नवी दिल्ली : कोणत्याही परिस्थितीत अतिरेकी विचारसरणी व कृत्यांना थारा मिळू नये, असे मत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेतील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याविषयी व्यक्त केले आहे.
अमेरिकेत झालेल्या हिंदूंच्या मंदिरावरील हल्ल्याविषयी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, हल्ल्याविषयी सविस्तर माहिती घेण्यात आली आहे. अतिरेकी, फुटीरतावादी अशा शक्तींना भारताच्या विरोधात परदेशात थारा मिळता कामा नये. अमेरिकेतील भारताच्या वाणिज्य दूतावासाने सरकार आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे असून पुढील चौकशी सुरू असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील नेवार्क येथील एका मंदिरात खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला आहे. त्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. अमेरिकेच्या हिंदू-अमेरिकन फाऊंडेशननेही सोशल मीडियावर हल्ल्याची छायाचित्रे प्रसारित केली असून खलिस्तानींनी कॅलिफोर्नियातील नेवार्क येथील स्वामीनारायण मंदिर वासना संस्थेला लक्ष्य केल्याचे त्यांनी म्हटले आहे.खलिस्तान्यांनी मंदिराच्या भिंतींवर ‘खलिस्तान झिंदाबाद’, ‘शहीद भिंद्रनवाले झिंदाबाद’ असे लिहिले आहे.