हे कधी उन्हा-पावसाच्या गप्पा करताना दिसले नाहीत. आमच्याकडील प्रयोगशील चित्रकर्ती असलेल्या राधिका मॅडम यांनी त्यांना एक त्यांचं पेटिंग दाखवलं...
त्यावर डॉ. पाचरणे यांचे दृश्यकलाविषयक विचार ऐकायला मिळाले. सारं जग फिरून कला कॅम्प, कार्यशाळा, सेमिनार्स, प्रदर्शनांची आयोजने आणि उद्घाटने करून आलेला महाराष्ट्राचा हा शिल्पसुपुत्र आमच्या प्रयोगशील उमद्या सहकार्यांना अनुभवायला, ऐकायला मिळत होता. म्हणाले, “दृश्यकलाकाराची कलाकृती हा त्याचा विचार असतो, व्यक्त होणारा विचार. हा अनेक मंथनांतून एका विशिष्ट स्थितीला आलेला असतो. मग तो विचार गायकांच्या सुरावटीतून व्यक्त होतो, तर द़ृश्यकलाकाराच्या रंग-कुंचल्याच्या सोलो सादरीकरणातून अन् छन्नी-हातोड्याच्या न्यासातून व्यक्त होत असतो. कलाकृती ही नैसर्गिकरित्या व्यक्त झाली, तर कला रसिकाच्या मनाचा ठाव घेते. कृत्रिम किंवा व्यवहारी भावनेतून तयार झालेली कलाकृती नसते. मला वाटते, तो एक रंगांनी भरवलेला कॅनव्हास असतो किंवा काही तरी आकार दिलेला धातू किंवा दगड असतो. तुम्ही सारे या क्षेत्रात पाय रोवत आहात. विद्यार्थ्यांना घडवता-घडवता स्वतःही घडायचं असतं. ही कलाकृती त्याचाच एक स्वयंभु भाग आहे. ही तर सुरुवात आहे, अजून तुम्हाला खूप पुढे जायचं आहे.” ही सारी अनुभवातून आलेली शब्दसुमनांची अनुभूती एखाद्या सुगंधी फुलांनी सुशोभीत केलेल्या पुष्पगुच्छासारखी होती. आज माझा हा सारा स्टाफ मानसिक धक्क्यात आहे. डॉ. पाचरणे सर केवळ ६७व्या वर्षी कलाक्षेत्राला पारखं करून जातील, हे कुणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं.
काल अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी मालाड-कांदिवलीला गेलो. तेव्हा अनेक बैठकांची आवर्तने डोळ्यासमोरून जात होती. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृश्यकलाकारांसाठी त्यांच्या डोक्यात सतत आणि सातत्याने विचारचक्र सुरू राहायचे. त्यांचा पार्थिव चेहरा पाहिला, स्वतःला सावरू शकत नव्हतो. स्वप्न अधुरं राहिलेली, भावना तशीच चेहर्यावर दिसत होती. त्यांच्या अत्यंत जवळचे अनुभवी शिल्पकार विक्रांत मांजरेकर आवश्यक धावपळ करीत होते. आम्ही नजरेनेच भावना व्यक्त केल्या. जवळ-जवळ सर्वच स्तरांतील सर्वच वयोगटांतील लोक तिथे उपस्थित होते.
‘रंगसभा’मधील पहिलाच लेख हा डॉ. उत्तम पाचरणे यांच्या कलाविषयक योगदानाचा संक्षेपाने घेतलेला आढावा, या आशयाचा आहे. त्या लेखात, उत्तरार्धात डॉ. पाचरणे यांच्यासारख्या व्यक्तीची, सहृदयी माणसाची आणि सामाजिक बांधिलकी जपणार्या शिल्पकाराची सरकारने दखल घ्यावी, ’पद्म’ पुरस्काराने सन्मान व्हावा, असं हे व्यक्तिमत्त्व!
विवेकातच आनंद मानणार्या आणि घेणार्या डॉ. पाचरणे यांची कला बहरली, ती बोरिवलीच्या एका पथमार्गावरच. तत्कालीन आमदार आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या कलासक्त आणि रसग्रहणशील नजरेने शिल्पकार पाचरणे यांच्या कलासृजनाला हेरले. स्वामी विवेकानंदांची मूर्ती पाचरणे सरांनी त्यांना मागणीनुसार बनवून दिली. बोरिवलीचा स्वामी विवेकानंद मार्ग जेथून सुरू होतो, तेथेच त्यांनी साकारलेला स्वामी विवेकानंद यांचा पुतळा आरूढ आहे. पुढे पाचरणे यांची शिल्पकला बहरतच गेली. ज्येष्ठ समाजव्रती एस. एम. जोशी यांचा रत्नागिरी येथील पूर्णाकृती पुतळाही शिल्पकार पाचरणे यांच्याच प्रतिभेतून साकारलेला आहे. सोज्ज्वळ, सात्विक आणि स्मितहास्याचा एस. एम. जोशी यांचा चेहरा त्याच भावाने साकारण्याचं अचूक काम डॉ. पाचरणेच करू जाणे. चौंढीला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची अतिभव्य मूर्ती शिल्पकार पाचरणे यांनीच साकारलेली आहे. बोरिवली परिसरातील पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा उभा, पूर्णाकृती पुतळा त्या उद्यानाची शोभा वाढवत आहे. त्यांची अनेक ’साधनाकामे’ अनेक ठिकाणी आहेत.
ते नेहमी म्हणायचे की, “पुतळा बसविणारे त्यांचं स्वतःचं पाहतात, तो पुतळा निर्माण करणार्या शिल्पकारांस किती प्रसंगांना, अडथळ्यांना सामोरं जावं लागतं, या प्रश्नांकडे त्याचे ’कथित दाते’ फारसे गांभीर्याने पाहत नाहीत, याचं दुःख आहे. मीच नव्हे जवळ-जवळ प्रत्येक शिल्पकाराच्या वाट्याला ही वेदना येतेच. मग महाराष्ट्राच्या-भारताच्या शिल्पकारांनी म्हणजे ’शिल्पकार’ हे विशेेषण वापरणार्यांनी खर्या शिल्पकारांना ती-ती शिल्पे घडवताना आवश्यक रसद, आवश्यक निधी वा खर्च द्यायला विलंब का लावावा? याचं गणित काही सुटत नाही.” फार उद्विग्नावस्थेत ते बोलत होते. याच उद्विग्नतेचा एक भाग म्हणजे, एका १५ फुटी पूर्णाकृती पुतळ्याच्या निर्माणासाठीचा त्यांना भोगावा लागलेला अनुभव ते सांगत होते. वाईट वाटलं ऐकून. त्यासाठी आवश्यक असलेलं, कला संचालनालयाचं मान्यतेचं पत्र खास लक्ष घालून, उपसंचालक विनोद दांडगे यांनी माझ्याकडे पाठवून, त्यांना पोहोचविण्यासाठी दिलेलं होतं. स्व. गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं काम पाचरणे सर करणार होते. तेही काम आता अपूर्णच राहिलं!
शिल्पकार किंवा चित्रकारांच्या वेदनाच शिल्लक राहतात, असंच आजचं निरीक्षण आहे. पूर्वीच्या अनेक चित्र व शिल्पकारांना खास भेटण्यासाठी वेळ काढून अनेक दिग्गज नेते आणि राजकारणी भेटण्यास जात असत. अभिजात कला जिथे श्रवत असते, तिथे जातिवंत-प्रज्ञावंत-अभ्यासू-जिज्ञासू आणि समाजभिमुख दिग्गज सन्मानाने आणि आत्मीयतेने जात असत.
ज्यांच्या नावातच ‘उत्तम’ आहे, अशा ज्येष्ठ शिल्पकार आणि महाराष्ट्राच्या अन् भारताच्या दृश्यकला क्षेत्राचा ‘आयकॉन’ ठरलेल्या, डॉ. उत्तम पाचरणे यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यास त्यांचे आणि त्यांच्या कलासाधनेवर प्रेम करणारे त्यांचे स्नेही, कलाकार आणि कलारसिक आले होते. कुठेतरी काहीतरी अपूर्णतेचा, राहून गेल्याचा भास आणि खंत वाटत होती.
खरं तर, महाराष्ट्राचे विभागीय ललित कला केंद्र स्थापन होणं आणि राजभवन कला कॅम्पचं आयोजन ही त्यांची दोन्ही स्वप्नं पूर्ण करता आली, तरी त्यांना खर्या अर्थाने ‘श्रद्धांजली’ दिली, असं म्हणण्यास जागा राहील; अन्यथा दृश्यकलाकारांप्रति कणभर तरी जागा शिल्लक आहे का? असे म्हणायची वेळ येईल. डॉ. पाचरणे सरांना या लेखाद्वारे विन्रम अभिवादन!
प्रा. डॉ. गजानन शेपाळ
८१०८०४०२१३