मुंबई : लोकसाहित्य आणि लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रभाकर मांडे (८९) ह्यांचे नगर येथे दि.२१ डिसेंबर रोजी सांयकाळी निधन झाले. मागील काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयातून डॉ प्रभाकर मांडे यांनी पदवी प्राप्त केली. त्याच दरम्यान त्यांना डॉ आंबेडकरांचा सहवास लाभला होता.
अध्यापन क्षेत्रात काम करताना डॉ. मांडे यांनी आपल्या अनेक विद्यार्थ्यांना लोकसाहित्याचा अभ्यास करण्यासाठी प्रेरणा दिली. पन्नासहून जास्त संशोधन ग्रंथाचे लेखन डॉ प्रभाकर मांडे यांनी केले आहे, तर एकूण ग्रंथसंख्या दोनशेहून अधिक आहे. दुसऱ्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. यावर्षी डॉ मांडे यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित कन्या, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. डॉ प्रभाकर मांडे यांच्या निधनाने व्यासंग पर्वाचा अस्त झाला आहे.