समुद्र काकडी आणि चिनी हेरखातं

Total Views | 321
 kakadi
 
‘एमएसएस’च्या मुख्यालयात दहा हजार कर्मचारी काम करतात, तर देशभरात त्याचे एक लाख कर्मचारी कार्यरत आहेत. इतर कोणत्याही देशाच्या गुप्तेहर खात्याप्रमाणेच ‘एमएसएस’चे हस्तकही कार्यक्षमतेने काम करतात. असं आतापर्यंत दिसत होतं. मग आताच एकदम माओच्या काळाप्रमाणे नजरबाजीचा अतिरेक करण्याचा येडबंबू आदेश त्यांनी का बरं काढला असावा?
  
'सीककम्बर’ किंवा ‘समुद्र काकडी’ ही फळभाजी नसून, समुद्री कालवांप्रमाणेच तो एक प्रकारचा मासा किंवा एक समुद्री जीव आहे. ‘सामन’ किंवा ‘सार्डिन’ मासे अतिमच्छीमारीमुळे धोक्यात आले, तोच प्रकार समुद्र काकडीबाबतही झाला. या जीवाच्या शरीरात भरपूर मांस असतं आणि ते चविष्ट असतं म्हटल्यावर, कितीही बंदी घातली तरी त्याची शिकार होणारच. मग यावर उपाय काय? मधुमक्षिका पालन, ईमू पालन, शेळी पालन यांप्रमाणेच ’समुद्र काकडी पालन’ व्यवसाय करायला लोकांना उत्तजेन द्यायचं.
 
खाणार्‍याला खाद्यपदार्थ मिळतो, उत्पादकाला सतत मागणी (रिकरिंग डिमांड) असणारं उत्पन्नाचं साधन मिळतं आणि समुद्री जीवांची ती जात नामशेष होणंदेखील थांबतं.साहजिकच सगळेच समुद्री देश समुद्र काकडी पालन करतात. आपला देशही करतो. भारतीय समुद्र काकडीच्या विशिष्ट प्रजातीला बाजारात २५० रुपये प्रतिनग असा साधारण भाव येतो, असं म्हणतात.
निसर्ग तरी किती गमती-जमती करतो. समुद्र काकडी हा जीव समुद्रातला सफाई कामगार (स्कॅव्हेंजर) समजला जातो. तो समुद्रातला जैविक कचरा खातो. यात अन्य जीवांची विष्ठासुद्धा आलीच. केर-कचरा, विष्ठा हे त्याचं अन्न असतं आणि या अन्नामुळे त्याच्या शरीरात भरपूर नि चविष्ट मासं निर्माण होतं, त्यासाठी माणूस त्याला खातो.
 
असो. तर चीनच्या पिवळ्या समुद्र किनारपट्टीवर अशी असंख्य समुद्र काकडी पालन उत्पादन केंद्र आहेत. काही अमेरिकन पर्यटक ते केंद्र पाहायला गेले होते, त्याच्याकडे प्रांतिक सरकारच्या सगळ्या परवानग्या होत्या. त्यातलाच एक परवानगीचा कागद दाखवून, त्यांनी त्या केंद्राजवळच्या समुद्रात एक इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवलं.
 
केंद्राचा मालक झांग याला त्यांनी सांगितलं की, ”तुझ्या या समुद्र काकडी केंद्राजवळच्या समुद्र जलाची गुणवत्ता तपासण्याचं हे उपकरण आहे. ते बसवण्यासाठी आम्ही प्रांतिक सरकारच्या संबंधित अधिकार्‍याची रीतसर परवानगी घेतलेली आहे.” झांगने ते परवानगी पत्र पाहिलं. समुद्री जलाची गुणवत्ता तपासणी म्हणजे नेमकं काय, हे त्याला कळलं नाही. पण, त्याने विचार केला की, आपल्या उत्पादनाला काही धोका नाही आणि परवानगी पत्र ठीकठाक आहे. तेव्हा बसवेनात का काहीही! काही आठवडे उलटल्यावर मात्र त्याला संशय आला. या उपकरणाला हे अँटेनासारखं काय आहे? आणि ती अँटेना ठरावीक वेळाने सर्व दिशांना का फिरते? आणि त्यातून हा कसला चिरका आवाज निघतो? झांगने ताबडतोब संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधला.
 
स्थानिक अधिकार्‍यांच्या लक्षात आलं की, प्रकरण गंभीर आहे. त्यांनी त्वरित ‘मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी’ उर्फ ’एमएसएस’शी संपर्क साधला. ‘एमएसएस’ म्हणजेच चिनी गुप्तहेर किंवा गुप्तवार्ता खातं. अमेरिकेची ’सीआयए’ किंवा इस्रायलच्या ’मोसाद’प्रमाणेच चिनी सरकारसाठी हेरगिरी करणारं खातं. ’एमएसएस’वाले त्वरेने झांगच्या समुद्र काकडी पालन केंद्राकडे धावले. ते उपकरण समुद्री जलाची गुणवत्ता तपासणारं यंत्र नसून, समुद्राच्या त्या विशिष्ट परिसरातल्या लष्करी-नाविक हालचाली टिपणारं यंत्र होतं. बहुधा, त्यात काहीतरी बिगाड होऊन, ते चिरका आवाज काढू लागलं. त्यामुळे झांगचं लक्ष वेधलं गेलं. पर्यटकांनी झांगचं केंद्र पाहण्यासाठी आणलेली अन्य कागदपत्रं खरी होती. फक्त हे उपकरण बसवण्याची परवानगी देणारं पत्र खोटं होतं.
 
’एमएसएस’ने त्वरित हालचाली करून, त्या पर्यटकांना पकडण्यात यश मिळवलं आणि पश्चिमी देशांच्या चिनी भूमीवरील हेरगिरीचा हा नमुना मोठा गाजावाजा करून सर्वत्र जाहीर केला. इथपर्यंत ठीक आहे. पण, यानंतर आता ’एमएसएस’ने खास पठडीतला साम्यवादी आचरटपणा सुरू केला आहे. परकीय प्रवाशांशी बोलू नका, परकीय प्रवाशांवर नजर ठेवा, त्यांचा जरा जरी संशय आला तरी ताबडतोब पोलिसांशी संपर्क करा इत्यादी सूचना चीनमध्ये सर्वत्र जारी केल्या गेल्या आहेत.
 
बसमधल्या सीटच्या पाठीवर चित्रपट किंवा अन्य उत्पादनांच्या जाहिरातांप्रमाणेच ’एमएसएस’ने जारी केलेल्या, ‘परकीय प्रवाशांशी बोलू नका’ या जाहिराती पण झळकू लागल्या आहेत. त्याचबरोबर परकीय प्रवाशांना ठीकठिकाणी कडक तपासणीला तोंड द्यावं लागत आहे.
 
एक चिनी उद्योजक म्हणतो की, ”तुम्हाला परकीय प्रवासी यायला तर हवेत. त्यांनी पर्यटनस्थळांना भेटी द्याव्या, समुद्र काकडी किंवा तत्सम उत्पादन केंद्रांना भेटी देऊन त्यांच्याशी व्यापार करायला हवा, परकीय गुंतवणूक हवी, तर मग त्यांच्याशी न बोलून कसं चालेल? व्यापार, कारखानदारी, आयात-निर्यात यांची वाढ काही फक्त इंटरनेटद्वारे होत नसते. माणसांनी एकमेकांना भेटणं, एकमेकांचे उद्योग-व्यवसाय जाणून घेणं यातून व्यवसाय हळूहळू वाढत जात असतो. यासाठी परकीय लोक आपल्या देशात येणं, आपल्या लोकांनी इतर देशात जाणं, हे गरजेचच आहे.
 
अशा प्रत्येकच माणसाकडे जर तुम्ही हेरगिरी करणारा, म्हणून संशयाने बघायला लागलात, तर मग व्यापार-उद्योग कसे वाढतील? हा, आता या सगळ्यांच्या आडून हेरगिरी चालेतच, ती तशी कायमच सर्वत्र चालते. मग तिला आटोक्यात कसं ठेवता येईल, यासाठी तुमचं व्यावसायिक हेरगिरी कौशल्य वापरा. परकीयांशी बोलूच नका, हा उपाय म्हणजे चीनला पुन्हा ‘सांस्कृतिक क्रांती’च्या काळात नेण्यासारखा आहे.”
 
या सगळ्याला रशियन कम्युनिस्ट पक्ष आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासाची भीषण पार्श्वभूमी आहे. १९१७ साली रशियात राज्यक्रांती झाली. सम्राट झार निकोलस याची राजेशाही राजवट उलथून, व्लादिमीर लेनिनच्या बोल्शेविक कम्युनिस्ट पक्षाने जगातलं पहिलं साम्यवादी सरकार स्थापन केलं. लेनिनने सर्वप्रथम ‘चेका’ नावाची सर्वशक्तिमान गुप्त पोलीस संघटना निर्माण केली. साम्यवादी सरकारला थोडासाही विरोध करणार्‍या, प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही मार्गाने संपूर्ण नेस्तनाबूत करणं, हे ‘चेका’चं कार्य होतं.
 
या ‘चेका’मधूनच पुढे ‘ओजीपीयू’ आणि ‘एनकेव्हीडी’ अशा आणखी दोन भीषण संघटना उभ्या राहिल्या. त्यांनी अत्यंत क्रूरपणे साम्यवाद्यांच्या शत्रूंचा-विरोधकांचा पार नायनाट केला. १९१७ ते १९२४ या लेनिनच्या सत्ताकाळात किमान २० लाख लोकांना ठार मारण्यात आलं. १९२४ साली लेनिन स्वतःच मेला. त्याचा मृत्यू आजही संशयास्पद मानला जातो आणि संशयाची सुई त्याचा पट्टशिष्य जोसेफ स्टालिन याच्याकडे वळते.
 
लेनिनच्या मृत्यूनंतर स्टालिन सर्वेसर्वा बनला. ’चेका’, ’ओजीपीयू’ आणि ’एनकेव्हीडी’ यांच्याहीपेक्षा सर्वशक्तीमान, सर्वंकष अशी गुप्तेहर संघटना त्याने उभारली तिचं नाव-’केजीबी.’ स्टालिनच्या राज्यात प्रत्येक नागरिकच जणू गुप्तेहर बनला. नवरा बायकोवर नजर ठेवू लागला. बायको नवर्‍यावर नजर ठेवू लागली. नवरा-बायको दोन्ही मिळून घरातल्या वयोवृद्ध, आईवडील, शेजारीपाजारी, दारावर येणारे फेरीवाले, आजूबाजूचे दुकानदार यांच्यावर नजर ठेवू लागले, तर हे सगळे व्यावसायिक आता आपल्या गिर्‍हाईकावर नजर ठेवू लागले.
 
मुलं शाळेत शिक्षकावर नजर ठेवून असायची, तर शिक्षक मुलांवर आणि पालकांवर नजर ठेवून असायचे. प्रत्येकाला ठराविक काळाने आपल्या परिसरातल्या ’केजीबी’ अधिकार्‍याला आपल्या नजरबाजीच्या ‘रिपोर्ट’ द्यावा लागत असे. स्टालिन विरोधात किंवा कम्युनिस्ट सरकार विरोधात कुणीही एखादा शब्द उच्चारलेला समजला, तरी तो माणूस दुसर्‍या दिवशी अंतर्धान पावत असे. एक तर त्याला गोळी घातली जात असे किंवा सैबेरियाच्या गारढोण प्रदेशात जन्मठेपेवर पाठवून दिले जात असे. १९४५ साली याल्टा इथे स्टालिन आणि चर्चिल यांची भेट झाली होती. तेव्हा आपण आपल्याच देशातली किमान एक कोटी माणसं साम्यवादाला विरोध करतात, म्हणून ठार मारली, असं स्टालिनने स्वतःच्या तोंडाने चर्चिलला सांगितलं होते.
 
१९४९ साली माओ-त्से-तुंग किंवा माओ झेडाँग याने चीनमध्ये साम्यवादी क्रांती घडवली. चँग-कै-शेक याचं लोकशाही सरकार उथलून टाकून माओने सत्ता हडपली. या क्रांतीत २० लाख सैनिक आणि ५० लाख नागरिक असे एकंदर ७० लाख चिनी मेले. हे सगळे अंदाजित आहेत, बरं का!
 
जरा स्थिरस्थावर झाल्यावर माओने ठरवलं की, शेतीचं उत्पादन वाढवायचं आणि ग्रामीण क्षेत्रात कारखानदारी वाढवायची. थोडक्यात, आर्थिक विकासाच्या सोव्हिएत नमुन्याबरहुकूम काम करायचं. थोडक्यात, माओच्या कृती आराखड्याची प्रत्यक्ष अंंमलबजावणी १९५८ साली सुरू झाली. ’द ग्रेट लीप फॉरवर्ड-हनुमानउडी’ या नावाने या धोरणाचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला. आपल्याकडील कम्युनिस्ट तर एकाच वेळी अंगात वैजयंतीमाला आणि हेलन संचारल्यासारखी बेभान नाचत होती.
या अत्यंत आचरटपणे राबवलेल्या, धोरणाच्या परिणामी चीनमध्ये भीषण दुष्काळ पडला, त्यात किमान दीड कोटी ते किमान साडे पाच कोटी माणसं गेली. अखेर १९६२ साली हा कार्यक्रम आवरता घेण्यात आला.
 
पण, एवढ्याने शहाणे बनतील, तर ते साम्यवादी कसलेेे? १९६६ साली माओने दुसरा भव्य कार्यक्रम हाती घेतला. त्याचे नाव ‘सांस्कृतिक क्रांती.’ जुने विचार, जुना इतिहास, जुनी संस्कृती, जुन्या वास्तू, वस्तू ,वस्त्रं, यंत्रं, वाहनं सगळं मोडीत काढा. नष्ट करा. या सगळ्या राजेशाही, हुकूमशाही, सरंजामशाहीच्या अशुभ खुणा आहेत. त्या नष्ट करा, जाळून टाका, गाडून टाका आणि नव्या यंत्र युगाचा स्वीकार करा. यातूनच चीनचा विकास, प्रगती होईल.
 
चिनी साम्यवादी पक्षाची क्रांतीपूर्व काळात ’टेके’ नावाची गुप्तचर संघटना होतीच. पुढे तिची ’एसएएडी’ मग ’सीआयडी’ अशी नावं बदलत गेली. या ’सीआयडी’च्या हस्तकांनी आणि एकंदरीत चिनी साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चीनमध्ये स्टालिन काळातल्या रशियासारखचं वातावरण निर्माण केलं. प्रतेयक नागरिक आपल्या जवळच्या दुसर्‍या नागरिकावर नजर ठेवू लागला. खेरीज या क्रूर लोकांनी असंख्य जुन्या वास्तू, मठ, मंदिरं, विहार, वाडे उद्ध्वस्त केले. प्राचीन कन्फ्युशियस आणि बौद्ध वाड्.मय जाळून टाकलं. ही सांस्कृतिक क्रांती १९६६ ते १९७६ अशी दहा वर्षे चालू होती.
 
१९७६ साली माओ स्वतःच मेला. दहा वर्षांच्या या क्रांती काळात किमान पाच लाख ते कमाल २० लाख माणसं गेली. म्हणजे आधीच्या क्रांत्यांच्या तुलनेत जरा कमीच म्हणायची. १९७८ साली डेंग झियाओ चिंग याने चीनची सर्वंकष पुनर्बांधणी सुरू केली. त्यात १९८३ साली त्याने ’मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी’ उर्फ ’एमएसएस’ हे शक्तिमान गुप्तेहर खातं उभारलं.
 
’एमएसएस’च्या मुख्यालयात दहा हजार कर्मचारी काम करतात, तर देशभरात त्याचे एक लाख कर्मचारी कार्यरत आहेत. इतर कोणत्याही देशाच्या गुप्तेहर खात्याप्रमाणेच ’एमएसएस’चे हस्तकही कार्यक्षमतेने काम करतात. असं आतापर्यंत दिसत होतं. मग आताच एकदम माओच्या काळाप्रमाणे नजरबाजीचा अतिरेक करण्याचा येडबंबू आदेश त्यांनी का बरं काढला असावा?
दरम्यान, इकडे अमेरिकेत ’सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्नस् यांनी आपल्या खात्याला चीनमध्ये हेर जाळी उभी करण्यात चांगले यश येत आहे, असं जाहीर विधान केलं आहे.
 
 

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.   

अग्रलेख
जरुर वाचा
हिंदुत्वाचा आणि वक्फचा संबंध नाही म्हणणाऱ्या संजय राऊतांना एकनाथ शिंदेंकडून जबरदस्त चपराक म्हणाले...

हिंदुत्वाचा आणि वक्फचा संबंध नाही म्हणणाऱ्या संजय राऊतांना एकनाथ शिंदेंकडून जबरदस्त चपराक म्हणाले...

Woqf Board संसदेत २ एप्रिल २०२५ रोजी रोजी संसदेत मांडलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध होत आहे. केंद्रीय पातळीवर राज्य पातळीवर विरोधी बाकांवर बसणाऱ्या नेते मंडळींनी विधेयकाला टोकाचा विरोध केला आहे. राज्यातही या विधेयकावरून विरोधकांकडून केंद्र सरकार भाजवर लक्ष केंद्रीत करत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्त्वाचा काहीही एक संबंध नसल्याची गरळ ओकली आहे. त्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर टीकेची तोफ डागली आहे...

हास्याचा कल्लोळ उडवणारा दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा अशी ही जमवा जमवी चा मजेदार ट्रेलर पाहिलात का?

हास्याचा कल्लोळ उडवणारा दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा "अशी ही जमवा जमवी" चा मजेदार ट्रेलर पाहिलात का?

प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला मोठ्या पद्यावर अनुभवायला मिळणार आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा "अशी ही जमवा जमवी" या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. ह्या धमाल सिनेमात अनेक वर्षांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121