प्राथमिक शिक्षणात मुलांच्या अंगी असलेल्या जिज्ञासा, उत्सुकता, बालसुलभ अद्भुत कथा, परिकथा, या कथांनी आनंद देण्याऐवजी, बालवयात न समजणार्या विज्ञाननिष्ठा, देशप्रेम, सामाजिक जाणिवा, पुढार्यांची जीवन कहाणी इत्यादींचा समावेश अभ्यासक्रमात केल्याने संस्कारक्षम पुराणकथा प्राथमिक शिक्षणातून अंतर्धान पावल्या. कदाचित पुराणकथा धर्माशी जोडल्या गेल्या आहेत, असा समज झाल्याने त्या दूर ठेवल्या असतील. त्यामुळे आज ध्रुवाची कथा सविस्तरपणे सांगण्याची वेळ आली आहे.
सर्वसामान्य माणसाला नित्याच्या कष्टप्रद धकाधकीच्या जीवनापासून थोडा वेळ का होईना विरंगुळा, करमणूक हवी असते. जेव्हा विशेष करमणुकीचीसाधने उपलब्ध नव्हती, तेव्हा गोष्ट सांगणे व ऐकणे वा करमणुकीच्या साधनातून माणसाला विरंगुळा मिळत होता. सुमारे ४०० वर्षांपूर्वी आणि त्याहीअगोदर लोक धर्माच्या बाबतीत श्रद्धायुक्त होते. त्यांना पुराणातील देवादिकांच्या कथा सांगण्यात, ऐकण्यात रस होता - धर्मपुराणातील कथा देवादिकांच्या विषयी असल्याने लोक त्या भक्तिभावाने ऐकत असत. त्यामुळे समर्थांच्या काळी लोकांना अनेक पुराणकथा माहीत होत्या. त्याकाळी लोकांना भजन, कीर्तन, प्रवचन, पुराणकथा श्रवण आवडत असे. तरीही त्याकाळी इतर करमणुकीची कोणती साधने होती, याचा विचार केला पाहिजे. त्या काळात आजच्याप्रमाणे करमणुकीच्या साधनांची रेलचेल नव्हती हे नक्की.
आज मोजता येणार नाहीत इतकी करमणुकीची साधने उपलब्ध आहेत. त्यांचा उपभोग घेण्यासाठी वेळच माणसाच्या हाती नाही. अगदी साधे मोबाईलचे उदाहरण घ्या. त्यात विविध सोईसुविधांबरोबर कितीतरी करमणूकप्रधान साधने आहेत, ज्यांची माहितीसुद्धा सामान्य माणसाला नसते. तथापि परिणामस्वरूप अनेक चांगल्या सवयींकडे आपले दुर्लक्ष होते. सद्ग्रंथांचे वाचन सद्विचारप्रवर्तक भाषणे ऐकणे, आध्यात्मिक प्रवचने, आत्मोद्धार, आरोग्यपूर्ण व्यायाम याकडे दुर्लक्ष होते. असे मानणारा विचारवंतांचा एक गट आहे. त्यांचे म्हणणे बरोबर की चूक, हा आजच्या चर्चेचा विषय नाही. त्यातील मुख्य मुद्दा असा की, सुमारे ४०० वर्षांपूर्वी ज्या करमणुकी प्रचलित होत्या, त्यात नाचगाणे, तमाशा यांचा समावेश होता. तमाशाची परंपरा जुनी आहे. त्यातील लावण्यांनाही इतिहास आहे. लोकांची ही आवड लक्षात घेऊन एकनाथांसारख्या द्रष्ट्या संताने भारुड, गवळणी, इत्यादीकांच्या माध्यमातून अध्यात्मिक विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आगळा प्रयोग केला. त्यासाठी त्यांनी लोकवाङ्मयाची निर्मिती केली. तरीही नाच, गाणे, तमाशा यांच्यापेक्षा त्याकाळी भजन, कीर्तन प्रवचन या धर्माधिष्ठित साधनांना सामाजिक प्रतिष्ठा लाभली होती. त्यातून पुराणकथा व त्यातील तात्पर्य लोकांपर्यंत पोहोचत होते. यासाठी समर्थ पुराणकथांचा उल्लेख मनाच्या श्लोकांतून करून त्यांद्वारा आपल्या विचारातील तात्पर्यार्थ लोकांसमोर मांडत आले आहेत.
मागील श्लोक क्र. ११६ मध्ये स्वामींनी अंबऋषी म्हणजे धार्मिक, शूर, पराक्रमी अंबरीष राजा आणि बालभक्त उपमन्यू यांच्या पुराणकथांचा उल्लेख केला आहे. ऋषिपुत्र, उपमन्यू निरागस बालक, निश्चयी असून भगवंताचा भक्त होता. भगवान शंकरांची तपस्या करून, त्यांना प्रसन्न करून त्याने वर मागून घेतला. भगवंतांनी या अनन्य भक्ताला त्याने मागितले, त्यापेक्षा कैकपटीने अधिक दान दिले. कदाचित या कथेवरून स्वामींना ध्रुवबाळाची कथा आठवली असावी. त्याचा निर्देश स्वामी पुढील श्लोकातून करीत आहेत-
धुरुं लेकरूं बापुडे दैन्यवाणें।
कृपा भाकिता दोधली भेटी भेटि जेणें।
चिरंजीव तारांगणीं प्रेमवाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११७॥
देवाला भक्ताचा अभिमान असतो. देव भक्ताची उपेक्षा करीत नाही, हा विचार स्पष्ट करण्यासाठी स्वामींनी ध्रुवबाळाच्या कथेचा संदर्भ या श्लोकात दिला आहे. ध्रुवबाळाची कथा सर्वसाधारणपणे बर्याच लोकांना माहीत आहे. समर्थांच्या काळी तर ती सर्वांना माहीत होती. आधुनिक काळाचा विचार करता पूर्वी शालेय पुस्तकातून, मुलांना सुसंस्कारित करण्यासाठी पुराणकथा सोप्या भाषेत दिलेल्या असायच्या-मागच्या पिढीतील लोकांना ते प्राथमिक शाळेत असताना शिक्षकांनी शिकवलेली अथवा आईने घरी पुस्तकातून वाचून दाखवलेली ध्रुवबाळाची गोष्ट आठवत असेल. पण, नंतर काळ बदलला. शैक्षणिक धोरणे बदलली. प्राथमिक शिक्षणात मुलांच्या अंगी असलेल्या जिज्ञासा, उत्सुकता, बालसुलभ अद्भुत कथा, परिकथा, या कथांनी आनंद देण्याऐवजी, बालवयात न समजणार्या विज्ञाननिष्ठा, देशप्रेम, सामाजिक जाणिवा, पुढार्यांची जीवन कहाणी इत्यादींचा समावेश अभ्यासक्रमात केल्याने संस्कारक्षम पुराणकथा प्राथमिक शिक्षणातून अंतर्धान पावल्या. कदाचित पुराणकथा धर्माशी जोडल्या गेल्या आहेत, असा समज झाल्याने त्या दूर ठेवल्या असतील. त्यामुळे आज ध्रुवाची कथा सविस्तरपणे सांगण्याची वेळ आली आहे.
ध्रुवाची कथा भागवतात आलेली आहे. भागवतकारांनी ध्रुवाच्या भक्तीची खूप स्तुती केली आहे. त्यामुळे या कथेतील भक्तिभाव ओसंडून वाहात आहे. सूर्यवंशात उत्तानपाद नावाचा राजा होऊन गेला. त्याला दोन राण्या होत्या. एकीचे नाव सुरुची आणि दुसरी सुनीती, त्या काळच्या प्रथेप्रमाणे राजे आपल्या राज्यविस्तारासाठी व राज्यमैत्रीसाठी अधिक राण्यांशी लग्न करीत. वरील दोन राज्यांपैकी उत्तानपाद राजाची सुरुची, आवडती होती. अर्थात, सुनीती नावडती समजली जाई. ध्रुव हा सुनीतीचा मुलगा होता. सुरुची, सुनीती व ध्रुव या दोघांचाही द्वेष मत्सर करीत असे. एक दिवस सहज पाच वर्षांचा ध्रुवबाळ खेळत खेळत वडिलांकडे गेला. उत्तानपाद राजाने मोठ्या कौतुकाने ध्रुवबाळाला उचलून आपल्या मांडीवर बसवले. ते पाहून सुरुची राणीचा संताप झाला. तिने ध्रुवबाळाला राजाच्या मांडीवरून खाली ओढले व ती ध्रुवाला म्हणाली, ’‘इथे बसायचा तुला अधिकार नाही. तू येथून चालता हो.” बापाची अगतिकता व सावत्र आईचा मत्सर पाहून ध्रुव उद्विग्न झाला.
‘मला कोणी हाकलू शकणार नाही असे स्थान हवे,’ असा त्याने निश्चय केला. त्याची आई म्हणाली, “बाळा, हे आपले कर्मभोग आहेत. तू देवाला आपलसं कर व तुला कोणी हटवणार नाही, असे स्थान मागून घे.” हा पाच वर्षांचा बालक तप:साधनेसाठी अरण्यात निघून गेला. तेथे त्याची नारदांशी भेट झाली. ध्रुवाची हकिगत ऐकल्यावर नारदांनी त्याला नारायणाचा नामजप करायला सांगितले. ध्रुवाने मोठ्या निष्ठेने नामजप केला. ध्यानात त्याला विष्णुचे चतुर्भुज दर्शन झाले. काय बोलावे ते त्याला सुचेना. मग भगवंतांनी आपल्या शेतातील शंखाचा स्पर्श त्याच्या गालाला केला व त्याला ध्यानातून जागे केले. वर माग, म्हणून सांगितले. ध्रुवाने “मला कोणीही ऊठ म्हणणार नाही, असे अढळ स्थान दे,” असा वर मागितला. भगवंताने ध्रुवाला राज्य व आकाशातील तारांगणात अढळ तारा केले. त्यालाच आपण ‘ध्रुवतारा’ म्हणून ओळखतो. आकाशातील सर्व ग्रहतारे त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. भगवंतांनी प्रेमाखातर ध्रुवाला तारांगणात चिरंजीव म्हणजे कायमचे अढळस्थान दिले. पूर्ण श्रद्धेने निष्ठेने भगवंताची भक्ती केली असता, भगवंत भक्ताची कधी उपेक्षा करीत नाही : आपल्या भक्ताचा, मग तो लहान, तरुण, मोठा कसाही असेना का, त्याला अभिमान असतो. तो प्रसन्न झाल्यावर भक्त मागेल त्याच्या कैकपटीने दान तो भक्ताला देत असतो, असे या कथेचे तात्पर्य आहे.
७७३८७७८३२२