रसिका शिंदे-पॉल
मुंबई : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच तिच्या सोशल मिडियावरील मालवणी भाषेतील तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेच असते. याशिवाय राजकारण, सामाजिक स्थिती अशा विविध विषयांवर ती आपली मते परखडपणे मांडत असते. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी म्हणजे व्यंगत्व नसल्याचे सांगत 'सशुल्क (भरपगारी) मासिक पाळी रजा धोरणा'ला विरोध केला होता. यावर अंकिता वालावलकर हिने ‘महाएमटीबी’शी संवाद साधताना, “स्मृती इराणी यांनी मासिक पाळीबद्दल योग्यच वक्तव्य केले आहे”, असे स्पष्टपणे म्हणाली.
अंकिता म्हणाली, “स्मृती इराणी मला व्यक्ती म्हणून देखील खुप आवडतात. नुकतेच त्यांनी मासिक पाळीबद्दल वक्तव्य केले होते. की मासिक पाळीसाठी महिलांना सुट्टीची गरज नाही हे त्यांचं स्पष्ट मत मला पटलं. त्यांचं ते बोलणं बऱ्याच जणांना पचणी पडलं नाही आणि त्यामुळे त्यांना ट्रोल केलं गेलं. इतकंच नाही तर एक महिलाच महिलांची वैरी होऊ शकते असं देखील म्हटलं गेलं. परंतु, मासिक पाळीबद्दल किंवा एकूणच महिलांबद्दल इतकं मोठं वक्तव्य करताना स्मृती यांनी कुठेच हा विचार केला नाही की आता लोकसभेच्या निवडणूका तोडांवर आल्या आहेत तर मी महिलांच्या बाजूने बोलले पाहिजे. त्यांनी अतिशय योग्य भाष्य केले आहे”, असे प्रामाणिक मत अंकिता वालावलकर हिने दिले.
काय म्हणाल्या होत्या स्मृती इराणी?
"एक मासिक पाळी येणारी स्त्री म्हणून मी सांगू इच्छिते, की मासिक पाळी म्हणजे काही दिव्यांगत्व नाही, हा स्त्रियांच्या जीवन प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. स्त्रियांना समान संधी नाकारल्या जातील, अशा गोष्टी आपण मांडू नयेत. कारण ज्यांना मासिक पाळी येत नाही, अशा व्यक्तीचा मासिक पाळीबद्दल विशिष्ट दृष्टिकोन असतो". पुढे त्या म्हणाल्या की, "मासिक पाळीचा प्रश्न आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींबाबत मौन पाळलं जातं. अनेकदा महिलांना लज्जास्पद वागणूक दिली जाते. मासिक पाळीकडे सोशल टॅबू (सामाजिकदृष्ट्या निषिद्ध बाब) म्हणून पाहिले जाऊन बर्याच वेळा महिलांचा छळ होतो, त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते किंवा त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जातो. जेव्हा एखादी मुलगी मासिक पाळीला प्रथमच सामोरी जात असते, आणि भावनिक-शारीरिकरित्या होत असलेल्या बदलांबद्दल तिला माहिती नसते, तेव्हा ही अधिकच संवेदनशील बाब होते” असेही इराणींनी म्हटले.