'डॉक्टरेट' महाराष्ट्रातील जनतेला समर्पित - देवेंद्र फडणवीस

जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान

    26-Dec-2023
Total Views | 78

Devendra Fadanvis



मुंबई : 'आज मी जो तुमच्यासमोर उभा आहे, तो केवळ महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठांची भक्कम साथ आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच. त्यामुळे जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आलेली मानद 'डॉक्टरेट' मी महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. २६ डिसेंबर रोजी केले.
 
पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी जपानच्या 'कोयासन विद्यापीठा'कडून त्यांना मानद डॉक्टरेट उपाधी प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मंगळवारी हा सोहळा पार पडला. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्रिमंडळातील भाजपचे मंत्री, आमदार, प्रमुख पदाधिकारी आणि प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याचे साक्षीदार बनले.
 
'डॉक्टरेट' स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हते. जी शक्ती महाराष्ट्राकडे आहे, ती अन्य कुठल्याही राज्याकडे नाही. ही शक्ती संघटित केली, तर आपल्याला कोणीच थांबवू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे जे उद्दिष्ट ठरवले आहे, त्याचा रास्ता महाराष्ट्रातून जातो. आज ही उपाधी स्वीकारताना माझ्या नजरेसमोर ७५ वर्षांचा महाराष्ट्र दिसतो आहे. २०३५ मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी इथल्या शेवटच्या व्यक्तीचे जीवनमान कसे असेल, याचे मानचित्र तयार करण्याचा प्रयत्न मी करीत आहे. सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी संशोधनाला मी सुरुवात केली आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
 
आज निशब्द झालो - फडणवीस
 
फडणवीस म्हणाले, आज मला शब्द सुचत नाहीत, मी निशब्द झालो आहे. माझ्यासारख्या राजकीय कार्यकर्त्याच्या आयुष्यात असे क्षण क्वचित येतात. हा क्षण ऐतिहासिक आहे. कोयासन विद्यापीठाने १२० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाचा डॉक्टरेट देणे आणि त्याचा बहुमान मला मिळणे, ही माझ्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना आहे. जपानने सातत्याने महाराष्ट्र आणि भारताला मदत केली. हा देश आपला सर्वात जवळचा आणि विश्वासू मित्र आहे. दोन्ही देशातील ऋणानुबंधांमधील दुवा भगवान बुद्ध आहेत. त्यामुळे आपण ही मैत्री अशा उंचीवर घेऊन जाऊ, की संपूर्ण मानवतेचे कल्याण होईल, असे फडणवीस यांनी आश्वस्त केले.
 
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणाले की, "१२० वर्षे जुन्या कोयासन विद्यापीठाने इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला डॉक्टरेट प्रदान केले, तेही आपल्या सर्वांचे मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस यांना आणि त्या क्षणाचे साक्षीदार होता आले, याचा सार्थ अभिमान आहे. जपानची सर्वाधिक २२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. त्यामुळे आपल्यातील संबंध मैत्रीतून युतीकडे घेऊन जाणारे आहेत. जपानमध्ये शिक्षणाचे जे मॉडेल तयार झाले, त्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात नवे बदल घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."
 
जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता म्हणाले की, "कोयासन विद्यापीठ पहिल्यांदाच डॉक्टरेट प्रदान करणार आहे, ही बाब कानावर आली होती. पण, ते देवेंद्र फडणवीस यांना दिले जाणार हे कळल्यावर १२० वर्षांनंतर त्यांनी हा निर्णय का घेतला, याचे महत्त्व अधोरेखीत झाले. मुंबईत काम करताना फडणवीस यांची वेळोवेळी मदत झाली. हा मनुष्य समाजात बदल घडवण्यासाठी जन्माला आला आहे. त्यांनी महाराष्ट्रात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतले, ज्यांच्यामुळे येत्या काळात या राज्याचा कायापालट झालेला दिसेल. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा."
 
तसेच कोयासन विद्यापीठाचे प्राध्यापक इन्युई रुनिन म्हणाले की, "कोयासन विद्यापीठातर्फे पहिली डॉक्टरेट देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करताना अत्यानंद होत आहे. आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. यापुढे जपान आणि महाराष्ट्रातील संबंध वृद्धिंगत होतील आणि आपण सगळे मिळून जगाला शांततेच्या मार्गाने घेऊन जाऊ, ही अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करतो."





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121