नवी दिल्ली : सोमवारी राजधानी दिल्लीत इंडी आघाडीची बैठक होणार असून त्याआधीच भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या बैठकीवर टीका केली आहे. इंडी आघाडीच्या बैठकीला काहीही अर्थ नसून ही बैठक वांझोटी आहे, असा घणाघात त्यांनी केला आहे. सोमवार, १८ डिसेंबर रोजी त्यांनी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला.
रावसाहेब दानवे म्हणाले की, "इंडी आघाडीच्या बैठकीला सुरुवात होताच सर्वात पहिला मुद्दा हा राहूल गांधींच्या लग्नाचा आला. त्यामुळे ही बैठक गांभिर्याने घेतली जात नाही अशी एकच चर्चा देशभरात सुरु झाली. दिल्ली येथे ही त्यांची चौथी बैठक असून या बैठकीमध्ये काहीही अर्थ उरलेला नाही. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये केवळ एका राज्यात अनपेक्षितपणे त्यांना यश मिळालं आणि त्यांच्या हातातील दोन्ही राज्य गेले. त्यामुळे नैराश्यात असलेले हे पक्ष आता एकत्र आले तरी भाजपच्या यशावर त्याचा कुठलाही फरक पडणार नाही."
"ते कितीही एकत्र आले तरी त्यांचा अजेंडा ठरवला जाणार नाही. त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवारही ठरवला जाणार नाही. तसेच यापुढे होणाऱ्या बैठकांमध्ये जर पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्याची भाषा कुणी केली तर, एकही माणूस त्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही अशी यांची वांझोटी बैठक आहे. या बैठकीला काहीही अर्थ नाही," असेही ते म्हणाले आहे.