‘अ‍ॅक्शन’पॅक ‘अ‍ॅनिमल’

    02-Dec-2023
Total Views | 105
Film Review of Animal

हिंदी चित्रपटसृष्टीत गेली काही वर्षं घराणेशाहीची (नेपॉटिझम) परंपरा अगदी पद्धतशीरपणे राबविली जात असल्याची ओरड अधूनमधून होत असते. याला अगदी हातावर मोजण्याइतकेच कलाकार हेच काय ते अपवाद. असेच एक सिनेघराणे म्हणजे कपूर कुटुंब. खरंतर या कुटुंबातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्याच कुटुंबातील एक अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. २००७ साली ‘सावरिया’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणार्‍या रणबीरने आजवर सोज्ज्वळ, विनोदी किंवा तुलनेने कमी हाणामारी असलेल्या भूमिका साकारल्या. ‘संजू’ चित्रपटातील त्याची भूमिकाही तितकीच वाखणण्याजोगी होती. त्यानंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटात रणबीरची अगदी रौद्ररुप धारण केलेली भूमिका पाहायला मिळते.

या भूतलावरील प्रत्येकाचे आपल्या कुटुंबावर, पालकांवर नितांत प्रेम. असेच ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूरने वठवलेल्या व्यक्तिरेखेचे त्याच्या वडिलांवर अगदी जीवापाड प्रेम. त्या मोबदल्यात लहानपणापासून ते अगदी तारुण्य गाठेपर्यंत आपल्या वडिलांकडून दोन प्रेमाच्या शब्दांची प्रतीक्षाच रणबीरच्या म्हणजेच चित्रपटातील रणविजय सिंगच्या नशिबी येते. या सगळ्यात त्याचे जीवन कसे भरडले जाते, नंतर ते कसे बदलते आणि तो मानसिकरित्या कसा हिंसक होत जातो, ते या चित्रपटातून दिसून येते.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलायचे झाल्यास, एका गर्भश्रीमंत पंजाबी कुटुंबाची ही कथा. या कथेतील नायकाचे अर्थात रणबीर कपूरचे त्याच्या वडिलांवर म्हणजेच अनिल कपूर यांच्यावर नितांत प्रेम. मात्र, आपला व्यवसाय सांभाळण्यात आणि तो मोठा करण्यात ते इतके व्यस्त असतात की, त्यांना मुलासोबत दोन क्षण आनंदाचे आणि विसाव्याचे घालवण्यासाठीही फुरसत नसते. परिणामी, मुलगा परदेशात जाऊन स्थायिक होतो. मात्र, काही वर्षांनंतर तो ज्या कारणास्तव पुन्हा येतो, त्यावेळी तो अतिशय रौद्र रूप धारण करून येतो आणि आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी मग जीवाची बाजी लावून सर्वतोपरी प्रयत्न करतो. त्यासाठी मग ‘अल्फा मेल’ रणबीर कपूरच्या हाती कित्येकांचे रक्तही लागते.

कथानकाच्या निश्चितच काही जमेच्या बाजू आहेत. चित्रपटात रणबीर कपूरचे लहानपणापासून आपल्या वडिलांसोबत नेमके नातेसंबंध कसे होते, हे प्रसंगांमधून न दाखवता केवळ रणबीरच्याच कृतीतून दाखवल्यामुळे नेमकी चूक कुठे आणि कोणाची, हे समजायला कथानकात बराचसा वेळ लागतो. मध्यांतरापूर्वीचा चित्रपटाचा भाग हा मनोरंजन करणारा, प्रसंगी हसवणारा, तर क्वचित डोळ्यात अश्रू आणणारा. परंतु, मध्यांतरानंतर चित्रपट गरज नसताना ताणून धरल्यासारखा वाटतो. इतकेच नाही, तर चित्रपटात दाखवलेली हिंसा ही काहीशी अतिरंजितही वाटते. पण, हा ‘अ‍ॅक्शनपॅक’ सिनेमा असल्यामुळे अशाप्रकारचे चित्रपट पाहणार्‍या प्रेक्षकवर्गाच्या तो पसंतीस पडेल, यात शंका नाही. तसेच अलीकडे दाक्षिणात्य चित्रपटांच्या कथानकांचा आणि त्यांच्या चित्रपटांतील हिंसाचाराचा प्रभाव हिंदी चित्रपटांमध्येही दिसून येतो आणि ’अ‍ॅनिमल’ हा चित्रपट बघताना तर ते अगदी प्रकर्षाने जाणवते.

आता चित्रपटाचे नाव ‘अ‍ॅनिमल.’ अ‍ॅनिमल म्हणजेच प्राणी. मग प्राण्यांचा स्थायीभाव काय, तर शिकार करणे किंवा खाद्य मिळविणे आणि पोट भरणे आणि दुसरे म्हणजे, कुठल्याही परिस्थितीत आपल्या कुटुंबाचे रक्षण करणे. हीच बाब चित्रपटातील नायक सुरुवातीपासून ते अगदी चित्रपटाच्या शेवटपर्यंत करताना दिसून येतो. पण, इथे दिग्दर्शकाचे कौतुक करावे लागेल की, या चित्रपटात त्यांनी नायकाचे कुटुंब पंजाबी, तर त्याची प्रेयसी दाक्षिणात्य दाखवली आहे. एवढेच नाही तर नायकाच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी त्याला मदत करणारी व्यक्ती मराठी, त्याचा जीव वाचावा म्हणून देवाकडे प्रार्थना करण्यासाठी कुटुंबीय होमहवन तर करतातच; पण ख्रिस्ती बांधवांच्या चर्चमध्ये हजेरी लावतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील एक जण मुस्लीम धर्मीयदेखील दाखवला आहे. एकूणच काय तर दिग्दर्शकाने भारतातील सर्वधर्मसमभाव ही भावना चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा केलेला हा प्रयत्न म्हणावा लागेल. परंतु, असादेखील प्रश्न उभा राहतो की, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना त्यांच्या कलाकृती यशस्वी करून दाखवण्यासाठी इतर भाषिक कलाकारांची मदत लागते का? तसे जरी असले तरी सर्व कलाकारांनी एकजुटीने अभिनयाचा आलेख उंच ठेवत यश मिळवले आहे, हे नक्की.

‘अ‍ॅनिमल’चे कथानक उत्तम असले तरी चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने ताकदीची साकारलेली भूमिका ही चित्रपटाला अधिक भक्कम करणारी ठरावी. अनिल कपूर, शक्ती कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना या सर्व कलाकारांचा अभिनय उजवा ठरला आहे. मात्र, चित्रपट अधिक ताणून ठेवल्याने, तीन तासांपेक्षा जास्त काळ हा चित्रपट पडद्यावर पाहताना एका क्षणासाठी जरासा कंटाळवाणादेखील वाटतो. परंतु, हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांची प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी ‘अ‍ॅक्शन’चा अतिरेक करण्याची कृती बरेचदा यशस्वीही झालेली दिसते आणि म्हणूनच ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटही त्याला अपवाद नाहीच!

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचा वाढता पगडा हा कुठेतरी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी फायद्याचा ठरत असून, ’अ‍ॅनिमल’ चित्रपटात त्याचा पुरेपूर वापर केल्याचे दिसून येते. ’अ‍ॅनिमल’ हा चित्रपट रणबीर कपूरच्या अभिनय कारकिर्दीतील एक उत्तम कलाकृती असून, पुन्हा एकदा त्याने घराणेशाहीला खोडून काढत, आपले खरे अभिनय कौशल्य दाखवत, प्रेक्षकांना अचंबित केले आहे, यात शंका नाही.

चित्रपट : अ‍ॅनिमल
दिग्दर्शक : संदीप वांगा
कलाकार : रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, उपेंद्र लिमये, मृण्मयी गोडबोले, अंशुल चौहान
रेटिंग : ३ स्टार

रसिका शिंदे-पॉल
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121