चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी नुकताच व्हिएतनामचा दौरा करत, दोन्ही देशांतील संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न केला. विस्तारवादाची रणनीती वापरत, हातपाय पसरणारा. चीन व्हिएतनामच्या बाबतीत इतकी नरमाई का दाखवतोय, अमेरिकेच्या वाढत्या प्रभावामुळे चीन व्हिएतनामला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करतोय का, असे होत असेल तर व्हिएतनाम हा चीन आणि अमेरिका यांपैकी कुणाची निवड करेल, हा प्रश्नच आहे. व्हिएतनामच्या उत्तरेला चीन तर पश्चिमेला लाओस आणि कंबोडिया हे देश आहेत. थायलंडच्या खाडीद्वारे थायलंडसोबत दक्षिण चीन समुद्राद्वारे फिलिपाईन्स, मलेशिया आणि इंडोनेशियासोबत व्हिएतनामची सागरी सीमा जोडलेली आहे. व्हिएतनाम सर्व देशांना जुळवून घेण्यात माहीर आहे. याला ‘बांबू डिप्लोमसी’ असेही म्हटले जाते.
चीन व्हिएतनामचा सर्वात मोठा आर्थिक सहकारी आहे. दोन्ही देशांत दक्षिण चीन समुद्रात बेटं आणि संसाधनांवरून नेहमीच कुरबुरी सुरू असतात. जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था चीनची असून, दक्षिण चीन समुद्राच्या माध्यमातून सर्वाधिक व्यापार होतो. जवळपास 64 टक्के व्यापार या मार्गाद्वारे होते, त्या तुलनेत अमेरिकेचा अवघा 14 टक्के व्यापार या जलमार्गाद्वारे होतो. एकीकडे चीनच्या विस्तारवादाचा व्हिएतनाम प्रखर विरोध करतो. तसेच अमेरिका भारत आणि अन्य देशांसोबत संरक्षण आणि विकासाधारित सहकार्य बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे. चीन व्हिएतनामला आपला सहकारी आणि शेजारी मानतो. चीन व्हिएतनामचे अन्य देशांसोबत असलेले संबंधही दुर्लक्षित करत नाही. याच वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी व्हिएतनामचा दौरा केला होता. त्यामुळे जिनपिंग यांच्या या दौर्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
दक्षिण चीन समुद्रातील अनेक बेटांवर व्हिएतनाम आपला दावा सांगत असल्याने, चीन व्हिएतनामला आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्नरत आहे. जिनपिंग यांच्या दौर्यामध्ये संरक्षणांसह अनेक करार करण्यात आले. 1955 साली सोव्हिएत संघाच्या पतनानंतर व्हिएतनामने चीनसोबतचे संबंध सामान्य केले होते. बीजिंगसोबत मैत्री करण्यास आम्ही प्राधान्य देत असल्याचा विश्वास आणि अन्य देशांसोबत संबंध सुधारणे ही चीनविरोधी नीती नाही, असे दाखवून देण्यात व्हिएतनाम नेहमीच यशस्वी ठरत आला आहे. चिनी आक्रमणाला थोपविण्यासाठी आणि हनोईच्या 70 व 80च्या दशकातील विनाशकारी संघर्ष पुन्हा होऊ नये, यासाठी व्हिएतनामने अगदी मुत्सद्दीपणाने चीनसोबत सुरक्षित अंतर राखण्याचा प्रयत्न केला.
व्हितनामच्या सागरी क्षेत्रात चीनने ‘एचडी ९८१’ तेल जहाज स्थलांतरित केल्याने, २०१४ साली दोन्ही देशांत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. त्यावेळी व्हिएतनामने याचा तीव्र विरोध केला व शांततेने यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. जुलै २०१७मध्ये दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनामच्या हालचालींवरून चीनने हल्ला करण्याची धमकी दिली. यानंतर पुन्हा ’बांबू डिप्लोमसी’अंतर्गत व्हिएतनामने चिनी परराष्ट्र मंत्र्यांच्या हनोई दौर्याचे स्वागत करत, वादावर पडदा टाकला. या स्थितीत व्हिएतनाम अतिशय चतुराईने अमेरिकेसोबत आपली मैत्री वाढवत गेला. ज्यामुळे चीन चिंतेत होणे स्वाभाविक होते.
दोन बलशाली राष्ट्रांच्या कचाट्यात अडकूनही व्हिएतनामने आपले स्वतंत्र अस्तित्व कधीही डागाळू दिले नाही. व्हिएतनामने संरक्षणाची बाजू मजबूत करण्यासाठी अमेरिका, रशिया, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशांसोबत मैत्रीचा हात पुढे केला. अनेक बड्या कंपन्या आता चीनऐवजी व्हिएतनामला प्राधान्य देत आहेत. अमेरिकेनेही व्हिएतनामला भरभरून मदत केली. त्यामुळे जागतिक स्तरावर आपली ओळख मजबूत करत असताना, चीनचाही सामना व्हिएतनामला करावा लागत आहे. भारतानेही व्हिएतनामला ‘इन सर्व्हिस मिसाईल कार्वेट’ आणि ‘आयएनएस कृपाण’ भेट म्हणून दिले आहे. त्यामुळे भारत आणि व्हिएतनामची मैत्रीही दिवसेंदिवस बहरू लागली आहे. जुलै २००७ मध्ये दोन्ही देशांत राजकीय संबंध स्थापन करून, २०१६ साली त्यांना व्यापक स्वरूप देण्यात आले. व्हिएतनाम भारताचा पंधरावा सर्वात मोठा आर्थिक सहकारी आहे. एकूणच व्हिएतनाम आपल्या ‘बांबू डिप्लोमसी’द्वारे अनेक शक्तिशाली राष्ट्रांशी समन्वय साधत, स्वतःची विकासनीती यशस्वी करतोय, हे मात्र नक्की.
7058589767