नवी दिल्ली : युक्रेनमधील एका गावातून हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. युक्रेनियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी ज़कारपटिया भागात, केरेत्स्की ग्राम परिषदेच्या इमारतीत सुरू असलेल्या ग्रामसभेदरम्यान, एका ग्रामसेवकाने ग्रेनेडसह प्रवेश केला.त्यांनी तेथे ग्रेनेडचा स्फोट केला. या हल्ल्यात एका हल्लेखोराचा मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
युक्रेनियन पोलिसांच्या म्हणण्यानुसार, "आज ११.३७ वाजता, १०२ लाइनवर एक संदेश आला की, एका प्रतिनिधीने मुकाचेवो जिल्ह्याच्या केरेत्स्की ग्राम परिषदेच्या इमारतीमध्ये एका सत्राच्या बैठकीत ग्रेनेडचा स्फोट केला.""प्राथमिक माहितीनुसार स्फोटामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले," असे पोलिसांनी सांगितले. अपघाताच्या प्राथमिक तपासाचा एक भाग म्हणून पोलीस तपास पथक, स्फोटक तज्ज्ञ आणि गुन्हेगारी तज्ज्ञ घटनास्थळी कारवाई करण्यात व्यस्त आहेत.
या व्हिडिओमध्ये काळे कपडे घातलेला एक व्यक्ती खोलीत शिरल्याचे दिसत आहे. त्यानंतर कोणाचीही पर्वा न करता त्याने सहजासहजी खिशातून तीन हातबॉम्ब काढले. ग्रेनेड उघडले आणि जमिनीवर फेकले. यामुळे भयंकर स्फोट झाला. स्फोटामुळे धुराचे लोट भरून खोलीत अंधार झाला आणि सभेत उपस्थित लोक आरडाओरडा करू लागले. हा ग्रेनेड हल्ला करणार्या व्यक्तीचे नाव सेरही बट्रीन असे आहे. या अपघातात सेरहीलाही गंभीर दुखापत झाली आहे.हल्ल्यामागील हेतू शोधून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याचा मृत्यू झाला. तो युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या सर्व्हंट ऑफ द पीपल पार्टीशी संबंधित एक परिषद सदस्य आहे.