पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे या लोकसाहित्याचा वटवृक्ष असलेल्या समाजशास्त्रज्ञाचे निधन झाल्याने अतिव दुःख झाले. ‘लोकसाहित्य’ या अभ्यासशाखेला विद्यापीठीय आणि अभ्यासकांच्या पातळीवर मांडे यांनी अधिकाधिक ’जाणतं’ केले. त्यामुळे संशोधकांच्या परंपरेत त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागते. त्यांनी लोकसाहित्य संशोधन मंडळाच्या रुपाने महाराष्ट्रात अभ्यासकांची मोठी फळी उभी केली. ’लोकसाहित्य परिषद’ ही चळवळ सरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात यशस्वी सुरू झाली. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकजीवन, लोककला या विषयांचा अभ्यास अधिकाधिक शास्त्रीय कसा होईल, याचा विचार अभ्यासकांमध्ये रूजविण्यासाठी सरांनी अखेरपर्यंत कष्ट केले.
’लोकसाहित्य त्याचे स्वरूप’, ’लोकसाहित्य त्याचे अंतःप्रवाह’, ’लोकगायकांची परंपरा’, ’लोकरंगभूमी’, ’मौखिक वाङ्मयाची परंपरा’, ’लोकमानस ः रंग आणि ढंग’, ’मांग आणि त्यांचे मागते’, ’गावगाड्या बाहेर’, ’लोकसंस्कृती आणि इतिहासदृष्टी’, ’कलगीतुर्याची शाहिरी’ अशा अनेकविध मौलिक ग्रंथांची निर्मिती सरांनी केली व मानववंशशास्त्राच्या अंगाने लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या संशोधनात स्वतःचे सिद्धांतही तयार केले.
आधुनिकता आणि पारंपरिकता हाच सरांच्या चिंतनाचा सातत्याने विषय राहिला. ’लोकल लोककला ग्लोबल झाल्या,’ असे कधी गौरवाने, तर कधी उपहासाने म्हटले जाते. पण, सांस्कृतिक अभिसरणाच्या प्रक्रियेत बदलत्या स्वरुपातील लोकसंस्कृती आणि तिचे चैतन्यशील सत्व असलेल्या प्रयोगात्मक लोककलांचे योगदान फार मोठे आहे आणि भविष्यातही फार मोठे असणार आहे. सामाजिक अस्वस्थता आणि असुरक्षितता वाढली की, जीवनआधाराच्या नव्या वाटा आपण शोधू लागतो. अशा वेळी नव्या वाटांवर लोककलांच्या पताका मोठ्या आश्वासक पद्धतीने आपल्याला खुणावतील आणि जगण्याचे नवे बळ देतील, हे निश्चित! सरांचे कृतिशील विचार लोककलेला व भारतीय संस्कृतीला बळ देणारे आहे.
सरांच्या या अमूल्य योगदानासाठीच सरांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन’, ’मातंग साहित्य परिषद’ आणि ’समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मानित करण्यात आले. ’समरसता साहित्य परिषदे’च्यावतीने १९९८ साली छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या दुसर्या ’समरसता साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद डॉ. मांडे सरांनी अतिशय सन्मानाने भूषविले. ’लोकसंस्कृती आणि समरसता’ या विषयनिष्ठ साहित्य संमेलनात सर लोकसंस्कृती आणि लोकसाहित्यावर भरभरून बोलले. खर्या अर्थाने त्यांनी लोकसाहित्याचे भांडार खुले केले. त्या संमेलनाचे उद्घाटक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. देवदत्त दाभोळकर आवर्जून उपस्थित होते. त्यांनी मराठी सारस्वताची अतिशय अनोखी व्याख्या केली-’सरस ते साहित्य आणि समरस तो साहित्यिक!’
त्यांच्या या विधानाने डॉ. मांडे सरांना मनापासून आनंद झाला आणि तिथेच त्यांनी डॉ. दाभोळकरांना कडकडून मिठी मारली. इतकी शालीनता आणि विनम्रता मांडे सरांच्या ठायी होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीतील कवी-लेखक प्र. ई. सोनकांबळे व साहित्यिक उत्तम बंडू तुपे इत्यादी मान्यवर या संमेलनाला उपस्थित राहिले, ते केवळ डॉ. मांडे सरांच्या स्नेहामुळेच! मांग समाजांवरील ’मांग आणि त्यांचे मागते’ हा संशोधनपर ग्रंथ लिहिताना, त्यांची पुण्यात भेट झाली. यातील नऊ-दहा प्रकरणांपैकी होलार समाजाबद्दल माहिती देण्यासाठी मी आणि आमच्या समाजाचे नेते अॅड. एकनाथ जावीर त्यांना भेटलो. अतिशय परिपूर्ण आणि समाजशास्त्रीय अंगाने ते माहिती घेत होते. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ’होलार - एक कलावंत समाज’ असे प्रकरण आकाराले आले. त्याचे प्रकाशन संभाजीनगरला झाले.
सरांनी आवर्जून फोन करून, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निमंत्रण दिले. मांडे सरांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. तेव्हा त्यांना भेटायला नगर येथे त्यांच्या घरी मी, डॉ. श्यामाताई घोणसे त्यांना भेटायला गेलो. पत्नी वियोगाने सर थोडे अस्वस्थ वाटले; पण ते काही क्षणभरच. नंतर ते सुमारे तासभर समरसता संघटना आणि साहित्यावर बोलत राहिले. विशेष बाब म्हणजे, अशाही गंभीर प्रसंगी त्यांनी त्यांची सुमारे ५०० पेक्षा अधिक पुस्तके/ग्रंथ स्व. विजयराव कापरे स्मृती ग्रंथालयाला भेट देण्यासाठी सुपुर्द केले. असे दातृत्व असलेले डॉ. मांडे सर विसरणे केवळ अशक्य आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली!
डॉ. सुनील भंडगे