सदस्यपदाचा राजीनामा, नंतर पवारांची भेट! मराठा आरक्षणाविषयी किल्लारीकर यांची भुमिका काय?
02-Dec-2023
Total Views | 71
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या आणि आपल्या भुमिकेत फरक पडत असल्याने राजीनामा दिल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, "मराठा आरक्षण आणि ओबीसींचे काही मुद्दे असे दोन प्रश्न सध्या राज्य मागसवर्ग आयोगाकडे प्रलंबित आहेत. आम्ही सखोलपणे या प्रश्नांचा अभ्यास केला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी महाराष्ट्र राज्याची संपुर्ण जनगणना व्हायला हवी. यातून आलेल्या आकडेवारीच्या आधारे तुलनात्मक अभ्यास करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात यावा, असा प्रस्ताव मी राज्य मागसवर्ग आयोगाकडे मांडला होता."
"समजा मराठा आरक्षण या नावाने आरक्षण देता आलं नाही तर केंद्र सरकारने तयार केलेल्या ईडब्ल्यूएस वर्गासारखा विशिष्ट वर्ग तयार करून त्या माध्यमातून आरक्षण देता येईल का ते बघावे अशी माझी भुमिका होती. परंतू, शासनाचा आणि माझ्या भुमिकेत फरक पडत असल्याने राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या भुमिकेविषयी शरद पवारांशी चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले."
ते पुढे म्हणाले की, "राज्य सरकारने नेमलेल्या सल्लागारांचे आणि आयोगातील काही सदस्यांचे असे मत होते की, लिमिटेड स्वरुपात चौकशी करून आरक्षण द्यायचं. परंतू, महाराष्ट्रातील सर्व समाजांचं सर्वेक्षण करावं आणि त्या आधारे तुलनात्मक अभ्यास करुन आरक्षण द्यावं, अशी माझी भुमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.