नागपूर : लोकं जोड्याने मारतील तेव्हा तुम्हाला तुमची लायकी कळेल, असा घणाघात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला.
संजय शिरसाट म्हणाले की, "संजय राऊत यांना छत्रपती शिवाजी महाराज कळले नाहीत. ते पुस्तकाची दोन पानं वाचून वक्तव्य करतात. त्यांना हे माहिती नाही की, शिवाजी महाराजांसोबत अनेक मावळे होते. त्यांच्या सोबतीनेच त्यांनी लढाई जिंकलेली आहे. आम्ही मावळ्यांच्या भुमिकेत आहोत आणि ते छत्रपतींच्या भुमिकेत आहेत. त्यामुळे त्यांचा अहंकार दुखावला जातो. त्यांना वाटतं की, आपण छत्रपती असताना हे दुसरे कसे. पण आम्हाला मावळ्यांच्या भुमिकेत राहू द्या आणि तुम्ही छत्रपतीच्याच भुमिकेत रहा. लोकं जेव्हा तुम्हाला जोड्याने मारतील तेव्हा कळेल की, आपली लायकी काय आहे."
तसेच कमळाच्या चिन्हावर शिवसेनेचे खासदार निवडणुक लढणार ही बातमी अतिशय चुकीची आहे. मुळात शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला लढायला शिकवलं आहे, रडायला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवारांची गुर्मी बरोबर नाही
आंदोलन करणं हा तुमचा अधिकार असून तुम्ही ते केलं पाहिजे. परंतू, आंदोलन करताना माप बघून आपल्या मागण्या मांडायच्या. सरकारने तुमच्यासमोर आलंच पाहिजे हा अट्टाहास बरोबर नाही. तुम्ही आमदार असल्याने तुमचे काही प्रतिनिधी घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकला असता. तुम्हाला घटनेने तो अधिकार दिला आहे. परंतू, मी सर्वांना नमवू शकतो ही गुर्मी बरोबर नाही, असेही शिरसाट रोहित पवारांना म्हणाले आहेत.