छत्तीसगढमध्ये विष्णु‘राज’

    11-Dec-2023   
Total Views |
Vishnu Deo Sai As a CM of Chattisgarh

छत्तीसगढमधील विधानसभेच्या ९० पैकी ५४ जागा मिळवून भाजपने बहुमत प्राप्त केले. मात्र, त्यानंतर तब्बल सात दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री कोण असेल, याचे उत्तर मिळाले आहे. कुनकुरी मतदारसंघातून विजयी झालेले, विष्णुदेव साय आता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून अरूण साव आणि विजय शर्मा यांना भाजपने उपमुख्यमंत्रिपदाची संधी दिली आहे, तर ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री रमण सिंह विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. रमण सिंह यांनीच साय यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. छत्तीसगढमध्ये जवळपास ३४ टक्के आदिवासी लोकसंख्या असून बस्तर आणि सरगुजा या ठिकाणी आदिवासींचे प्राबल्य सर्वाधिक आहे. त्यामुळे साव यांच्या निवडीला विशेष महत्त्व आहे. साय यांचा जन्म १९६४ साली आदिवासी कुटुंबात झाला. दहावीपर्यंत शिक्षण झालेले साव आता राज्याची धुरा सांभाळणार आहे. छत्तीसगढमधील ११ पैकी ११ लोकसभेच्या जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तसेच शेजारील झारखंड राज्यही आदिवासीबहुल असल्याने तेथील १४ लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी साय यांची निवड फायदेशीर ठरणारी आहे. १९८९ साली साय यांची बगिया गावाच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. १९९० साली पहिल्यांदा ते आमदार बनले. १९९८ पर्यंत ते मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. १९९९ साली पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ मध्येही ते खासदार म्हणून निवडून आले. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारीदेखील सांभाळली. २००६ मध्ये त्यांच्यावर छत्तीसगढ भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. २०११ साली पुन्हा ते प्रदेशाध्यक्ष बनले. २०२० मध्येही त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवले गेले. दि. ८ जुलै, २०२३ मध्ये त्यांची भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, जो बस्तर जिंकतो, तो राज्य जिंकतो असे छत्तीसगढमध्ये बोलले जाते आणि ते या निवडणुकीतही खरे ठरले. भाजपने बस्तरच्या १२ पैकी आठ जागांवर विजय मिळवत, राज्यातील विजय सुकर केला. तसेच “तुम्ही कुनकुरीमधून विष्णुदेव साय यांना विजयी करा, मी त्यांना मोठा व्यक्ती बनवतो,” असे आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आणि ते खरेदेखील करून दाखवले.

मायावतींची घराणेशाही


उत्तर प्रदेशात योगीराज आल्यानंतर, सपला उतरती कळा लागली आणि बसपमध्ये थोडासाही त्राण शिल्लक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. कारण, एकेकाळी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणार्‍या मायावतींनी आपला उत्तराधिकारीसुद्धा घोषित केला आहे. भाऊ आनंद कुमार यांचा मुलगा अर्थात मायावती यांचा भाचा आता बसपचे काम सांभाळेल. लखनौमध्ये बसपच्या बैठकीत याची अधिकृत घोषणा करण्यात आली. दरम्यान, मायावतींनी त्यांच्या आत्मचरित्रात, “माझ्यानंतर बसपचे नेतृत्व एक दलित व्यक्ती करेल, जो माझ्या कुटुंबातील नसेल,” असे म्हटले. मात्र, मायावतींनी आपलेच बोल खोटे ठरवत, भाच्याकडे पक्षाची धुरा सोपवली आहे. मायावतींनी आकाश आनंद याची बसपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली असून, हे पद पक्षाचे सर्वोच्च कार्यकारी पद आहे. आकाश हा बसपचा युवा नेता असून, नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मायावतींनी त्याच्याकडे पक्षाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपविली होती. याचवेळी त्यांच्याकडे मायावतींचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. यापूर्वी पक्षाचे क्रमांक दोनचे नेते म्हणून सतीश चंद्र मिश्रा यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, आता हे पद आकाशकडे सोपविण्यात आल्याने, पक्ष कारभारही आकाशच पाहणार आहे. चार वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या मायावतींनी १५ वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या ‘मेरे संघर्षमय जीवन का सफरनामा’ या आत्मचरित्रात बसपचा पुढचा नेता त्यांच्यासारखा दलित आणि वंचित समाजातील असेल, असे लिहिले होते. जो त्यांच्यापेक्षा ३०-३५ वर्षांनी लहान असेल. अशा स्थितीत ते दीर्घकाळ पक्षाचे नेतृत्व करू शकतील. बसपचा पुढचा नेता आपल्या कुटुंबातील नसेल, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, झाले उलटेच. मुळात इतकी वर्षं सत्तेत असूनही, मायावतींना आपल्या पक्षासाठी कुटुंबाव्यतिरिक्त दुसरा कोणता नेता सापडला नाही. २०१७ला बसपत आल्यानंतर लागलीच २०२३ साली आकाशकडे मोठी जबाबादारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता आकाश उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्ये वगळता देशभरातील पक्षाचा कारभार पाहणार आहे. सध्या मायावती उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशाची जबाबदारी सांभाळतील. ही केवळ मलमपट्टी म्हणावी लागेल. कारण, खरा निर्णय तर आधीच झालेला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.