लोकसभा निवडणुकांसाठी आता अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना, साहजिकच जागावाटप हा युती-आघाड्यांसाठी अत्यंत कळीचा मुद्दा. त्यावरुन मग दावे-प्रतिदावे करुन आपली निवडणूक सज्जता दाखवून बेटकुळी फुगवण्याचा प्रयत्न केला जातो. उद्देश एवढाच की, आपले शत्रू असो वा मित्रपक्ष, दोघे काहीसे दबावात येतील आणि मग आपली ‘बारगेनिंग पॉवर’ वाढेल. महाविकास आघाडीतही सध्या जागावाटपावरुन असेच रणकंदन सुरु झालेले दिसते. ठाकरे गटाचे खासदार आणि विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील ४८ पैकी २३, म्हणजेच जवळपास निम्म्या जागा लढविणार असल्याचा दावा केला. आता म्हणा राऊतांनी असे अव्वाच्या सव्वा दावे करणे मुळीच नवीन नाही. पण, आता ज्यांचा पक्षच निम्म्याहून कमींच्या खांद्यावर कसाबसा तग धरुन आहे, त्यांनी राज्यातील निम्म्या लोकसभेच्या जागांवर दावा करणे, हेच मुळी हास्यास्पद. त्यातच ठाकरे आणि पवार अशी राज्यातील प्रभावशाली समजणार्या राजकीय घराण्यांच्या पक्षालाच फुटीचे ग्रहण लागल्याने, आपसूकच काँग्रेसचे पारडे राज्यातही जड झालेले दिसते. त्यामुळे ठाकरे, पवार आधी ज्याप्रमाणे काँग्रेसला दुय्यम लेखून नुसते फरफटत होते, तशी परिस्थिती आता निश्चितच नाही. पण, विश्वप्रवक्त्यांना समजावणार तरी कोण म्हणा? साहेब सांगे, प्रवक्ता बोले, अशीच त्यांची गत. साहेबांच्याच मनातलं ओठांवर आणणारे, हे असे हाडाचे विश्वप्रवक्ते.... आता यावर राज्यातील काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, “हायकमांड निर्णय घेईल,” असे सांगून त्यांनीही याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. यावरुनच राऊतांना आणि पर्यायाने ठाकरेंना काँग्रेस किती किंमत देते, याची केवळ कल्पना यावी. त्यातच संजय राऊतांनी “आमचे सगळे दिल्लीत ठरले. राज्यातील काँग्रेस नेत्यांना याची कल्पना नसावी,” असे म्हणत मविआतील विसंवाद आणि असमन्वयच चव्हाट्यावर आणला. यावरुन राऊतांचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना कमी लेखण्याचा, त्यांना अनुल्लेखाने संपवण्याचा प्रयत्न आगामी काळात अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. कारण, शेवटी हायकमांड दिल्लीवरुन निर्णय घेणारी असली, तरी महाराष्ट्रात काँग्रेसच्या टेकूशिवाय ठाकरेंना पर्याय नाही, हीच सत्यस्थिती.
संजय राऊत जागावाटपाच्या मुद्द्यावरुन प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा लढवाव्यात. गुरूवारी आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली, हे महाराष्ट्रातील नेत्यांना माहिती नसेल. तसेच उद्धव ठाकरे दिल्लीत आल्यावर सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली. त्या चर्चेत काय घडलं, हे आम्हाला माहिती आहे.” म्हणजे, ठाकरेंनी दिल्लीला जाऊन जागावाटपाची चर्चा करणे म्हणजे दिल्ली जिंकणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांसोबतची भेट म्हणजे दिल्लीसमोर माना तुकवणे! असे हे राऊतांचे नेहमीप्रमाणे सोयीस्कर राजकारण आणि लाभापुरते आकलन! खरं म्हणजे पक्षफुटीनंतरही आम्ही किती बलवान, ताकदवान, आमच्याबरोबर एवढी मोठी फौज आहे, हे मिरवण्यातच ठाकरेंनी धन्यता मानली. त्यातच पक्षातील रिकाम्या जागा भरण्यासाठी, अगदी हिंदुत्वविरोधी मंडळींनाही ठाकरेंनी जवळ केले. एकूणच काय तर गर्दी जमली पाहिजे, लोकं दिसली पाहिजे, यावरच सगळा भर. धारावीच्या मोर्चातही ठाकरेंनी तोच कित्ता गिरवला. ज्यांचा धारावीशी संबंध नाही, या प्रकल्पाविषयी अ का ठ माहिती नाही, त्यांनाही काहीबाही आमिषं दाखवून ठाकरेंनी रस्त्यावर उतरविले. पण, केवळ गर्दी जमविली, ती माध्यमांच्या कॅमेर्यांनी टिपली, म्हणजे सगळे सुफळ संपन्न झाले, असे नव्हे. परंतु, रिकाम्या झालेल्या पक्षाचा इतका प्रचंड धसता घेतल्यामुळे, आता ठाकरेही गर्दीचे दर्दी झालेले दिसतात. म्हणूनच आता एकट्याने काही आपला निभाव लागणार नाही, याची पुरेशी खात्री पटल्यामुळेच आधी महाविकास आघाडी आणि नंतर इंडिया आघाडीच्या ते वळचळणीला लागले. ‘माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही’ असे ठामपणे म्हणणारे आणि तसे होणार नाही याची खबरदारी घेणारे बाळासाहेब ठाकरे एकीकडे आणि राज्यातील लोकसभेच्या जागावाटपासाठी दिल्ली दरबारी चर्चेला हजेरी लावणारे, उद्धव ठाकरे दुसरीकडे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला कुरकुरणारी खाट म्हणून हिणवायचे आणि दिल्लीत त्याच काँग्रेसच्या खाटेवर बसून महाराष्ट्राच्या जागावाटपाची चर्चा करायची, असा हा नवठाकरी बाणा!