लखनौ : अयोध्येत वॉटर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. २२ जानेवारी २०२४ रोजी या सेवेचे उद्घाटन करू शकतात. त्याच दिवशी अयोध्येतील रामललाच्या भव्य मंदिरात प्रभू रामाच्या बालस्वरूपाचा अभिषेक केला जाणार आहे. या विशेष जल मेट्रो सेवेसाठी दोन मोठ्या बोटी वापरण्यात येणार आहेत. दोन्ही बोटी कोचीन शिपयार्ड येथून तयार करण्यात आल्या असून त्या अयोध्येत पोहोचल्या आहेत. उत्तर प्रदेशातील ही पहिली वॉटर मेट्रो सेवा असेल.
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण आणि मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग एंड वाटरवेज गवर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून दोन फ्लोटिंग जेटी पण पाठवण्यात आल्या आहेत. यातील एक तुळशीदास घाटावर, तर दुसरी गुप्तार घाटावर ठेवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी अयोध्येत झालेल्या मुख्यमंत्री योगी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलमार्ग प्राधिकरणाच्या स्थापनेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. याच मालिकेत अयोध्येला वॉटर मेट्रोच्या रूपाने पहिली भेट मिळाली आहे.
विशेष म्हणजे या वॉटर मेट्रोसाठी मोठ्या ऑटोमॅटिक बोटी बसवण्यात येणार असून त्यात एसी केबिनचीही व्यवस्था असेल. वॉटर मेट्रोमध्ये एकाच वेळी सुमारे १०० लोक एकाचवेळी प्रवास करु शकतात. आणि सरयू नदीत मेट्रोने प्रवास करून संपूर्ण अयोध्या शहर पाहू शकतात.
ही वॉटर मेट्रो भारतातील पवित्र शहरांपैकी एक असलेल्या अयोध्येतील तुलसीदास घाट ते गुप्तर घाटापर्यंत धावणार आहे. अयोध्येतील पर्यटनाला चालना देणे आणि शहरातील वाहतूक सुलभ करणे हे वॉटर मेट्रोचे उद्दिष्ट आहे. तसेच शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. अयोध्येच्या विकासात वॉटर मेट्रो सेवा महत्त्वाची भूमिका बजावेल. हे शहराला आधुनिक आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था प्रदान करेल.