‘काळ्या चिमणीची राख फुंकल्याने तुमचे प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर अधिक प्रेम करू लगतात,’ असा संवाद आपण एका चित्रपटात ऐकला असेल किंवा २१ नखांचे कासव घरात ठेवल्याने धनलाभ होतो, अशा या काही सुखावणार्या असल्या तरी शेवटी अंधश्रद्धाच! मात्र, या अंधश्रद्धांमुळे नाहक बळी जातो, तो वन्यजीवांचा. वन्य प्राणी आणि वनस्पतींचा बेकायदेशीर व्यापार म्हणजेच वन्यजीव तस्करी. या तस्करीमुळे जगाच्या पर्यावरण, जैवविविधता, अर्थव्यवस्था, प्रशासन आणि आरोग्यावर प्रचंड नकारात्मक परिणाम जाणवतो. बघायला गेले तर हा आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीचा एक प्रकार. तस्करीच्या प्रक्रियेमध्ये केवळ देवाणघेवाण नाही, तर संरक्षित वन्यजीवांची शिकार करणे आणि त्यांना बेकायदेशीरपणे पकडणे यांचादेखील समावेश आहे.
’वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर’ (WWF) नुसार ड्रग्ज तस्करी, मानवी तस्करी आणि बनावटगिरीनंतर वन्यजीव तस्करी हा आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीचा चौथा सर्वात मोठा प्रकार. भारत देश हा (CITES) ’कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एन्डेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फौना अॅण्ड फ्लोरा’चा भाग असूनही, सध्या वन्यजीव तस्करी होत असलेल्या २० देशांच्या यादीमध्ये आहे. त्याचबरोबर हवाई मार्गाने वन्यजीव तस्करी करणार्या, पहिल्या दहा देशांपैकी एक आहे. अवैध जीवंत वन्यजीव आणि वन्यजीव उत्पादनांसाठी भारत एक स्रोत तसेच एक पारगमन देश म्हणून काम करतो. जगातील आठ टक्के वन्यजीव भारतात आहेत. अनेक देशांशी सीमा असल्यामुळे तसेच या विशाल वैविध्यपूर्ण स्वरुपामुळे बेकायदेशीर वन्यजीव वस्तू देशांतर्गत बाजारपेठेत आल्यावर ‘ट्रेस’ करणे खूप कठीण होते.
याशिवाय वन्यजीवांच्या अवैध व्यापाराविरुद्धचा लढा अन्य कारणांमुळेही अधिक बिकट झाला आहे. यामध्ये चीन, म्यानमार आणि इतर आग्नेय आशियाई देशांसह सीमासुरक्षेअभावी होणारी तस्करी, वाढती विमान वाहतूक आणि वाढते बाजार तसेच वेगाने विस्तारणारे विमानतळ क्षेत्र आणि वन्यजीव तस्करांकडून सोशल मीडियाचा ऑनलाईन बाजारपेठ म्हणून वापर या कारणांचा समावेश आहे. या आधी तस्करीसाठी कायद्याचा देखील दुरुपयोग पाहायला मिळाला आहे. सन २०२० मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (MOEFCC) जारी केलेल्या ‘ऐच्छिक प्रकटीकरण योजने’चा गैरवापरही भारतातील विदेशी वन्यजीव प्रजातींच्या तस्करांनी केला. वास्तविक, भारतातील विदेशी प्राण्यांच्या वाढत्या बाजारपेठेचे नियमन करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट. या योजनेअंतर्गत भारतीय प्रजातींच्या व्यापारावर पूर्ण बंदी घालण्यात आली. तसेच भारतीयांना दि. १५ मार्च २०२१ पूर्वी कोणत्याही कागदपत्रांशिवाय विदेशी वन्य प्रजातींचा ताबा जाहीर करण्याची परवानगी देण्यात आली होती.
अलीकडील आकडेवारी पाहता, भारतातून गेंड्याच्या शिंगांच्या व्यापार आणि तस्करीत घट झाल्याचे दिसून येते. राष्ट्रीय उद्यानांमधील वाढलेला पहारा आणि विविध यंत्रणांचा वापर करून तस्करांच्या मुसक्या आवळल्यामुळे ही घट झाली आहे. या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो बजावत आहे. संघटित वन्यजीव गुन्ह्यांविरोधात लढण्यासाठी, या ब्युरोची स्थापना करण्यात आली. ही पथके कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी आणि वनीकरण कर्मचार्यांना प्रशिक्षण देतात आणि आवश्यक तेथे कायदेशीर साहाय्य प्रदान करतात. तस्करीविरोधी उपक्रमांमधील एक उल्लेखनीय प्रकल्प म्हणजे ’ऑपरेशन सॉफ्ट गोल्ड.’ या प्रकल्पांतर्गत तिबेटी काळवीट (शहतोष)च्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी पाऊले उचलली जातात.
गेल्या आठवड्यात वन्यजीव तस्करीचा प्रयत्न ’महसूल गुप्तचर संचालनालया’ने (डीआरआय) हाणून पाडला. लखनौमध्ये अवैध आंतरराज्य वाहतुकीशी संबंधित एका व्यक्तीकडून ४३६ लहान भारतीय टेंट कासवांची सुटका करण्यात आली. दरवर्षी जागतिक स्तरावर, आंतरराष्ट्रीय वन्यजीव व्यापाराची उलाढाल २३ अब्ज डॉलरपर्यंत असल्याचा अंदाज आहे. आता या वन्यजीव व्यापारात दोन भाग आहेत. काही ठिकाणी वन्य परिसरातून या प्राण्यांना पकडून, त्यांची तस्करी केली जाते किंवा रीतसर कुक्कुटपालन, मेंढीपालन केल्यासारखे त्यांना वाढविले आणि विकले जाते. प्रकार कोणताही असो, वन्यजीवांची जागा त्यांच्या नैसर्गिक आवासात आहे, आपल्या घरात नाही!