भारतीय लोकसाहित्य अभ्यास क्षेत्रात क्रांतिकारक झेप

लोकसाहित्य संशोधन मंडळ, महाराष्ट्र

    23-Dec-2023
Total Views | 60
Article on -padma-shri Dr. Prabhakar Mande

छत्रपती संभाजीनगरात एक संस्था मोठ्या उमेदीने, क्रांतिकारक कार्यासाठी, लोकसाहित्याच्या अभ्यास क्षेत्रात १९७७ मध्ये अस्तित्वात येत होती. डॉ. प्रभाकर मांडे यांच्या तळमळीने, जिद्दीने आणि संशोधन दृष्टीने ही संस्था साकारत होती. ‘लोकसाहित्य संशोधन मंडळ’ असे या संस्थेचे नाव निश्चित झाले होते. राज्यव्यापी लोकसाहित्य परिषदेच्या स्वरुपात, या संस्थेच्या कार्याचा शुभारंभ होणार होता. परिषदेचे अध्यक्षस्थान महाराष्ट्रातील ख्यातकीर्त विदुषी, ‘लोकसाहित्य’ याच दुसर्‍या नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या, डॉ. दुर्गा भागवत भूषवणार होत्या. पहिल्याच ’लोकसाहित्य परिषदे’स उपस्थित राहून, शोधनिबंध सादर करण्याचे भाग्य मलाही मिळाले होते. डॉ. दुर्गा भागवतांच्या उपस्थितीने ’लोकसाहित्य संशोधन मंडळा’ला अभ्यास क्षेत्रात संशोधन कार्याच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे स्थान आणि परिमाण आपसूकच लाभले. याही दृष्टीने ही घटना ऐतिहासिक आणि क्रांतिकारक होती. अशासकीय स्वरुपात केवळ अभ्यासासाठी अभ्यास करणारी संस्था, अभ्यासकांच्याच जिद्दीने, अस्तित्वात येत होती, हीदेखील तेवढीच क्रांतिकारक घटना होती.

दूरदृष्टीने संस्था संकल्प

डॉ. प्रभाकर मांडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक होते. क्षेत्रीय लोकसाहित्य अभ्यासपूर्वक संकलित-संपादित करून, जगातील विविध देशांमध्ये आणि विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये सुरू असलेल्या विद्यापीठातील पद्धतशीर अभ्यासाकडे त्यांचे लक्ष गेले. असा अभ्यास भारतात घडला पाहिजे, असा ठाम निश्चय करून, त्याप्रमाणे आपल्या संकलित, लोकसाहित्याचा अभ्यास त्यांनी केला. त्याच प्रबंधावर ’पीएचडी’ प्राप्त करून, एक प्रकारे अभ्यास दिशा आणि पद्धतीला विद्यापीठीय मान्यता प्राप्त करून घेतली. यापूर्वी डॉ. दुर्गा भागवत यांच्या लोकसाहित्यावरील प्रबंधावर रण माजले होतेच. विषयाचे आकलन तर दूरच, महत्त्वच माहीत नसल्याने, भारतातील विद्यापीठांनी प्रबंध नाकारला. ऑक्सफर्ड विद्यापीठाने ‘पीएचडी’ पारित केली. भारतातील लोकसाहित्याच्या अभ्यासाला निश्चित परिमाण मिळाले. डॉ. दुर्गा भागवत यांच्या प्रबंधावर ‘वरदा’ प्रकाशनाने पुस्तक सिद्ध केले. ’लोकसाहित्याची रुपरेखा’ या पुस्तकाने मराठी लोकसाहित्याच्या अभ्यास क्षेत्राला, पायाभूत सैद्धांतिक विचार मिळाला. डॉ. प्रभाकर मांडे यांचे, त्यांच्या प्रबंधावर आधारित ‘लोकसाहित्याचे अंतःप्रवाह’ पुस्तक, ’परिमल’ प्रकाशनाने प्रसिद्ध केले. या पुस्तकाने अभ्यासाला दिशा दिली.
 
डॉ. प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्याच्या विश्वव्यापक अभ्यासाचे चिंतन केले. सर्व ज्ञानशाखांना अभ्यासासाठी पायाभूत, मौखिक सामग्री मिळविण्याचे काम (Folk Lore) कसे करते, याविषयी मांडणी करण्याचा प्रयत्न केला. लोकसाहित्य अभ्यासाचे अनेक प्रयत्न भारतात अर्थात महाराष्ट्रातही सुरू होतेच. त्या अभ्यासाचे स्वरूप मात्र प्रामुख्याने संकलन आणि संपादन असे होते. त्यावरून भाषाभ्यास करावा, असे होते. खरे तर ही परंपरा सिरामपूर मिशनपासून आणि ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला पूरक उपाय म्हणून हेतूपूर्वक सुरूच होती. असे असले तरी या अभ्यासाला सर्व ज्ञानशाखांना पायाभूत सामग्री देणारी परंपरा या दृष्टीने लोकसाहित्याच्या अभ्यासाला व्यापक सैद्धांतिक स्वरूप आवश्यक आहे, हे दुर्दैवाने लक्षात घेतले गेले नव्हते. लोकसाहित्याचा अभ्यास संकलन, संपादन आणि त्यातील सांस्कृतिक आशय गहिवरून उलगडून दाखवण्याच्या दृष्टीने होत होता. खूप मोठी मोठी माणसं यात गुंतली होती. साने गुरुजी हे त्यातील सर्वांना माहीत असलेले नाव. अशा परिस्थितीत लोकसाहित्याभ्यासासाठी अर्थात मौखिक परंपरेवर आधारित मंत्रसामर्थ्यप्राप्त वाङ्मय संकलनाची परंपरा सर्व ज्ञानशाखांच्या अंगाने भारतात सुरू होती, त्याकडे डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. दुर्गा भागवत यांसारख्या काही मोजक्याच विद्वानांचे लक्ष वेधले गेले होते. वैयक्तिक पातळीवर त्यांचे अभ्यास प्रयत्न सुरू होतेच. लोककला, गंमत, विधी नाट्ये आदी प्रकारांतून समग्र संस्कृतीचे धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांसह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वाङ्मयीन असे समग्र जागरण होते. यांविषयी काही लोक अभ्यास करीत होते. ’मराठी लावणी वाङ्मय’ हा डॉ. गंगाधर मोरजे यांचा यासंदर्भातील प्रयत्न लक्षणीय होता. या सर्व गोष्टींचा बारकाईने आणि सर्वंकष विचार डॉ. प्रभाकर मांडे करीत होते. त्यांनी मनाशी दोन निश्चय केले. (१) ’Folk Lore’चा अभ्यास विद्यापीठीय स्तरावर सुरू झालाच पाहिजे आणि (२) ’Folk Lore’चा व्यापक सैद्धांतिक आणि विविध शास्त्रांच्या अनुषंगाने शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे.

१९७५-७६मधील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या गडबडीत, एका बाजूला डॉ. दुर्गा भागवत, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. तारा परांजपे, नरहर कुरुंदकर, डॉ. तारा भवाळकर, डॉ. गंगाधर मोरजे, डॉ. द. ग. गोडसे आदी लोकांना आपल्या चिंतनांतून प्रकटलेल्या संकल्पांचे महत्त्व आणि स्वरूप पटवून देण्यात डॉ. प्रभाकर मांडे यशस्वी झाले. या चर्चेतूनच ’लोकसाहित्य संशोधन मंडळ’ संस्था संकल्प आकारला! या संकल्पानुसार डॉ. प्रभाकर मांडे यांनी ’लोकसाहित्य संशोधन मंडळ’ संस्था रजिस्टर केली. या संस्थेची पहिली ’लोकसाहित्य परिषद’ संभाजीनगरमध्ये महत्प्रयासाने आयोजित केली. महत्त्वाच्या दिग्गज लोकांची साथ, डॉ. प्रभाकर मांडे यांचा निश्चय आणि जिद्द यांमुळे ही परिषद अतिशय यशस्वी झाली. परिषदेत अध्यक्षाने बीजभाषण करावे, भाषणाचा मसुदा आदी दिशा अगोदरच निश्चित केलेली असावी. त्यानुसार, अनुषंगाने विविध विषयांवर अभ्यासकांकडून शोधनिबंध मागवावेत, ते तज्ज्ञ मंडळांसमोर सादर करावेत, त्यावर साधकबाधक आणि दिशादर्शक चर्चा व्हावी, ते शोधनिबंध प्रसिद्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत, अशा समग्र विचाराने झालेली ही परिषद डॉ. दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. डॉ. प्रभाकर मांडे यांनी भागवत, वारकरी संप्रदायाप्रमाणे लोकसाहित्याचा निरपेक्ष, श्रद्धेने अभ्यास करणारांची एक फळी निर्माण करण्याचा संकल्प केला आणि ते कामाला लागले.
’लोकसाहित्य संशोधन मंडळ’ संस्था चालविणे एक दिव्य

१) भारतीय परंपरेत लोकसाहित्याच्या अभ्यास क्षेत्राला ‘लोकवाङ्मय’, ‘लोकविद्या’, ‘लोकधाटी’ आदी अनेक नावे, मनःपूतपणे वापरण्याची प्रथा होती. डॉ. दुर्गा भागवतांनी वापरलेला ’लोकसाहित्य’ हा शब्द प्रचलित करायचा निर्णय झालेला होता. त्याचा अनुसार करणे भाग होते. ’साहित्य’ या शब्दाने अनेक घोटाळे आणि चकवे निर्माण होणे क्रमप्राप्त होते. ’साहित्य’ या शब्दात शाब्द किंवा वाङ्मय परंपरा, वर्तन किंवा देहबोली परंपरा आणि साधन परंपरा या सर्व परंपरांचा समावेश आहे, हे ठसवायचे होते.

२.) महाराष्ट्रात ’लोकसाहित्य समिती महाराष्ट्र राज्य’ अशी शासकीय समिती स्वतंत्रपणे शिक्षण विभागात कार्यरत होती. डॉ. दुर्गा भागवत, त्यानंतर डॉ. सरोजिनी बाबर या अध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या. शासकीय स्तरावरून ग्रंथरुपाने, संकलित-संपादित पुस्तके, चांगल्या मानधनासह लोकसहभागातून निर्माण होत होती, त्यांचे स्वरूप सैद्धांतिक तर नव्हतेच, त्याचबरोबर सांस्कृतिक गहिवरवादाचा अतिरेक करून, ती पुस्तके प्रकट होत होती. त्यांना सैद्धांतिक बैठक प्राप्त करून, देण्याची जबाबदारी या अशासकीय मंडळाने स्वीकारली होती.

३) परिषदा भरवायच्या, त्यात केवळ संशोधन दृष्टी ठेवायची, हे काम लोकव्यवहाराच्या दृष्टीने खूपच कठीण होते. डॉ. मांडे आणि तत्सम अभ्यासू मंडळी, अभ्यासाकरिता अभ्यास या दृष्टीने तरूण अभ्यासकांनी पुढे यावे, अशी अपेक्षा करीत होते. पदरमोड करून परिषदेला यायचे आणि पदरमोड करून क्षेत्रीय अभ्यास करायचा या दोन्ही गोष्टी अवघड होत्या. क्षेत्रीय अभ्यासासाठी साधने अद्याप विकसित होत होती. लोकसंपर्क करणेही व्यावहारिक सभ्यतेच्या दृष्टीने खूप कठीण होते.

४) मौखिक किंवा शाब्दपरंपरा, वर्तन किंवा देहबोली परंपरा आणि साधन परंपरांचा केवळ लेखनस्वरुपात अभ्यास करायचा, म्हणजे केवळ वर्णनात्मक आणि आशय उलगडणारा अभ्यास करणे भाग होते. या अभ्यासाच्या प्रयोगशाळा म्हणजे समस्त व्यापक समाज असेच स्वरूप होते.

लोकसाहित्य परिषदांच्या माध्यमातून अडचणींवर मात

डॉ. प्रभाकर मांडे आणि समविचारी यांनी, ‘लोकसाहित्य संशोधन मंडळा’च्या माध्यमातून भरविल्या जाणार्‍या राज्यस्तरीय, विभागस्तरीय, स्थानिक, बृहद् महाराष्ट्रव्यापी परिषदांच्या माध्यमातून सर्व अडचणींवर मात केली. एक चळवळ उभी राहिली. १) महाराष्ट्रातील जणू विषयांतर्गत विद्यापीठांमधून मराठी ‘लोकसाहित्य’ हा १०० गुणांचा स्वतंत्र पर्यायी अभ्यासक्रम स्वीकृत झाला. अभ्यासक्रम स्वीकृतीमुळे, अभ्यासासाठीची पुस्तके, संदर्भग्रंथ यांच्या निर्मितीला वाव मिळाला. अभ्यासाला नोकरीची संधी प्राप्त झाली. याच समांतर लोकसाहित्य अभ्यासावर मराठी विषयांतर्गत ’पीएचडी’ प्राप्त करणे मान्य झाले. २) सर्वच विद्यापीठांमध्ये हळूहळू विद्यार्थी अभ्यासक पसरले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात या विद्यार्थी अभ्यासकांच्या साहाय्याने व लोकसाहित्य संशोधन मंडळाच्या विद्यमाने परिषदा भरविल्या जाऊ लागल्या. ३) डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. दुर्गा भागवत, डॉ. गंगाधर मोरजे आदी दिग्गजांनी अभ्यासक्रमाला अनुसरून उपयुक्त अभ्यास पुस्तके प्रसृत केली. डॉ. प्रभाकर मांडे यांनी ’लोकसाहित्याचे स्वरूप’ हे पुस्तक थेट प्रश्नपत्रिकेला अनुसरून लिहिले. डॉ. तारा भवाळकर, डॉ. अनिल सहस्रबुद्धे, डॉ. प्रकाश खांडगे, डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. मधुकर वाकोडे आदी लोक यासाठी आघाडीवर राहिले. आज लोकसाहित्यविषयक अक्षरशः हजारो पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत आणि शेकडो ’पीएचडी’ पारित केलेले लोकसहित्य विशारद कार्यरत आहेत. ४) लोकसाहित्य अभ्यासाला विद्यापीठीय मान्यता मिळाल्याने, विविध महाविद्यालयांनी विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान मंडळ यांच्या साहाय्याने अभ्याससत्र भरविण्यास सुरुवात केली. ‘लोकसाहित्य संशोधन मंडळ’ आणि विशिष्ट महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, परिषदा भरविल्या जाऊ लागल्या. आर्थिक प्रश्नही काहीसा मार्गी लागला. ५) दृक्-श्राव्य साधनाची उपलब्धता, मानधनाची उपलब्धता यांमुळे प्रत्यक्ष क्षेत्रीय अभ्यासाचे परिषदांमध्ये सादरीकरण सुरू झाले. अभ्यासाला गती मिळाली. परिषदांची संख्या वाढली तशी अभ्यासकांची संख्याही वाढली. वेगवेगळे प्रयोग परिषदांमध्ये होऊ लागले.

परिषदांची मालिका

संशोधकांचे शोधनिबंध सादरीकरण, प्रात्यक्षिके यांसह संपन्न होणार्‍या परिषदांची गत ४५ वर्षांत मालिकाच पाहावयास मिळते. १९७७ साली संभाजीनगरात डॉ. प्रभाकर मांडे यांच्या पुढाकाराने चळवळ स्वरूप ’लोकसाहित्य संशोधन मंडळा’ची सुरुवात झाली. २०२२ पर्यंत प्रत्यक्ष ’लोकसाहित्य परिषदा’ ४५हून अधिक भरविल्या गेल्या. त्याव्यतिरिक्त चर्चासत्रांच्या स्वरुपात आणि आदिवासी, दलित, मुस्लीम, कृषी, महिला यांच्या संदर्भाने, केवळ विधी नाट्ये, तमाशा, लोकनृत्ये यांच्या संदर्भाने, पारुशी भाषा वा पारध्यांसारख्या जमातींच्या संदर्भाने झालेली विशिष्ट चर्चासत्रे वेगळीच. यातूनच आज लोकसाहित्याचे महाराष्ट्रातही स्वतंत्र विद्यापीठ असावे, असा विचार पुढे आला. डॉ. प्रभाकर मांडे या नावाचे एक स्फुल्लिंग या अभ्यास क्षेत्रात भारतीय परंपरेच्या संदर्भाने स्फुरले. त्याचा अक्षरश: वटवृक्ष झाला. देश-विदेशातील अभ्यासक भारतीय परंपरांचा अभ्यास करण्यास सरसावले. डॉ. प्रभाकर मांडे असे ’लोकसाहित्यच’ झाले!

परिषदांच्या स्थानांचा वानगीदाखल विचार करावयाचा तर छत्रपती संभाजीनगरला डॉ. दुर्गा भागवतांच्या अध्यक्षतेखाली, जुन्नर येथे डॉ. रामचंद्र ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली, सांगलीला सुमित्राराजे पंत, अहमदनगरला डॉ. सरोजिनी बाबर यांच्या अध्यक्षतेखाली, मधु मंगेश कर्णिक, चुमर चुंडल आणि डॉ. सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत अशा १९८६, १९९०, २००६-०७ आणि २०१८ अशा चार परिषदा झाल्या. अंबड, श्रीगोंदा, पणजी-गोवा या तीन परिषदा डॉ. गुंथूर सोनथायमर यांच्या उपस्थितीत झाल्या. याशिवाय किनवट, लातूर, अहमदपूर, धुळे, पंढरपूर, जळगाव, अमळनेर अशा जवळपास महाराष्ट्रात सर्व ठिकाणी परिषदा झाल्या. या सर्व परिषदांचा एकत्रित फलित, अभ्यास मांडायचा ठरविले, तर खंडात्मक मांडणी करावी लागेल. डॉ. प्रभाकर मांडे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या, संभाजीनगर येथील शिक्षण संस्थेच्या साहाय्याने ’लोकसाहित्य संशोधन मंडळा’चा जवळपास प्रतिवर्षी एक परिषद भरविण्याचा विक्रम झाला. यातील प्रत्येक परिषद विशिष्ट विषयाला वाहिलेली आणि सैद्धांतिक तथा लोक-संस्कृतीचा समग्र अभ्यास करणारी होती, हे गौरवाने सांगितले पाहिजे. बदलते संदर्भ आणि बदलती रुपे, लोकसाहित्य नित्य वर्तमान असते, लोकसाहित्य हे स्वतंत्र अभ्यास क्षेत्र आहे, लोकतत्त्वीय तथा लोकबंधात्मक समीक्षा, लोकसाहित्य प्रयोगसिद्ध वाङ्मयकला, लोकसाहित्य-जीवनकला अशा प्रकारचे बीजविचार घेऊन, समग्र सैद्धांतिक अभ्यास मांडणीच्या दृष्टीने या परिषदा भरविण्यात आल्या.

लक्षणीय अशा लोकसाहित्य परिषदा

१) १९८६ मध्ये अहमदनगर महाविद्यालय व ’लोकसाहित्य संशोधन मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ’लोकसाहित्य हे स्वतंत्र अभ्यास क्षेत्र’ आणि ’लोकसाहित्य ही प्रयोगसिद्ध वाङ्मयकला’ या बीज संकल्पनांवर आधारित डॉ. गंगाधर मोरजे यांच्या पुढाकाराने लोकसाहित्य परिषद भरविण्यात आली. येथे ठीकठिकाणांहून लोकसाहित्याचे प्रयोग सादरीकरणासाठी चमू बोलावले गेले. यात मंगळागौर, भोंडला, भलरी जात्यावरच्या ओव्या, मंगलप्रभात गाणी, विधी नाट्ये येथपासून श्रीमती सत्यभामाबाईंच्या माध्यमातून लावणीच्या सर्व प्रकारांची प्रात्यक्षिके सादर करून, यावर डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. मोरजे, डॉ. मांडवकर, कमलाकर सोनटक्के, मधुकर नेराळे यांसह अनेक दिग्गजांनी चर्चा केली. डॉ. सरोजिनी बाबर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या, या परिषदेचे पूर्ण चित्रीकरण करून, अभ्यासकांना अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात आले.

२) २००७ मध्ये डॉ. प्रभाकर मांडे यांच्या अमृतमहोत्सवी गौरवानिमित्त मधु मंगेश कर्णिकांच्या अध्यक्षतेखाली अतिव्यापक अशी बृहद् महाराष्ट्रव्यापी परिषद भरविण्यात आली. पेमराज सारडा महाविद्यालय, ‘लोकसाहित्य संशोधन मंडळ’ आणि ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने, प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या पुढाकाराने ही परिषद ’लोकसाहित्य ः जीवनकला’ या बीज संकल्पनेवर आधारित झाली. शोधनिबंधांचे सादरीकरण आणि लोकसाहित्य प्रयोगांचे सादरीकरण या दोन्हींचा समावेश करून, तीन दिवसीय परिषद झाली. यात विठ्ठल उमप, शाहीर आजाद नायकवाडी, मधु कांबीकर यांसारख्या लोककलावंतांसह आदिवासी ठाकरी नृत्य, बोहाडा अर्थात अखाडी सोंगे, जागरण, गोंधळ आदी विधी नाट्ये, कीर्तन प्रकार एवढेच नव्हे तर लेझीम, टिपर्‍या, मलखांब, पारंपरिक द्वंद्वे असे अनेक प्रकार, खाद्य जत्रा, चित्रकला प्रदर्शने, साधन प्रदर्शने अशांसह प्रयोगसिद्धपणे व चर्चेसह परिषद संपन्न झाली. या सर्व परिषदेचे चित्रीकरण करण्यात येऊन; त्याच्या सीडीज अभ्यासकांना वितरित करण्यात आल्या. या परिषदेवर आधारित ’लोकसाहित्य जीवनकला’ हा ग्रंथही दास्ताने रामचंद्र आणि कंपनीच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला. सर्व विद्यापीठांनी तो संदर्भग्रंथ म्हणून स्वीकारला.

लोकसाहित्य संशोधनव्रती डॉ. प्रभाकर मांडे

डॉ. प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्य संशोधन मंडळाच्या कार्यात खंड पडता कामा नये, ते विस्तारितच गेले पाहिजे, असा ध्यास घेतला. त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत ’किलबिल शाळे’च्या साहाय्याने पदरमोड करून, प्रतिवर्षी एक परिषद भरविण्याचे व्रत डॉ. मांडे यांनी घेतले. या परिषदेत अन्य उपक्रमांबरोबर नव्या संशोधकांच्या कार्याचा ’संशोधन पुरस्कार’ देऊन गौरव करण्याचा उपक्रम सुरू केला. त्यांच्या व्रतस्थतेमुळे लोकसाहित्य संशोधन मंडळाच्या स्वयंसेवी कार्यात खंड पडला नाही.

विविध विद्यापीठांशी संलग्न असलेल्या, कला अकादमी आपल्या कार्याशी जोडण्यात, डॉ. मांडे यांनी यश मिळविले. ’मराठी संस्कृती कोशा’त ’लोकसाहित्य ज्ञानमंडळ’ निर्माण करण्यात यश आले. देश-विदेशात अभ्यासकांना शोधनिबंध सादरीकरणासाठी बळ देण्याचे कार्य त्यांनी केले.

’लोकसाहित्य संशोधन मंडळा’चे लोकसाहित्य महामंडळात आणि लोकसाहित्य विद्यापीठात रुपांतर व्हावे अशी त्यांची दुर्दम्य इच्छा. अगदी अलीकडे नगर येथील निवासात त्यांनी नगर जिल्हा लोकसाहित्य संशोधन मंडळ शाखेच्या माध्यमातून स्वखर्चाने राष्ट्र स्तरीय लोकसाहित्य परिषद संपन्न केली.

सामवेदात्मक स्वरुपात, लोकांमध्ये मौखिक परंपरांच्या माध्यमातून, सनातन भारतीय समग्र संस्कृती नांदते आहे. जगातील या सर्वात प्राचीन संस्कृतीचेच अवशेष जगभरात आढळतात. हा ऐतिहासिक आणि मानववंशशास्त्रीय विश्वास सार्थ ठरविण्याची दुर्दम्य विश्वासासह त्यांची धडपड सुरूच आहे. ही तर अभ्यासाची सुरुवात आहे, ही डॉ. प्रभाकर मांडे यांची धारणा आहे.

डॉ. अनिल सहस्रबुद्धे
९८८१५००९४२
(लेखक लोकसाहित्य, संतसाहित्य यांचे गाढे अभ्यासक, संशोधक असून त्यांचे विपुल ललित साहित्यही प्रसिद्ध झाले आहे.)
(लेख साभार : चतुरंग प्रतिष्ठान)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121