नुकतेच जॉर्डनच्या सैन्याने सीरियाच्या सीमेवर डझनभर ड्रग्ज माफियांना कंठस्नान घातले. सीरियामधून अमली पदार्थ घेऊन, जॉर्डनमार्गे ते आखाती देशात घुसण्याचा प्रयत्न करत होते. यात जॉर्डनचा एक अधिकारी मृत पावला; पण हे पहिल्यांदाच घडले नाही. गेले दशकभर हे सुरूच आहे. जॉर्डन आणि सीरियामध्ये हे ’ड्रग्ज वॉर’ सुरू आहे. सीरियामधून दररोज सातत्याने हे ड्रग्जमाफिया जमेल, त्या मार्गाने ते जॉर्डनमध्ये प्रवेश करून, आखाती देशांत पोहोचतात. तिथे अमली पदार्थ विकतात. मागे आखाती देश आणि मुख्यतः जॉर्डनने सीरियाला ’अरब लीग’मध्ये स्थान मिळवून दिले. त्यासाठी त्यांनी सीरियाला एकच अट टाकली, ती म्हणजे कॅप्टॉगॉन अमली पदार्थांच्या व्यापारासाठी सीरिया हा जॉर्डनचा वापर करते, तसा तो करू नये. तसेच सीरियाने अमली पदार्थांचा व्यापार आखाती देशांमध्ये तत्काळ बंद करावा. पण, तसे काही झाले नाही.
कॅप्टॉगॉन नाव ऐकल्यासारखे वाटते ना? ’द केरला स्टोरी’ चित्रपटात तो मौलवीसारखा वेशभूषा, केशभूषा केलेला व्यक्ती दहशतवादी खलनायकांना सांगतो की, हिंदू आणि त्या ख्रिस्ती मुलीला तुमच्या नादाला लावायचे असेल, तर त्यावर एक उपाय आहे, तो म्हणजे ’कॅप्टॉगॉन.’ दि. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला. ’हमास’च्या त्या हल्ल्याच्या क्रौर्याने जगभर दुःख आणि संतापाची लाट उसळली. नंतर कळले की, या अतिरेक्यांनी ‘कॅप्टॉगॉन’ या अमली पदार्थाच्या गोळीचे सेवन केले होते. माणसाला राक्षस बनवणार्या या अमली पदार्थाने आखाती देशामध्ये हैदोस माजवला आहे. हे ‘कॅप्टॉगॉन’ किंवा ‘अॅम्फेटामाईन’ बनवणे, हेच आर्थिकतेचे स्रोत असणारा देश म्हणजे सीरिया. सीरियामध्ये या अमली पदार्थाचे उत्पादन एकहाती केले जाते. त्यासाठी सीरियामध्ये लेबेनॉनचे ’हिजबुल्लाह’ आणि इराणची ’मिलिशीया’ या दहशतवादी संघटना सहभागी आहेत.
काय आहे हे ‘कॅप्टॉगॉन’? तर १९६०च्या दशकात जर्मन कंपनी ’डेगुसा फार्मा ग्रुप’ने मनोसक्रिय मादक (सायकोअॅक्टिव्ह) औषध तयार केले, त्या ब्रॅण्डचे नाव होते-’कॅप्टॉगॉन.’ ‘कॅप्टॉगॉन’ टॅबलेटमध्ये ‘फेनेटिलाईन’ होते. ‘अॅम्फेटामाईन’ असलेल्या ‘फेनेथिलामाईन’ या गटातील ते एक औषध. मात्र, १९७१च्या ’संयुक्त राष्ट्रां’च्या अधिवेशनाच्या अनुसूची-दोनमध्ये ‘फेनेटिलाईन’चा समावेश मनोसक्रिय मादक पदार्थ म्हणून करण्यात आला. त्यामुळे बहुतेक देशांनी ‘कॅप्टॉगॉन’च्या वापरावर त्यांच्या देशात बंदी आणली. ही बंदी आली असतानाही, अनेक जण ‘कॅप्टॉगॉन’चा वापर अमली पदार्थ म्हणूनच करत होते.
’इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डा’ने २०११ मध्ये जाहीर केले की, २००९ पासून कोणत्याही देशाने ‘फेनेटिलाईन’चे उत्पादन केले नाही, तरीही सीरियामध्ये आजही ‘कॅप्टॉगॉन’ अणि ‘अॅम्फेटामाईन’चे उत्पादन केल्याचे दिसते. दहशतवादामुळे सीरियाचे कंबरडे मोडले, बेरोजगारी आणि गरिबी हातात हात घालून इथे ठाण मांडून बसली. त्यामुळे अमली पदार्थांचे उत्पादन आणि विक्री हेच इथले अर्थार्जनाचे प्रमुख साधन. सीरिया, लेबेनॉन किंवा इराणसारख्या मुस्लीम देशातील दहशतवादी संघटनांना या अमली पदार्थ विक्रीमध्ये इतका रस का असावा? तर अमली पदार्थांच्या विक्रीतून सहज आणि अगणित पैसा मिळतो. दहशतवादी संघटनांना अमली पदार्थांच्या अधीन झालेले युवक आत्मघातकी हमला करण्यासाठी सहज सापडतात.
मुख्य म्हणजे, शत्रू राष्ट्रांवर एक प्रकारे विजय मिळवता येत नसेल, तर तिथल्या जनतेला अमली पदार्थांच्या जाळ्यात अकडकवून, त्या देशाचा सर्वनाश करता येतो. त्यामुळे दहशतवादी संघटनांसह त्यांना समर्थन करणारे देश या अमली पदार्थांच्या निर्मिती खरेदी-विक्रीमध्ये गुंतले आहेत. युनायटेड किंगडम सरकारच्या म्हणण्यानुसार, ”सीरियाच्या सरकारसाठी हे अमली पदार्थ उत्पादन विक्री आर्थिक जीवनरेषा आहे. यातून एका महिन्यात अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होते. अमली पदार्थांच्या घृणास्पद व्यापारामध्ये मेक्सिकोच्या अनेक टोळ्या सामील आहेत. मेक्सिकोमधील सगळ्या टोळ्यांच्या एकत्रित व्यापाराच्या तीनपट उत्पन्न सीरियाला या अमली पदार्थांच्या व्यापारातून मिळते. यावरून ‘कॅप्टॉगॉन’ किंवा ‘अॅम्फेटामाईन’चा बाजार किती मोठा आहे, हे समजते. बालकथांमध्ये सांगितले जायचे की, राक्षसाचा जीव पोपटात असतो. तसेच धर्मांध दहशतवाद्यांचा जीव या सीरियाच्या ड्रग्ज व्यापारात आहे!
९५९४९६९६३८