"आग्रा ते दिल्लीपर्यंतची सर्व जमीन माझी" म्हणणाऱ्या कुंवर सिंहला उच्च न्यायालयाने ठोठावला १० हजारांचा दंड
20-Dec-2023
Total Views | 98
नवी दिल्ली : एक अजब याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. कुंवर महेंद्र ध्वज प्रसाद सिंह नावाच्या याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, आग्रा ते मेरठ, अलिगढ, दिल्ली आणि गुडगावपर्यंत ६५ महसुली राज्यांमधील सर्व जमिनींवर त्यांचा हक्क आहे. याचिकाकर्ते महेंद्र ध्वज प्रसाद सिंह यांनी स्वत:ला बेसवा संस्थानाचा वारस असल्याचे सांगितले आणि दावा केला की आजही त्यांच्या कुटुंबाला संस्थानाचा दर्जा आहे. त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या जमिनी भारत सरकारला कधीही हस्तांतरित केल्या गेल्या नाहीत.
सिंह यांनी न्यायालयाला बेसवा हे अविभाज्य राज्य भारतात औपचारिकपणे विलीन करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली. या जमिनींमधून 1950 पासून मिळालेला सर्व महसूल त्यांना देण्यात यावा, अशी मागणी केली. जोपर्यंत आपले संस्थान भारतात विलीन होत नाही तोपर्यंत या भागात लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणीही सिंह यांनी न्यायालयाकडे केली.
यानंतर, प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद म्हणाले, "ही याचिका पूर्णपणे मूर्खपणाची असल्याचे न्यायालयाचे मत आहे. याचिकाकर्त्याने काही नकाशे आणि दस्तऐवज सादर केले, ज्यावरून हे सिद्ध होत नाही की बेसवा कुटुंब अस्तित्वात आहे किंवा मालमत्तेवर त्यांचा हक्क आहे. काही अहवाल विकिपीडियावरून उचलण्यात आले आणि काही इतर कागदपत्रे सादर करण्यात आली."
हायकोर्टाने याचिका फेटाळली आणि 10,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड चार आठवड्यांच्या आत लष्कराच्या अपघाती कल्याण निधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्ते महेंद्र ध्वज प्रसाद सिंह यांनी यापूर्वी दिल्लीच्या साकेत कोर्टात कुतुबमिनारवर दावा मांडत अशीच याचिका दाखल केली होती. ही याचिका 20 सप्टेंबर 2022 रोजी फेटाळण्यात आली.