हैदराबाद : राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा व चार राज्यातील निवडणूकांची मतमोजणी सुरू आहे. चारही राज्यात कोण सत्तास्थापन करणार याकडे पूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे. त्यातच आता तेलंगणामध्ये काँग्रेसची वाटचाल बहुमताकडे चालली आहे. ११९ जागांपैकी काँग्रेसने ७० जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी बीआरएसला अवघ्या ३७ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर भाजपने देखील ८ जागांवर आघाडी घेतली आहे.
सत्ताधारी बीआरएस पक्षाला जरी सत्तेतून बाहेर जावे लागत असले तरी, सर्वाधिक धक्का असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाला बसला आहे.ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने तेलंगणामध्ये ९ जागा लढवल्या होत्या. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार एआयएमआयएम अवघ्या ३ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. हैदराबाद जिल्ह्यातील मुस्लिम बहुसंख्य भाग एआयएमआयएम पक्षाचा बाल्लेकिल्ला मानला जातो. पण यावेळी हैदराबाद लोकसभा मतदार संघातच ओवैसींना मोठा धक्का बसला आहे.
तेलंगणाच्या स्थापनेपासूनच तेथे भारत राष्ट्र समिती (पूर्वीची तेलंगणा राष्ट्र समिती) च्या के. चंद्रशेखर राव यांची सत्ता आहे. तेलंगणा मध्ये प्रामुख्याने काँग्रेस व बीआरएस या दोन पक्षात थेट लढत होती. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार काँग्रेसला तेलंगणा मध्ये स्पष्ट बहुमत मिळत आहे. त्यासोबतच भारतीय जनता पक्ष तिसरी ताकत म्हणून उदयास येताना दिसत आहे. तेलंगणा मध्ये २०१८ च्या निवडणुकीत ११९ पैकी 88 जागांवर बीआरएस पक्षाने विजय मिळवला होता व काँग्रेस ला १९ जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते.