नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये अज्ञात व्यक्तींकडून वाँटेड दहशतवाद्यांच्या गूढ रित्या हत्येची मालिका सुरूच आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लष्कर-ए-तय्यबा (एलईटी) च्या आणखी एक दहशतवादी हबीबुल्ला याची गोळ्या घालून हत्या केली. हा दहशतवादी हबीबुल्ला खान बाबा या नावानेही ओळखला जात होता. खैबर पख्तुनख्वा विभागातील टँक जिल्ह्यात त्यांची हत्या करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, हबीबुल्ला उर्फ खान बाबा वेगवेगळ्या नावांनी राहत होता. काश्मीरमधील उरी आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा हात असल्याचा आरोप आहे. लष्करी तळांना लक्ष्य करून केलेल्या या हल्ल्यांमध्ये अनेक भारतीय जवान शहीद झाले. मारले गेलेले खान बाबा हे नॅशनल असेंब्लीचे माजी सदस्य (MNA) आणि इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयचे प्रमुख नेते दावर खान कुंडी यांचा चुलत भाऊ आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हबीबुल्लाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा जागीच मृत्यू झाला.मारला गेलेला हबीबुल्ला हा पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तैयबासाठी दहशतवाद्यांची भरती करत असे. हेच दहशतवादी भारतात घुसून हल्ले करायचे. हबीबुल्लाहची कथित हत्या ही अशा प्रकारची २३वी घटना असल्याचे अनेक अहवाल सांगतात. गेल्या काही महिन्यांत अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दहशतवाद्यांना ठार मारले आहे. यातील सर्वात अलीकडची हत्या लष्कर-ए-तय्यबाचा संस्थापक आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा जवळचा सहकारी अदनान अहमदची आहे.
काही आठवड्यांपूर्वी कराची शहरात अदनान अहमदची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम याला विषबाधा झाल्याची बातमीही दि.१८ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अहवालांदरम्यान, पाकिस्तानच्या अनेक भागात इंटरनेटवर बंदी असल्याची माहितीही समोर आली आहे.