शिल्पकलेचे कोणतेही शिक्षण न घेता, आपली नोकरी सांभाळत, त्यांनी जगातील पहिले कापूस शिल्पकार होण्याचा बहुमान मिळवला. जाणून घेऊया नाशिकमधील अनंत खैरनार यांच्याविषयी...
वनवासीबहुल जव्हारमध्ये जन्मलेल्या, अनंत नारायण खैरनार यांचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेले. आई-वडिलांचा शिवणकामाचा व्यवसाय. त्यातून जे काही पैसे मिळतील, त्यातच कसेबसे घर चालायचे. कृष्ण विद्यालयातून अनंत यांनी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. शाळेत दररोज जवळपास दीड किलोमीटर अनवाणी पायी जावे लागे. शालेय वयातच त्यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली. मिळेल त्या गोष्टीने ते चित्रे रेखाटत. अगदी कोळशानेही ते रस्त्यावर चित्रे काढत. विविध चित्रकला स्पर्धांमध्येही त्यांनी भाग घेतला. परिस्थिती बेताची असल्याने, घरी एखाद्या गोष्टीची मागणी करणे तर दूरच! इयत्ता दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने, पुढे त्यांनी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला.
अनंत यांचे बंधू नाशिकमधील ’एचएएल’मध्ये नोकरीला होते. नोकरीच्या निमित्ताने ते भगूरमधील स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्म ठिकाणी म्हणजेच सावरकर वाड्यामध्ये भाड्याने राहत होते. त्यावेळी चव्हाण यांच्या मालकीचा हा वाडा होता. पुढे त्यांच्याकडून सरकारने हा वाडा खरेदी केला आणि त्याचे सावरकर स्मारकात रुपांतर केले. शिक्षणासाठी अनंत हेदेखील भावाकडे आले. जवळपास पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ते बंधूंकडे राहत होते. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना, स्थानिक गणेशोत्सव मंडळाने त्यांना नव्या पद्धतीने गणेशमूर्ती बनवून देण्याची मागणी केली. मंडळाकडेही पैसे नव्हते आणि अनंत यांच्याकडेही. पण, अशातही गणेशमूर्ती कापसाची बनवायची, असे अनंत यांनी ठरवले. कापूस घेतला, काड्या, कागद जमवले. गुलाबी रंग देऊन, छानसा कापसाचा गणपती बनवला. हाच गणपती मंडळाने बसवला. पुढील वर्षीही अनंत यांनीच मंडळासाठी मूर्ती बनवली.
अनंत यांचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही सुरूच होता. १९९० साली ते ’एलआयसी’मध्ये नोकरीवर रुजू झाले. पुढे चोपडा तालुक्यात बदली झाली. तिथेही त्यांनी कापसापासून गणेशमूर्ती बनवल्या. मुंबईतही अगदी नऊ फुटांच्या मूर्ती बनविल्या. हळूहळू कापसाच्या रंगीत मूर्त्या बनविण्यास सुरुवात केली. १९९८ साली जळगावमध्ये महात्मा गांधी यांची कापसाची साडेसात फुटांची मूर्ती बनवून, त्यांनी ’गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ केला. त्याआधी ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’नेही त्यांच्या कलेची दखल घेतली. नाशिकलाच स्थायिक झाल्यानंतर, अनंत यांच्या शिल्पकलेला आणखी गती मिळाली. आतापर्यंत अनंत यांनी तब्बल दोन हजारांहून अधिक मूर्ती बनविल्या आहेत. जैन समाजाचे तीर्थंकर, धर्मगुरू, स्वामी विवेकानंद, स्वा. सावरकर यांच्या मूर्तींचाही यात समावेश आहे.
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या घरामध्ये आजही अनंत यांनी बनविलेला गणपती विराजमान आहे. या गणपतीच्या हातात बॅट आणि बॉल आहे. राष्ट्रपती भवनामध्येही अनंत यांनी साकारलेल्या मूर्ती आहे. रसायनशास्त्रात पदवीधर असल्याने, त्याचा फायदा अनंत यांना त्यांच्या कापूस शिल्पकलेसाठी झाला. पीओपी मूर्तीवर बंदी असून, शाडू मातीच्या मूर्ती नाजूक असल्याने, तुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कापसापासून बनविलेल्या मूर्त्यांना अधिक पसंती सध्या मिळताना दिसते. वडील आणि आईने अनंत यांना या कलेसाठी नेहमीच पाठिंबा दिला. वर्षभरापूर्वी अनंत यांनी या कलेचे पेटंटदेखील घेतले. या कलेसाठी कापसाची निवड करणे, हीसुद्धा एक कलाच. चहाचा कप, जेवणाच्या प्लेट्स, मोबाईल कव्हर, स्मृतिचिन्ह, फुलं, दागिने अशा अनेक वस्तू अनंत कापसापासून तयार करतात. अनंत यांना कविता, लेख लिहिण्याचीही आवड. अनेक राज्य नाट्य स्पर्धांमध्येही त्यांनी भाग घेतला आहे.
या अनोख्या कलाप्राविण्याविषयी बोलताना अनंत सांगतात की, “मला मिळालेली ही दैवी देणगी आहे. त्या कलेमागे कृतज्ञतेचा भाव आहे, कुठलाही अहंकार नाही. अडचणीशिवाय जीवन नाही. आपण फक्त कर्म केले पाहिजे, फळाची अपेक्षा आधीच करू नये. तरुणांनी आपली कला जपताना, विरोध सहन करण्याची क्षमता ठेवा. विरोधाचा सामना करत, स्वतःला उभं करा. कोणतीही कला जोपासताना, आपली आर्थिक स्थितीदेखील भक्कम केली पाहिजे. आपल्या कलेवर आपले प्रेम पाहिजे आणि त्यासाठी परिश्रम करावे. संघर्ष आणि विरोध सतत सुरू असतो; मात्र त्यातून उभं राहायला पाहिजे. जुन्या अनुभवांतून आणि संघर्षातून एखाद्या अडचणीवर समाधान सापडते,” असे अनंत सांगतात.
अनेक अडचणी, संघर्षाचा सामना करत आपली नोकरी सांभाळून, अनंत यांनी कापसापासून शिल्प तयार करण्याची अनोखी कला जोपासली. केवळ कलाच जोपासली नाही, तर जगातील पहिले कापूस शिल्पकार होण्याचा बहुमानही स्वतःच्या नावावर केला. विशेष म्हणजे, शिल्पकलेचे शिक्षण न घेताही, अनंत यांनी अशी उत्तुंग कामगिरी करून दाखविली आहे. २०१६ साली ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. अशीच काहीशी अनंत खैरनार या कपाशीच्या शिल्पकाराची गोष्टही तितकीच प्रेरणादायी आणि जगात एकमेव आहे, हे नक्की. अनंत खैरनार यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
७०५८५८९७६७