या पाखरांनो, परत फिरा रे...

    11-Dec-2023   
Total Views |
Climate change impacting migratory animals

हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर देश-विदेशातील पक्ष्यांचे भारतात तसेच मध्य आशियात स्थलांतर सुरू आहे. मात्र, हवामान आणि वातावरण बदलांमुळे पक्ष्यांच्या स्थलांतरावर कोणते परिणाम आणि बदल झाले आहेत या विषयावर सदर परिषदेत चर्चा झाली. खंडात आणि देशात हिवाळ्यामध्ये येणार्‍या परदेशी पाहुण्यांची स्थलांतराची ठिकाणे बदलत आहेत. त्याचे कालावधीदेखील बदलत आहेत, तर काही पक्ष्यांच्या स्थलांतराच्या प्रमाणामध्ये बदल झाले आहेत, असे निदर्शनास आले आहे. हवामान आणि वातावरण बदलाचे परिणाम ग्रहावरील जवळ-जवळ प्रत्येक घटकाला भोगावे लागत आहेत, हे आपल्याला माहीत आहेच.

पर्यावरणाचे अपरिमित नुकसान, अविचारी विकास प्रकल्प, त्यातून होणारे प्रचंड प्रदूषण आणि मानवाची दिवसेंदिवस वाढतच चाललेली हाव अशी अनेक कारणे वातावरण बदलाला कारणीभूत आहेत. जैवविविधतेच्या आणि परिसंस्थेच्या नाशास यातील अनेक घटक कारणीभूत ठरत असून, यामध्ये कित्येक स्थानिक, प्रदेशनिष्ठ प्रजातींचा बळी गेला आहे. परिसंस्थेतील प्रत्येक घटक हा त्या त्या स्तरावर किती महत्त्वाची भूमिका बजावत असतो, हे निराळे सांगायला नकोच! परंतु, याच परिसंस्थेतील एखाद्या जरी घटकाला धक्का पोहोचला, तरी संपूर्ण परिसंस्था विस्कळीत होऊ शकते.

हिवाळ्यामध्ये स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांमध्ये काही पक्षी पाणथळ जागांवर, काही गवताळ प्रदेशांवर काही बर्फाळ प्रदेशांमध्ये, तर काही पर्वतीय भागातदेखील स्थलांतर करतात. पाणथळ स्थळांवर होणारे जलप्रदूषण, अवैध अतिक्रमण, गवताळ प्रदेशांना पडीक जमीन संबोधत त्यावर केली जाणारी कामे, तर पर्वतीय भागात ही मोठ्या प्रमाणावर वाढलेला मानवी हस्तक्षेप यांमुळे तेथील अधिवास सातत्याने बदलत आहे. या प्रत्येक प्रदेशाच्या असलेल्या परिसंस्थेवर हवामान बदलाचे परिणाम होत असून, यामुळेच या पक्ष्यांच्या स्थलांतरावरही परिणाम होत असल्याचे लक्षात घ्यायला हवे.

‘कॉप २८’ हवामान बदल परिषदेमध्ये ’युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन’ने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये हवामान बदलाचे हवाई, जलचर आणि स्थलीय स्थलांतरित प्रजातींवर थेट परिणाम होत आहेत, असे समोर आले आहे. यामध्ये हत्ती, मांजर, सिंह यांसारख्या भूचर प्राण्यांबरोबरच स्थानिक स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांवर परिणाम दिसून येत आहेत. स्थलांतराच्या वेळेत बदल, उष्णतेच्या लाटा, मुसळधार पाऊस यांसारख्या अत्यंत वेगाने बदलेल्या हवामानामुळे मृत्यूची वाढलेली संभाव्यता यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर तापमान संवेदनशील असलेल्या पेंग्विन, कासव, बर्फाळ प्रदेशातील बिबटे यांसारख्या प्राण्यांच्या प्रजननावरही परिणाम होत असल्याचे लक्षात आले आहे.

तसेच या अहवालामध्ये हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी विविध प्रजाती कशी भूमिका बजावत आहेत, त्याचबरोबर हवामान बदलामुळे उद्भवलेल्या धोक्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी काही प्रजातींचे योगदान नमूद करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, दीर्घायुषी असलेले ‘व्हेल कार्बन’ कॅप्चरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांच्या जीवनकाळात ते त्यांच्या शरीरारमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन साठवून ठेवतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह समुद्राच्या तळाशी पोहोचतो म्हणून ते ‘कार्बन लॉक’ करतात असे म्हटले जाते. त्यामुळे, प्रत्येक व्हेलची दरवर्षी अंदाजे ०.०६२ मेगाटन इतके कार्बन उत्सर्जन करण्याची क्षमता असते, असे ’डाऊन टू अर्थ’ या संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे. स्थलांतरावर परिणाम करणारे यासारखेच अनेक पुरावे या अहवालामधून सादर करण्यात आले असून, उष्ण तापमानामुळे अन्नाच्या वेळेवर आणि विपुलतेवर परिणाम होत असल्याचे लेखकांनी नमूद केले आहे.

पेंग्विन, कासव यांच्या प्रजनन क्षमतेवर होणारे परिणाम, पाणपक्षी, ग्रेटर फ्लेमिंगो, रेडशँक यांसारख्या पक्ष्यांच्या लोकसंख्येवर होणारे परिणाम लक्षात घेता, या अहवालाने हवामान आणि वातावरण बदलाचे गांभीर्यच पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. घरातला कचरा, अनावश्यक गोष्टींवर होणारा अवाढव्य खर्च, जागरुकता असूनही केवळ दुर्लक्षून केलेले प्रदूषण, एकूणच पर्यावरणाच्या प्रश्नांप्रति असलेली अनास्था या आणि अशा अनेक गोष्टींचा बारकाईने विचार होऊ लागला, त्यांना आळा घालता आला, तरीही हवामान बदलाचे घातक परिणाम थांबविण्याच्या चळवळीचे आपण एक कार्यकर्ते होऊ शकू. त्यामुळे अधिवास संवर्धनाच्या दृष्टीने उचलेले एक पाऊल शाश्वत जीवनशैलीच्या दिशेने वळावे, हीच माफक अपेक्षा!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.