मुंबई (विशेष प्रतिनिधी) - चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी वनपरिक्षत्रामध्ये रविवार दि. २४ डिसेंबर रोजी विहीरीत वाघाचा मृतदेह आढळून आला. गोविंदपूर शिवारात ही घटना घडली. चार दिवसांपूर्वीच ब्रम्हपूरी वनपरिक्षेत्रामध्येच विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ही घटना समोर आली आहे. यामुळे यंदा राज्यात मृत्यूमुखी पडलेल्या वाघांची संख्या ४९ वर गेली आहे.
नाभगीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रातील गोविंदपूर शेतशिवारात काही शेतकऱ्यांना विहीरीत वाघाचा मृतदेह आढळला. शिकारीच्या प्रयत्नामध्ये असताना हा वाघ विहीरीत पडल्याचा अंदाज आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखल होऊन दुपारी वाघाच्या मृतदेहाला विहीरीबाहेर काढले. दोन दिवासांपूर्वीच हा वाघ विहीरीत पडल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तो नर आहे.