राजकारणात विरोधकांनी एकमेकांच्या नकला करणे, हे जनतेच्याही म्हणा आता चांगलेच अंगवळणी पडलेले. अगदी बाळासाहेबांपासून ते राज ठाकरेंपर्यंत महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठांवरील नकलांनी खोचक राजकीय टिप्पण्या आणि एकमेकांना रीतसर चिमटेही काढले. नक्कलच काय तर व्यंगचित्रांच्या फटकार्यांतूनही बाळासाहेबांनी राजकीय विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. पण, नक्कलबाजीतून होणारी ही राजकीय शेरेबाजी नेमकी कोणाची, कुठे आणि कोणासमोर करावी, हेही तितकेच महत्त्वाचे. हे असे कोपरखळी मारणारे विनोदी प्रयोग राजकीय सभांमध्ये, भाषणांमध्ये टाळ्या खेचून आणतातही; पण संसदेत, विधिमंडळात वगैरे नक्कलबाजीचे असे प्रयोग होणार असतील, तर ते सर्वस्वी निंदनीयच. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी बुधवारी निलंबनाच्या कारवाईनंतर देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची केलेली नक्कल ही रंगमचावरील कलाकारी नव्हे, तर लोकशाहीला लाज आणणारे दुर्दैवी कृत्यच म्हणावे लागेल.कल्याण बॅनर्जींनी धनखड यांची संसदेच्या आवारातच नक्कल करणे आणि राहुल गांधींनी त्याचे निलाजरेपणाने चित्रीकरण करणे, हा त्याहूनही कहर. हे दोघेच कशाला, इतरही निलंबित खासदार या सगळ्या फुकटच्या तमाशाचा अगदी चवीने हास्यफवार्यांसह आस्वाद लुटत होते. हे बघेही तितकेच दोषी! मुळात एका लोकप्रतिनिधीने अशाप्रकारे सभापतींचा, देशाच्या उपराष्ट्रपतींचा सभागृहात असेल किंवा सभागृहाबाहेर, अशाप्रकारे नक्कल करून उपमर्द करणे, हेच मुळी नियमांच्या, नैतिक मूल्यांच्या मर्यादेचे उल्लंघन. पण, बॅनर्जींच्या बेजबाबदारपणाची ही पहिलीच वेळ नाही. धनखड जेव्हा प. बंगालचे राज्यपाल होते, तेव्हादेखील त्यांच्यावर वाट्टेल तशा शब्दांत टीकेची लाखोली वाहण्याचे पक्षदायित्व कल्याण बॅनर्जींना जणू ममतादीदींनी दिले असावे. कल्याण बॅनर्जी तेव्हा धनखड यांना ‘रक्तशोषक’ म्हणूूनही मोकळे झाले होते. त्यामुळे हा सगळा अश्लाघ्य प्रकार बंगालमध्ये चालतो, तसा तो दिल्लीतही हसण्यावारी नेला जाईल, असाच काहीसा बॅनर्जींचा समज. पण, बंगाल म्हणजे दिल्ली नव्हे! त्यामुळे निलंबनानंतर ‘लोकशाहीची हत्या’, ‘लोकशाहीचा अपमान’ म्हणून गळे काढणार्यांनी सर्वप्रथम या लोकशाही व्यवस्थेचा, या व्यवस्थेतील संवैधानिक पदांचा मान राखायला शिकावे तरी मिळवले!
आपल्या पक्षातील खासदाराने अशाप्रकारे उपराष्ट्रपतींचा अवमान केल्यानंतर, पक्षप्रमुख म्हणून खरं तर ममतादीदींनी कल्याण बॅनर्जींचे कान उपटणे अपेक्षित होते. पण, उलट दीदींनी आपल्या निलंबित खासदारावर दिलदारपणा दाखवत, त्याचा दोष राहुल गांधींच्या माथी मारला. राहुल गांधी त्यांच्या मोबाईलमध्ये कल्याण बॅनर्जी धनखड यांची नक्कल करताना, त्याचे चित्रीकरण करत होते. त्यामुळे हा सगळा प्रकार समोर आल्याचा समज दीदींनी करून घेतला. पण, मुळात माध्यमांच्या कॅमेर्यांनी हा सगळा प्रसंग टिपला व प्रसारित केला. त्यामुळे आपल्या खासदाराचे काही चूकले, हे मान्य करणे दूरच, उलट आम्ही त्यांचा अपमान केला नाही, आम्ही त्यांचा सन्मान करतो, असे स्पष्टीकरण देऊन सारवासारव करण्याचाच दीदींनी केविलवाणा प्रयत्न केला. त्यामुळे आता कल्याण बॅनर्जी असतील किंवा काही दिवसांपूर्वी महुआ मोईत्रा, आपल्या खासदारांच्या चुकांना पंखाखाली घेण्याचा दिलदारपणा दाखवणार्या अशा या ममतादीदी... कुटुंबात मुलांशी आई-वडिलांचे वागणे-बोलणे असेल अथवा कंपनीतील वरिष्ठांची कनिष्ठांप्रतीची वर्तणूक, या सगळ्या बाबी अनुकरणीय ठरत असतात. उदा. आई-वडिलांची बोलण्याची पद्धती आक्रमक, विवादात्मक असेल तर साहजिकच त्या घरातील मुलंही तसेच वागतात-बोलतात. त्याचप्रकारे राजकीय पक्षातही वरिष्ठांची धोरणे, संस्कार, नीती हे अगदी खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत झिरपत असते. त्यामुळे दीदींचा आक्रस्ताळेपणा, आक्रमकपणा आणि बेजबाबदार विधाने बेधडकपणे करण्याची हीच आततायी वृत्ती तृणमूलच्या अन्य नेत्यांनीही तशीच तंतोतंत उचललेली दिसते. म्हणजे बघा, ममतादीदींची मोदींना लोकशाहीची चपराक लगावण्यापासून ते त्यांना फॅसिस्ट, खोटारडा, डाकू वगैरे संबोधण्यापर्यंत मजल गेली होतीच. मग पक्षप्रमुख जर देशाच्या पंतप्रधानाला असे पाण्यात पाहत असतील, तर त्यांच्या नेते-कार्यकर्त्यांकडून अपेक्षा ती काय म्हणा? असो. राजकारणाचा आणि त्याहूनही राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचा, अश्लील टीका-टिप्पण्यांचा स्तर तर अलीकडे अत्यंत खालावलेला. वृत्तवाहिन्यांवर २४ तास दिवसभर दळल्या जाणार्या, याच राजकीय चिखलफेकीच्या बातम्यांचा प्रेक्षकांनाही विट आलेला. तेव्हा, लोकशाहीचा स्तर सुधारायचा असेल, तर सर्वप्रथम सगळ्याच राजकीय पक्षांनी काया, वाचा, मनाने शिस्तीचा अवलंब करणे क्रमपाप्त!