मुंबई : हिंदी मनोरंजनसृष्टीत नेपोटिझम अर्थात घराणेशाहीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाते असा आरोप केला जातो. यासाठी दिग्दर्शक करण जोहर याचे नाव अग्रगणी असून आजवर त्याने साकारलेल्या चित्रपटांमध्ये त्याने स्टार कलाकारांच्याच मुलांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. आता याच नेपोटिझमच्या मुद्द्यावर करण जोहर वेब मालिका घेऊन येत आहे. 'शोटाईम' या त्याच्या आगामी वेब मालिकेत अभिनेता इमरान हाश्मी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
‘शोटाइम’ या वेब मालिकेची निर्मिती करण जोहरच्या धर्मा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली केली जाणार असून डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही मालिका प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या मालिकेत इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह, मौनी रॉय, विजय राज, राजीव खंडेलवाल, महिमा मकवाना, केके मेनन आणि श्रिया सरन असे कलाकार दिसणार आहेत.
'शोटाइम' ची पहिली झलक प्रदर्शित झाली असून यात मनोरंजनसृष्टीतील काही रहस्ये समोर येणार असे दिसते. यात एकीकडे चंदेरी दुनिया आणि दुसरीकडे घराणेशाहीचा मुद्दा अशा दोन्ही मुद्द्यांची मांडणी केली जाणार आहे.