मुंबई ( विशेष प्रतिनिधी) - चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या मृत्यूच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या चार दिवसात जिल्ह्यात तीन वाघांचा मृत्यू झाला आहे. आज सोमवार दि.२५ डिसेंबर रोजी सावली वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचा मृतदेह आढळून आला. गेल्या दीड महिन्यात चंद्रपूरात सात वाघांचा मृत्यू झाला असून यंदा राज्यात मृत्यूमुखी पडलेल्या वाघांची संख्या ५० वर गेली आहे.
सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या व्याहाड (खुर्द) उपवन क्षेत्रामधील कापसी बीट परिसरात वाघाचा मृतदेह आढळून आला. गोसेखुर्द कालव्यालगत असणाऱ्या शेतात वाघाचा मृतदेह सापडला आहे. वन विभागाने मृतदेह ताब्यात घेतला असून मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. रविवारी जिल्ह्यातील नाभगीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रातील गोविंदपूर शेतशिवारात काही शेतकऱ्यांना विहीरीत वाघाचा मृतदेह आढळला होता.
दीड महिन्यात जिल्ह्यात सात वाघांचा मृत्यू -
१४ नोव्हेंबर- चिमूर वनपरिक्षेत्र- झुंजीत मृत्यू
१८ नोव्हेंबर-ताडोबा- नैसर्गिकरित्या
१० डिसेंबर- वरोरा वनपरिक्षेत्र- अपघात
१४ डिसेंबर- पळसगाव वनपरिक्षेत्र- नैसर्गिकरित्या
२१ डिसेंबर- सिंदेवाही वनपरिक्षेत्र- विद्युत करंट
२४ डिसेंबर- तळोधी वनपरिक्षेत्र- विहिरीत पडून
२५ डिसेंबर- सावली वनपरिक्षेत्र - कारण अस्पष्ट