आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात चापेकर बंधू यांचे नाव अमर झाले आहे. क्रांतिकार्यात सहभागी झालेले, एकाच घरातील तीन बंधू फासावर लटकावले जाण्याचे हे एकमेव उदाहरण असावे. त्यांच्या असीम त्यागाची आणि असामान्य धाडसाची कहाणी सांगणारी पुस्तके म्हणजे ’कंठस्नान आणि बलिदान’ (लेखक-वि. श्री. जोशी) आणि ’चापेकर पर्व’ (सच्चिदानंद शेवडे). याशिवाय वि. श्री. जोशी यांच्या ‘मृत्युंजयांचा आत्मयज्ञ‘ या पुस्तकातही जोशी यांनी या वीरांबाबत एक दीर्घ प्रकरण लिहिले आहे.
दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या नावाचे हे तीन बंधू लहानपणापासून बंडखोर वृत्तीचे होते. कडवे धर्माभिमानी होते. उत्तम व्यायाम करून त्यांनी आपले शरीर बलदंड केले होते. त्यांना सैन्यात भरती होण्याची इच्छा होती; पण तसे होऊ शकले नाही. इंग्रजांचे अवतीभोवती चाललेले अत्याचार पाहून, ते पेटून उठत होते. वासुदेव बळवंत फडके यांचा इंग्रजांच्या तुरुंगात १८८३ मध्ये झालेला मृत्यू त्यांना अस्वस्थ करून गेला होता. या सगळ्या परिस्थितीमुळे ते पक्के इंग्रजविरोधी बनले.
१८७२ मध्ये मुंबईत व्हिक्टोरिया राणीचा एक भव्य पुतळा बसवलेला होता. ऐटीत बसलेली ही राणी दामोदर आणि बाळकृष्ण यांना सहन झाली नाही. १८९६ सालच्या ऑक्टोबर महिन्यात १६ तारखेला उत्तररात्री हे बंधू गुप्तपणे या पुतळ्याजवळ पोहोचले. सोबत आणलेला डांबर-डबा त्यांनी राणीच्या मस्तकावर रिकामा केला आणि तिला जोड्याची माळ घालून पसार झाले. दुसर्या दिवशी ही घटना दिसताच, साहजिकपणे सगळीकडे अभूतपूर्व खळबळ माजली. पोलिसांनी माळ तर लगेच काढून टाकली; पण डांबर निघता निघेना. या घटनेपासून अनेक तरुणांनी स्फूर्ती घेतली. नागपूर आणि प्रयागराज (तेव्हाचे नाव अलाहाबाद) येथेदेखील राणीच्या पुतळ्याला डांबर फासण्यात आले. १९४२ सालच्या आंदोलनात तर कोणीतरी या राणीचे (म्हणजे जणू काही इंग्रजांचेच) नाकच कापले.
एक ख्रिस्ती धर्मप्रसारक सक्तीने धर्मांतर घडवून आणतो, असे चापेकर बंधूंना कळल्यावर, त्यांनी त्याला चांगला चोप दिला. एकदा पुण्यात एका इंग्रजाने जत्रा भरवली आणि अव्वाच्या सव्वा तिकिटे लावली. या दोघांनी त्याचा मंडपच जाळून टाकला. त्यांच्या अशा अनेक कारवाया चालू असत. कुठलाही छोटासादेखील अन्याय ते सहन करत नसत.
अशातच एक नवीन संकट उद्भवले. पुण्यात प्लेगचा उद्रेक झाला. माणसे पटापट मरू लागली. या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी इंग्रज सरकारने रॅण्ड नावाच्या अधिकार्याची नियुक्ती केली आणि पुणेकर आगीतून फुफाट्यात सापडले. या अधिकार्याचे शिपाई वेळीअवेळी पुणेकरांचे दरवाजे ठोठावू लागले. बूट घालून देवघरात, स्वयंपाकघरात जाऊन लोकांना खेचून बाहेर आणू लागले आणि त्याची तपासणी करू लागले. या शिपायांनी महिलांचे विनयभंग केले, घराबाहेर पुरुषांना नागवे करून त्यांची तपासणी करायला सुरुवात केली. घरातील चीजवस्तू गायब होऊ लागल्या. नागरिकांना जबरदस्तीने प्लेग छावणीत दाखल करण्यात येऊ लागले. साहजिकपणे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती; पण ते हतबल झाले होते. आधीच रोगाची भीती आणि त्यात ब्रिटिशांचे हे अत्याचार. दामोदर आणि बाळकृष्ण या दोघांनी रॅण्डला धडा शिकवायचे ठरवले. शस्त्रे मिळवली. ती कशी चालवायची याचा सराव केला. ते रयांडच्या मागावर राहिले आणि अखेरीस दि. २२ जून १८९७ या दिवशी पुण्यात गणेशखिंड परिसरात त्यांनी त्याला आणि आणखी एका अधिकार्याला गोळ्या घातल्या.
या धाडसी कृत्यामुळे केवळ पुण्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभर अभूतपूर्व खळबळ माजली. गुन्हेगारांना पकडून देणार्या व्यक्तीला २० हजार रुपये (१८९७ सालचे!) बक्षीस देण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले. ब्रिटिशांची दमनशाही सुरू झाली. लोकमान्य टिळकांना अटक झाली. पुण्यात मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू झाली. विशेषतः ब्राह्मण तरुणांना मोठ्या संख्येने गजाआड करण्यात आले. गणेश आणि नीलकंठ या द्रविड बंधूंनी फितुरी केली. दामोदर पंत पकडले गेले. त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. या वार्तेने बसलेला धक्का त्यांच्या आईला सहन झाला नाही. त्यांचे निधन झाले. दि. १८ एप्रिल १८९८ या दिवशी दामोदरपंत यांना फासावर चढविण्यात आले. आदल्या दिवशी त्यांनी उपवास केला. त्या रात्री त्यांना गाढ झोप लागली होती! त्यांनी लोकमान्य टिळकांना सांगून त्यांच्या जवळ असलेली भगवद्गीता मागून घेतली होती. ती हातात घेऊन, त्यांनी आपला देह मृत्यूला अर्पण केला. या वेळेस दामोदरपंत यांची पत्नी अवघ्या २३ वर्षांची होती आणि त्यांच्या पदरात अवघा १४ महिन्यांचा मुलगा होता.
पुढे बाळकृष्ण यांनाही अटक झाली. तेदेखील धैर्याने आणि शांतपणे फाशीच्या तख्तावर चढले. फितुरी करणार्या द्रविड बंधूंना अद्दल घडविण्यासाठी वासुदेव चापेकर आणि त्यांचे सहकारी महादेव रानडे यांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. पुढे या दोघांना सुद्धा मृत्युदंड देण्यात आला. चापेकरांच्या घरात आता वृद्ध वडील, तीन बालविधवा आणि तीन छोटी मुले इतकेच शिल्लक राहिले. ही सगळी लोकविलक्षण आणि हृदयस्पर्शी गाथा सुरुवातीला उल्लेख केलेल्या पुस्तकांमध्ये आलेली आहे.
वाचक मित्रांनो, गेले सव्वा वर्ष मी या पाक्षिक सदरातून आपल्याला भेटत आलो. या लेखाबरोबरच या सदराचा समारोप करतो आहे. माझे लेख वाचून अनेक वाचकांचे मला अभिनंदनाचे फोन आले आणि या लेखांचे पुस्तक प्रसिद्ध करावे असे त्यांनी सूचवले. मी ज्या पुस्तकांबद्दल लिहिले, ती पुस्तके कुठे मिळतील, याचीही चौकशी केली. मी ज्या पुस्तकांबद्दल लिहिले, त्याशिवाय मराठीत या विषयावर अनेक चांगली पुस्तके आहेत, याची मला कल्पना आहे. पण, जागेच्या मर्यादेमुळे त्यांच्याबद्दल लिहिता आले नाही. मला ही लेखमाला लिहिल्याची संधी दिल्याबद्दल मी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे मनापासून आभार मानतो. (सदर समाप्त)
डॉ. गिरीश पिंपळे
९४२३९६५६८६