मुंबई ता.१६ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या 'अदानी हटाव,धारावी बचाव' रॅली काँग्रेस आणि इतर पक्षांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा ’अदानी हटाव,धारावी बचाव’ मोर्चा काँग्रेस आणि इतर पक्षांनी हायजॅक केल्याचे चित्र शनिवारी दि.१६ रोजी बीकेसीत दिसून आले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विरोधकांनी अदानी समूहाला प्रकल्प देण्यास तीव्र विरोध दर्शविला. यावेळी राज्य सरकार आणि भाजपवरही त्यांनी टीका केली. मोर्चात सहभागी लहान मुलांशी आणि काही उपस्थितांशी संवाद साधला असता या कार्यकर्त्यांना रॅलीत सहभागासाठी 500 रुपये देण्यात आल्याचे समोर आले.
दरम्यान, धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी रिअल्टीकडून काढून घेण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी शनिवारी धारावी टी जंक्शन ते बीकेसी असे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने या रॅलीचे आयोजन शिवसेना उबाठा गटाने केले होते. मात्र, टी जंक्शन येथून उद्धव ठकरे यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या मोर्चात काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि आझाद समाज पार्टी (भीम आर्मी), समाजवादी पार्टी यांसारख्या इतर पक्षीय कार्यकर्त्यांची गर्दी सर्वाधिक दिसून आली. तर दुसरीकडे रॅलीत सहभागी शिवसैनिक देखील मुंबई उपनगरांतून सहभागी होण्यासाठी आल्याचे दिसून आले. यामुळे धारावीकरांच्या मागण्यांसाठी असणार्या या मोर्चाकडे धारावीकरांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसून आले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी रेल्वेच्या जागेत उभारल्या जाणाऱ्या प्रकल्प सदनिकांना विरोध दर्शविला आहे.याचसोबत, अदानी रिअल्टीच्या फायद्यासाठी राज्यसरकारने नगरविकास आराखडा, टीडीआर नियमावली, मुंबई महानगरपालिका आणि इतर कर सवलत जाहीर केली आहे. धारावीकरांना ५०० चौरस फुटांचे घर तेही धारावीतच मिळावे ही मागणी केली. हा प्रकल्प धारावीकरांच्या हिताचा नसून अदानींच्या हिताचा असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी स्थानिक आमदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्ष गायकवाड यांनीही प्रकल्पातील नियम व अटी बदलण्यात आल्या असल्याचा आरोप केला.
मोर्चात सहभागासाठी पैसे वाटप?
मोर्चात सहभागी लहान मुलांशी आणि काही उपस्थितांशी संवाद साधला असता या कार्यकर्त्यांना रॅलीत सहभागासाठी 500 रुपये देण्यात आल्याचे समोर आले. धारावी 60 फिट रोड येथील रॅलीत सहभागी लहान मुलांना स्थानिक कार्यकर्त्यांकडून 500 रुपये मिळणार असल्याचे या मुलांनी सांगितले. त्यामुळे धारावीतील नागरिकांनी आंदोलनकडे पाठ फिरविल्याने शिवसेना, काँग्रेस आणि इतर सहभागी पक्षांनी पैसे देऊन सभेला गर्दी जमवली का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.
धारावीकरांची दिशाभूल
सातत्याने ’टीडीआर’चा मुद्दा उपस्थित करून, धारावीतील जनतेची दिशाभूल केली जाते आहे. आमचा अदानींना विरोध नाही किंवा आम्हाला सरकारविरोधातही कोणत्याही निदर्शनात सहभागी व्हायचे नाही. मात्र, इतकी वर्षे आम्ही पक्क्या घरांची वाट पाहतोय. ही पक्की घरे आम्हाला लवकरात लवकर मिळावी.
- स्थानिक महिला
पुनर्विकासाबाबत अपप्रचार
येथील व्यावसायिक धारावीबाहेर फेकले जाणार किंवा अपात्र धारावीकरांना घरे देण्यात येणार नाहीत, असा अपप्रचार सध्या धारावीत सुरू आहे. विरोध करणारे जेव्हा सत्तेत होते, तेव्हा त्यांनी धारावीसाठी काय केले? 100 फुटांच्या घरांमध्ये राहतो, अशावेळी जर आम्हाला 400 चौरस फुटांचे घर मिळते आहे, तर ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी तरी हा प्रकल्प होऊ द्या, अशी विनंती आम्ही विरोधकांना करतो.
- सचिन सोनावणे, धारावीकर नागरिक