‘चला एकत्र कल्पना करू या’ अर्थातच ही कल्पनाच सुचली चार वर्षांपूर्वी. गरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, कोणत्याही कारणाने त्यांनी शाळा सोडू नये, यासाठी या कल्पनेनुसार ‘लेटस इमॅजिन टुगेदर फाऊंडेशन’ काम करते. गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी सहकार्य करायला हवे, असे वाटणारे अनेक समविचारी लोक संस्थेशी जोडली गेली. संस्थेच्या या संकल्पना कार्याचा मागोवा इथे मांडला आहे.
सामाजिक कार्याची पहिल्यापासूनच आवड होती. त्यामुळे संधी मिळेल तशी सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी व्हायचे. समाजकार्यात खारीचा वाटा उचलाताना समाधान व्हायचे. गणेशोत्सोव सुरू असताना मला वाटले की, गणेशभक्तांनी श्रद्धेनुसारप्रसाद आणि त्यासोबत शालेय साहित्य बाप्पाच्या चरणी वाहिले तर? तर ते साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वितरित करता येतील. त्यानुसार त्या वर्षी गणपतीला दर्शनाला येणार्या भाविकांना आम्ही आवाहन केले की, बाप्पाच्या दर्शनासाठी येताना लाडू, पेढे, मोदक, हार न आणता बाप्पासाठी शैक्षणिक साहित्य प्रसाद म्हणून आणा. आमच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला. सज्जनशक्ती मागे उभी राहिली. समाज चांगल्या कामासाठी उल्लेखनीय मदत करतो हे दिसून आले. माझ्यासाठी ही मोठी प्रेरणा होती. त्यातूनच ‘चला एकत्र कल्पना करूया’ अर्थात ‘लेटस इमॅजिन टुगेदर’ या संकल्पनेचा आणि त्यानुसार संस्थेचा जन्म झाला. कोणतीही गोष्ट मुर्त स्वरूपात निर्माण होण्यापूर्वी ती कल्पनेत असते, विचारात असते. त्या विचारांची सिद्धता प्रत्यक्ष स्वरूपात येणे महत्त्वाचे. तसे झाले की, प्रत्यक्ष संस्था आणि कार्य उभे राहते. माझ्या मनातसुद्धा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यायचा विचार होता. तो विचार प्रत्यक्ष स्वरूपात आला. त्या विचाराला कार्याला नंतर समविचारी लोक जोडले गेले.
माझ्या संपर्कातील अनेकांना माझ्या या विचारांची माहिती होती. मला खरच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवायचे होते. त्यांचा शाळेतील सहभाग वाढवायचा होता. अकाली विद्यार्थीदशेत मुल प्रतिकुल परिस्थितीमुळे शिक्षण सोडतात तसे होऊ नये, असे मला वाटत होते. आम्ही आधी काही वर्षे नॅशनल पार्कमधील चिंचपाडा अंगणवाडीतील मुलांना मदत करत होतो, त्यांना शिकवायलाही जात असू. त्यातूनच मला कळाले की, आपल्या मुंबई, ठाणेपासून जवळ असलेल्या पालघर वाडा क्षेत्रात अनेक वनवासी पाडे आहेत. तिथे शासन सातत्याने विकासाची कामे करत आहे. मात्र तरीही कुठेतरी मुलांच्या शाळा गळतीबद्दल काम करणे गरजेचे आहेत. केसी महाविद्यालयाच्या राम मोहन सरांनी आम्हाला वाड्यातील बालीवली आणि मोज या जिल्हा परिषदेच्या शाळांबद्दल सांगितले. मी आणि माझ्या समविचारी मित्रमैत्रिणींनी या शाळांना भेट दिली. तेथील प्रयोगशील शिक्षक प्रल्हाद सर आणि किशोर सर यांची शिकविण्याची तळमळ, पद्धत जवळून अनुभवता आली आणि मग ठरवले की, या भागातील शाळांसाठी, मुलांसाठी काम करायचे. सहज पोहोचता येणार्या शाळांना काही संस्था मदत करत होत्या. पण, अति दुर्गम भागात कोणी जात नव्हते. ते काम आम्ही सुरू केले. शाळांना भेट देणे, शिक्षक, मुलांच्या समस्या समजून घेणं आणि त्यांच्यासाठी नवनवीन उपक्रम राबविणे.
शैक्षणिक साहित्याबरोबर स्वच्छता किट, खेळाचे साहित्य, चित्रकलेचे साहित्य, दहावीच्या परीक्षेचा किट .. याचे वाटप केले. पण, त्याचबरोबर हसत खेळत शिका, चित्रकला कार्यशाळा, आरोग्य विषयक मार्गदर्शन, छत्री रंगविणे, पणत्या रंगविणे, कंदील करणे, बुक मार्क, एनव्हलप पेंटिंग, गोष्टीचे पुस्तक , मोजमज्जा, मस्ती की पाठशाळा, छंदवही, वृक्षारोपण, रानावनातील शाळा अनुभव ... त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देता येईल, असे अनेक उपक्रम जवळजवळ वाडा आणि विक्रमगड मिळून १५ शाळांसाठी राबविले आणि राबवित आहोत. या सर्वांत एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की हे सर्व साहित्य त्यांना कोणीही देऊ शकेल पण त्यांच्याशी त्यांच्यातील एक होऊन संवाद साधणे गरजेचे आहे. मग ओमकारदादा, मिहीरदादा, संपदाताई, मानसीताई, अनिताताई आणि मी त्यांची मावशी झाले. त्यांना आमच्याविषयी आपलेपणा जाणवू लागला. शहरातील पाहुणे आणि गावातील मुलं यातले अंतर संपून आम्ही एक झालो आणि त्यांच्या भावविश्वात रमून गेलो. त्यांच्या समस्या कळायला लागल्या आणि त्याप्रमाणे आम्ही आता त्याचा मागोवा घेत एक एक उपक्रम करत आहोत.
मागे वळून पाहता गेल्या चार वर्षांत (त्यातील दोन वर्ष कोरोनाची होती) आमच्यासोबत बरीच माणसे जोडली गेली. जवळपास ७५ जणांनी आमच्यासोबत प्रत्यक्ष वाडा भेटीत, कार्यशाळेत भाग घेतला. दिवसेंदिवस ही साखळी वाढतच चालली आहे. प्रत्यक्ष येऊन अनुभव घेतल्यावर त्यांना तिथली परिस्थिती अनुभवता आली. आमच्या कार्यातील सच्चेपणा. कष्ट, मेहनत, तळमळही समजून घेता आली, अनुभवता आली. एक बोलका प्रसंग खास नमूद करावासा वाटतो. मानसीच्या बिल्डिंगमधील पाच वर्षांच्या व्योमने आपल्याकडील एक शार्पनर दिले. मानसीने विचारले तिकडे मुलं तर खूप आहेत. पण त्यावर त्या व्योमने मात्र कल्पकतेने उत्तर दिले, तर काय झालं...एक शार्पनर ते एकेक करून पेन्सिल शार्प करतील ना. एवढ्या छोट्या व्योमला ही मानसीताई काही तरी चांगलं काम करते आहे आणि आपण तिला मदत केली पाहिजे, हे समजले. हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. युवा पिढी तर मोठ्या संख्येनेबरोबर येतेय, सहभाग घेतेय आणि आपले योगदानही देते आहे. शहराकडून गावातील आपल्या छोट्या मित्रमंडळींसाठी शैक्षणिक सहकार्याचा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा सेतू बांधायचं काम ‘लेट्स इमॅजीन टुगेदर’ने हाती घेतलं आहे...जमेल तसं आपल्या परीने आमच्यासोबत जोडले जाणारे सहकार्य करत आहेत आणि हा सेतू बांधायला मदत करत आहेत.
वनवासी पाड्यातील शाळांसाठी काम करतानाच्या आठवणीमध्ये तुसे गावच्या शाळेची आठवण कधीच विसरणार नाही. आपण आपल्या मुलांच्या खाण्यापिण्याची ठेप ठेवतो. हायजिन कटाक्षाने पाळतो. अमुक वेळ झाली की, हेच मुलांनी खावे तेच मुलांनी खावे असे नियमही केले आहेत. अर्थात मुलांच्या संगोपनासाठी शारीरिक मानसिक वाढीसाठी हे योग्यच आहे. मात्र तुसे गावातील विद्यार्थ्यांना भेटल्यावर मला जाणवले की खरेच वनवासी पाड्यातील जनजीवन मूळ समाजप्रवाहात आणण्यासाठी सगळ्या समाजाने एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. मला असे वाटले कारण मला शाळेतील एका बाईंनी सांगितले की, मुलांच्या घरी अठराविश्व दारिद्य्र. गरिबीमुळे घरी अन्नाला अन्न नाही. दिवसभरातून एकवेळचा शिजवलेला भात मिळाला तरी पुरेसा. त्यामुळे काही मुल शाळा सुटली की उंदराची बिळ शोधतात. उंदीर पकडतात. रात्री भातासोबत तो शिजवून खातात. कारण दुसरे काही खायला मिळण्याची शक्यता नाही. त्या बाईंचे म्हणणे एकून वाटले की आता कुणी म्हणेल की ती त्यांची पद्धती असेल आवड असेल. तर तसे नाही. दुसरे काही अन्न उपलब्ध नाही म्हणून त्या बालकांना हे करावे लागते. अर्थात काय खावे काय प्यावे यावर कुणीच कुणावर निर्बंध लादू शकत नाहीत. पण भुकेने कासाविस झालेल्या चिमुरड्यांना उंदराची बिळ शोधावी लागू नयेत (कारण खुपदा या बिळात सापही असतात) , संध्याकाळी रात्री भुकेच्या वेळेस सहज खाता येतील, असा खाद्यपदार्थ त्यांच्याकडे उपलब्ध असावा, असा विचार मनात आला. त्यानंतर त्या पाड्यात आणि आजूबाजूच्या पाड्यातल्या शाळेतही विद्यार्थ्यांसाठी महिनाभरचे सकस पौष्टिक खाद्यपदार्थ आमची संस्था भरून देतेे.
असो दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बाप्पासाठी शैक्षणिक साहित्य प्रसाद आणावा हा उपक्रम आम्ही केला. यात २२ जणांनी सहभाग केला. शैक्षणिक साहित्य एवढे जमले जी आम्हाला ते वाड्याला नेण्यासाठी टेम्पो करावा लागला. दिवाळीतही मुलांच्या कलेला वाव देण्यासाठी चित्रकर श्रीबा समवत पणती रंगाविणे, एन्व्हलोप सुशोभीत करणे, रांगोळी टीप कागद तयार करणे हा उपक्रम केला. याच महिन्यात ‘एम्स स्पोर्ट्स फाऊंडेशन’च्या डॉ. अजित कुलकर्णी यांनी मुलांसाठी क्रीडा वर्कशॉपचे आयोजन केले आणि शाळेला स्पोर्ट्स किटही दिला.
स्थलांतरित मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून ‘एक पणती शिक्षणाची’ हा उपक्रम सुरू आहे. मुलं शिकती राहवीत, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आमची संस्था वाटचाल करते आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम करण्याचा हा अट्टाहास. बदल होताना अनुभवतोय. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच हे आव्हान पेलण्याचे बळ आम्हाला मिळते आहे. आमच्या संस्थेबद्दल, कार्याबद्दल आणि उपक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क करा...
पूर्णिमा नार्वेकर
९८२०००३८३४