मुंबई : एनआयएने शनिवारी कर्नाटकसह महाराष्ट्रात केलेल्या छापेमारीत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत शस्त्रास्त्र आणि इसिस संबंधी काही साहित्य जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या आरोपींनी भिवंडी तालूक्यातील पडघा हे गाव इस्लामिक स्टेट म्हणून घोषित केल्याची माहिती पुढे येत आहे.
पडघा येथील हे इसिसचे महाराष्ट्र मॉडेल असून याचा सुत्रधार मुंबई बाँम्ब हल्ल्यातील आरोपी साकीब नाचन आहे. तो बोरिवली मध्ये राहून इसिससाठी काम करत होता. संपुर्ण देशभरातील मुस्लिम तरुणांना इसिससाठी काम करण्यास तो प्रभावित करत होता. यापूर्वीही साकिबला दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी न्यायालयाने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावली आहे.
त्यानंतर आता शनिवारी त्याला अटक करण्यात आली आहे. साकिब नाचनवर भारतात इसिस नेटवर्क तयार करण्याचा आणि इतर कट्टरपंथींसोबत दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप आहे. त्याने महाराष्ट्रातील पडघा या गावाला 'अल-शाम' म्हणजेच इस्लामिक स्टेट म्हणून घोषित केले होते. इथे तो इस्लामी शरिया कायदा चालवत असे.
यापुर्वी मुंबईत २००२-०३ मध्ये झालेल्या ३ बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी साकिबला आरोपी केले होते. साकिब हा बॉम्ब बनवण्यात तज्ञ मानला जातो. तो इतर तरुणांना केवळ बॉम्ब बनवण्याचेच नाही तर त्यांची चाचणी घेण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी स्फोट करण्याचे प्रशिक्षणही देतो. साकिबचा मुलगा शमिल नाचनही यामध्ये सहभागी आहे.