‘शाही गरुडा’चे मुंबई महानगरात आगमन; रोडावलेल्या संख्येकडे पक्षीतज्ज्ञांनी वेधले लक्ष

    11-Dec-2023
Total Views | 339
imperial eagle



मुंबई (विशेष प्रतिनिधी):
   हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाही गरुडाचे (इम्पीरियल ईगल) मुंबई महानगर प्रदेशामध्ये (imperial eagle in mumbai mmr) आगमन झाले आहे. कल्याण भागात सध्या या पक्ष्याचे दर्शन होत असून हा राज्यात स्थलांतर करून येणारा सर्वांत मोठा गरुड आहे (imperial eagle in mumbai mmr). असे असले तरी, मुंबई महानगर प्रदेशात त्याच्या रोडावलेल्या संख्येबद्दल पक्षीतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.(imperial eagle in mumbai mmr)



हिवाळ्याच्या आगमनाबरोबर देश-विदेशांमधून अनेक पक्ष्यांचे राज्यात स्थलांतर होते. यामध्ये किनारी पाणपक्ष्यांची संख्या अधिक असली तरी शिकारी पक्ष्यांच्या काही प्रजातीदेखील या काळात राज्यात दाखल होतात. 
या शिकारी पक्ष्यांमध्ये गरुडाच्या कुळातील काही प्रजातींचा समावेश असतो. त्यातीलच एक प्रजात म्हणजे शाही गरुड. कल्याणमधील मलंगगड या भागात सध्या या पक्ष्याचे दर्शन होत आहे. हाजीमलंग भागात सर्वप्रथम हा पक्षी 2018 साली पक्षीनिरीक्षक मनीष केरकर यांना दिसल्याची माहिती पक्षीनिरीक्षक प्रथमेश देसाई यांनी दिली. तेव्हापासून दरवर्षी हा पक्षी या भागात हिवाळ्यात येत असल्याची नोंद आम्ही करत असल्याचे देसाई म्हणाले. वीज वाहून नेणार्‍या खांबांवर हा पक्षी बसलेला दिसून येतो. मात्र, या प्रजातीमधील संख्येने एकच पक्षी या भागात दिसत असल्याचे देसाई अधोरेखित करतात. राज्यात आढळणार्‍या गरुडांमध्ये शाही गरुड हे आकाराने सर्वात मोठे गरुड आहे. त्याचा आकार 70 ते 80 सेंटीमीटर आणि पंखांचा विस्तार सात फुटांपर्यंत असतो.

मुंबई महानगरात दिसणारी ही प्रजात पूर्व शाही गरुडाची आहे. तो आग्नेय युरोप, पश्चिम आणि मध्य आशियाई भागांमध्ये प्रजनन करतो, तर ईशान्य आफ्रिका, मध्य पूर्व, दक्षिण आणि पूर्व आशियाई भागांमध्ये हिवाळ्यात स्थलांतर करतो. भारताचा विचार केल्यास प्रामुख्याने राजस्थान आणि गुजरातमध्ये तो प्रामुख्याने स्थलांतर करतो. महाराष्ट्रात त्यांचे स्थलांतर होत असले तरी ते छोट्या-छोट्या भागांमध्ये आणि संख्येने एक किंवा दोन पक्षी याच पद्धतीने होते. सद्यःपरिस्थितीत हा पक्षी कल्याण आणि पुण्याच्या भिगवन परिसरात दिसत आहे. मुंबई महानगरामधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, विरार आणि भांडुप उद्दचन केंद्रामधून देखील या गरुडाच्या नोंदी आहेत. काही दशकांपूर्वी हे पक्षी मोठ्या संख्येने हे पक्षी मुंबई महानगरात स्थलांतर करून येत होते.
"गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई महानगर क्षेत्रात स्थलांतर करून येणार्‍या शाही गरुडाची संख्या रोडावली आहे. देवनार येथील कचराभूमीवर जवळपास 80 शाही गरुडांची नोंद मी केली आहे. अशा परिस्थितीत सध्या मुंबई महानगरातील केवळ काही भागांमध्ये आणि त्यातही संख्येने एक किंवा दोन पक्षी दिसणे ही या प्रजातीच्या रोडावणार्‍या संख्येची चिन्ह आहेत."

-आदेश शिवकर, पक्षीतज्ज्ञ 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121