मांजरींचा लाडोबा करायला आपल्यातील बऱ्याच लोकांना आवडते. परंतु या पाळीव अथवा भटक्या मांजरींमुळे जैवविविधता धोक्यात येतेय. अनेक संस्कृतींमध्ये मांजरी या ऐतिहासिक काळापासून पूजनीय राहिल्या आहेत. जागा मिळेल तिथे मावू या पवित्र्याने ही मनी माऊ मानवाची सोबती बनली तर खरी, परंतु एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की या पाळीव मांजरी शिकार करतात. जेव्हा या पाळीव मांजरींना मुक्तपणे फिरण्यासाठी सोडण्यात येते तेव्हा त्या एका कुशल शिकाऱ्या प्रमाणे शिकार करतात.
कोणाची? तर झाडांवरच्या खारी, इतर छोटे पक्षी, व इतर प्रजातींची. एकट्या ऑस्ट्रेलियामध्ये, मांजरी दरवर्षी 300 दशलक्षाहून अधिक प्राणी मारतात असा अंदाज आहे, संवर्धन गटांनी मांजरींना घरामध्ये ठेवण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी मांजरींचे ‘लॉकडाउन’ लागू केले आहेत. दक्षिण-पश्चिम जर्मन शहर वॉलडॉर्फमध्ये, लोकांना त्यांच्या मांजरींना वसंत ऋतूमध्ये तीन महिने आतमध्ये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरुन त्या वेळी प्रजनन काळ असलेल्या क्रेस्टेड लार्क्सच्या धोक्यात संख्येचे संरक्षण होईल. नेचर कम्युनिकेशन्समध्ये नुकताच प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये, अभ्यासकांच्या चमूने अशा तब्बल दोन हजारहून अधिक प्रजातींचा डेटाबेस संकलित केला आहे. पक्षी, सस्तन प्राणी, कीटक आणि सरपटणारे प्राणी हे सर्व या मांजरींच्या ‘मेनू’वर असते. एकूण, मांजरी पक्ष्यांच्या 981 प्रजाती, 463 सरपटणारे प्राणी आणि 431 सस्तन प्राणी खातात – ज्यामध्ये सुमारे 90% प्रजातींचा समावेश होतो. ते कीटकांच्या 119 प्रजाती आणि 57 उभयचर प्राणी देखील खातात. यापैकी जवळपास 350 प्रजाती संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत आणि अनेक आधीच नामशेष झाल्या आहेत.
या अभ्यासानुसार जागतिक स्तरावर भटक्या मांजरी (फेलिस कॅटस) ही आक्रमक मांसाहारी प्रजाती आहे. हि प्रजाती एकहाती जैवविविधतेवर लक्षणीय परिणाम करते. अर्थात त्याला मांजरींचे मानवी उदात्तीकरण कारणीभूत आहेच. मांजरींमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी, अभ्यासकांनी मांजरींद्वारे खाल्ल्या गेलेल्या २०८४ प्रजातींची यादी तयार केली. त्यापैकी ३४७ प्रजाती (16.65%) धोकाग्रस्त आहेत. सुमारे नऊ हजार वर्षांपूर्वी पाळीव श्रेणीत आलेल्या या मांजरी आज अंटार्क्टिका वगळता सर्व खंडांमध्ये वास्तव्यास आहेत. असे म्हणण्यात काहीच वावगे नाही की मांजरी या सर्वात मोठ्या प्रमाणात वितरित प्रजातींपैकी एक आहेत. या ‘कॉस्मोपॉलिटन’ वितरणामुळे, मांजरींनी अनेक परिसंस्था विस्कळीत केल्या आहेत.
या अभ्यासातून असे लक्षात आले की मांजरी विविध प्रजातींमध्ये नवीन रोग पसरवतात, स्थानिक प्राण्यांची शिकार करतात. आणि यामुळे अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी, ‘फ्री-रेंजिंग’ मांजरी (म्हणजे, बाहेरील वातावरणात प्रवेश असलेल्या पाळीव आणि भटक्या मांजरी) जगातील सर्वात समस्याप्रधान आक्रमक प्रजातींपैकी एक आहेत. मांजरींना यशस्वी शिकारी करणारा गुणधर्म म्हणजेच त्यांचा सामान्य आहार. मांजरींच्या उच्च ऊर्जेच्या गरजेमुळे स्केव्हेंजिंग हे अन्नाचे प्रमुख स्त्रोत नाही. मांजर हा असा संधिसाधू भक्षक प्राणी आहे, जो पूर्वनिर्मित चयापचय शक्तीवर महिनाभर सुद्धा टिकू शकतात. शिवाय, मांजरी केवळ प्राण्यांचे ‘मसल्स’ खाऊन टिकून राहण्यासाठी उत्क्रांत झाल्या आहेत. आणि मांसाहारी असल्यामुळे म्हणून त्यांच्याकडे विशिष्ट पौष्टिक अनुकूलनांचा संच आहे. विशेषतः, मांजरींमध्ये एमिनो ऍसिड चयापचयातील एन्झाईम्सचे नियमन करण्याची मर्यादित क्षमता असते.
या अभ्यासात १०० वर्षांहून अधिक काळची जगभरातील मांजरींसाठी आहारविषयक विश्लेषणे तपासली गेली आहेत. सध्याच्या अभ्यासातून शास्त्रज्ञांनी हे आकडे गाठले आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की त्यांचे अंतिम अंदाज पुराणमतवादी आहेत आणि अधिक संशोधन झाल्यावर ते वाढतील. त्यांचा अभ्यास मुक्त घरगुती मांजरींवर होता. संशोधकांनी तपासलेल्या साहित्याचा भौगोलिक पूर्वाग्रह देखील असण्याची शक्यता आहे. कारण मांजरींच्या आहारावरील बहुतेक अभ्यास ऑस्ट्रेलिया किंवा उत्तर अमेरिकेत आयोजित केल्यामुळे, त्या खंडातील मूळ प्राणी डेटासेटवर वर्चस्व गाजवतात. तरीही या संशोधनातून हे प्रखर रित्या जाणवते कि मांजरींचा मुक्त संचार हा आपल्या आजूबाजूला असलेल्या जैवविविधतेसाठी धोकादायक आहे. भटक्या मांजरींमुळे अनेक ठिकाणे, मैना बुलबुल, कबुतरे, खारी यांचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे, या मांजरींचे करायचे काय, हा प्रश्न जागतिक झाला आहे.