पुणे : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण आणि रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या क्षणाला ऐतिहासिक बनविण्याची तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देशातील नामवंत लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातील केशव शंखनाद पथकालादेखील खास निमंत्रित करण्यात आलं आहे.
शंखनाद पथकाला कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महामंत्री चम्पत राय यांनी पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांना आमंत्रण पत्र दिलं आहे. येत्या १८ जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसंच २२ जानेवारी रोजी मंदिराचा भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल. एकीकडं श्रीरामांच्या मूर्तीचं खास वस्त्र हे पुण्यात बनत आहे, तर दुसरीकडे केशव शंखनाद पथकातील तब्बल १११ वादक हे अयोध्येत जाऊन शंखनाद करणार आहेत. ही पुण्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की," अभिमानास्पद! प्रभू श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी पुण्यातील शंखनाद पथकाला निमंत्रण देण्यात आले असून आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे."
पुढे बोलताना ते म्हणाले की, "गेल्या अनेक वर्षांपासून केशव शंखनाद पथकाच्या माध्यमातून पुण्यातील मंदिरांमध्ये तसेच धार्मिक, गणेश मंडळांच्या मिरवणुकीत शंखनाद करण्यात येतो. आमच्या पथकात पाचशेहून अधिक वादक आहेत. यात ९० टक्के महिला आहेत. विशेष म्हणजे यात ५ वर्षे ते ८५ वयोगटातील वादकांचा समावेश आहे. आम्हाला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलं, तेव्हा खूप आनंद झाला. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी पथकाचे १११ वादक १८ जानेवारीला अयोध्येला जाणार आहेत."
श्रीरामांच्या मूर्तीचे खास वस्त्र पुण्यात तयार होत आहे.
प्राणप्रतिष्ठापना होणाऱ्या श्रीरामांच्या मूर्तीचे वस्त्र हे खास पुण्यातून दिले जाणार आहे. पुण्यातील अनघा घैसास यांच्या हँडलूम संस्थेकडून श्रीरामाचे वस्त्र तयार करण्यात आले आहे. तसंच ज्या भाविकांना श्री राम मंदिराच्या उभारणीमध्ये आपलं योगदान द्यावं वाटतंय, त्यांच्यासाठी 'दो धागे श्रीराम के लिये' हा खास उपक्रम राबवण्यात आलाय. १० डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात आला होता.