नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचंड महाविजय मिळाल्यानंतर, भाजपने आता लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर, काँग्रेसने पराभवावर बराच काथ्याकूट केला. बरं केला तर केला, त्यातून निष्कर्ष काय निघाला, तर ’भारत जोडो’च्या अपयशानंतर आता पुन्हा एकदा एक यात्रा काढली जाईल, असे ठरले.
’भारत जोडो’ऐवजी आता ’भारत न्याय यात्रा’ या नावाने दि. १४ जानेवारी ते दि. २० मार्चपर्यंत यात्रा काढली जाईल. मणिपूरमधून यात्रेला सुरुवात होऊन मुंबईत समारोप होईल. जूनमध्ये राहुल मणिपूरमध्ये गेले होते, आता यात्राही इथूनच सुरू होईल. १४ राज्यांमधून ही यात्रा जाणार असून, त्यापैकी १२ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. विशेष म्हणजे, ’भारत जोडो’ यात्रा पायी काढण्यात आली होती. आता यात्रेला बसचा टेकू दिला जाणार आहे.
’भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी देश जोडताहेत, ‘मोहब्बत की दुकान’ सुरू करताहेत, अशा प्रकारे काँग्रेसने राहुल गांधींची जोरदार ‘ब्रॅण्डिंग’ करण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकमधील विजयानंतर काँग्रेसचा अतिआत्मविश्वास तर अगदी शिगेला पोहोचला. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले. ’भारत जोडो’ यात्रा तेलंगणच्या २९ विधानसभा मतदारसंघांतून गेली आणि विजय मिळाला अवघा १२ जागांवर. मध्य प्रदेशातील २१ मतदासंघांतून ’भारत जोडो’ यात्रा मार्गस्थ झाली, विजय मिळाला अवघ्या चार जागांवर.
राजस्थानमध्ये १२ मतदारसंघांतून यात्रा गेली आणि विजय मिळाला नऊ जागांवर. त्यातही याठिकाणी काँग्रेसचीच सत्ता होती. मागच्या यात्रेतून किती फायदा, किती नुकसान झाले, याचा विचार म्हणूनच केलेला दिसत नाही. परंतु, पुन्हा एकदा राहुल गांधींना ब्रॅण्डिंग आणि सहानुभूतीच्या रथावर स्वार करण्यासाठी काँग्रेस उतावीळ झाली आहे, हे मात्र नक्की. २०१९च्या लोकसभा निवडणुकीला काँग्रेसने ‘अब होगा न्याय’ अशी घोषणा दिली होती. त्याला जनतेने बहुमताने नाकारले आणि आता पुन्हा एकदा न्याय मागायला अर्थात ब्रॅण्डिंगला राहुल गांधी यात्रेवर निघणार आहे. पण, आता कितीही यात्रेतून ‘ब्रॅण्डिंग’ केले तरी ‘व्होटिंग’ मिळणार नाही, हेच खरे!