मुंबईत केला गुन्हा, शिक्षा लंडनमध्ये भोगली; काय होता गौरव मोरेचा गुन्हा?
02-Dec-2023
Total Views | 40
रसिका शिंदे-पॉल
मुंबई : सर्व साधारणपणे कोणताही गुन्हा केला की आपल्याला कायदेशीररित्या त्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागते. पण अभिनेता गौरव मोरे याच्या बाबतीत काहीसे वेगळेच घडले आहे. चक्क त्याने एका व्यक्तीच्या गाडीला ठोकले आणि शिक्षा मिळण्याऐवजी त्याला चक्क चित्रपटात काम मिळाले आणि तेही थेट लंडनला जायची संधी मिळाली. नेमकी काय आहे प्रकरण? विचारात पडला असाल ना? तर झाले असे की ‘लंडन मिसळ’ हा आगामी मराठी चित्रपट ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेते भरत जाधव मुख्य भूमिकेत आहेत आणि त्यांच्यासोबत गौरव मोरे देखील झळकणार आहे. पण ‘लंडन मिसळ’ चित्रपटाचा भाग गौरव कसा झाला याचा खास किस्सा त्याने महाएमटीबीशी बोलताना सांगितला.
निर्मात्याच्या गाडीला ठोकले आणि चित्रपटात काम मिळाले
“दिंडोशी सीग्नला गाडीत होतो. मला वेगळ्याच दिशेने जायचे होते पण सीग्नल सुटल्यानंतर मी भलत्याच बाजूला वळलो आणि एका गाडीला मी ठोकलं. मी काच खाली केली आणि दुसऱ्या गाडीतल्या व्यक्तिला म्हणालो, दिसत नाही का? गाडीतल्या व्यक्तीने पण काच खाली करुन मला प्रत्युत्तर दिलं आणि नेमकी ते लंडन मिसळ चित्रपटाचे निर्माते सुरेश पै होते. मग त्याच सीग्नला ते मला म्हणाले अरे आपल्याला एक चित्रपट करायचा आहे, लंडनला जायचं आहे. तर अशा पद्धतीने मी लंडन मिसळ या चित्रपटाचा भाग झालो,” असा भन्नाट किस्सा गौरव मोरे याने सांगितला.
‘लंडन मिसळ’ चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत तर भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसणार आहेत आणि ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असेल.
आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची ही कथा आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजे 'लंडन मिसळ'. नाटक, अभिनय, संगीत, नृत्य, खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी आपल्याला या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे.