व्यक्तिविकास, राष्ट्रनिर्माणासाठी ‘निपुण भारत अभियान’

    10-Dec-2023
Total Views | 175
Central Government Nipun Bharat Abhiyan

केंद्राने ‘निपुण भारत अभियाना’ची अंमलबजावणी करत २०२६-२७ पर्यंत तिसरीच्या वर्गापर्यंत भाषा आणि गणिताच्या क्षमता प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट राखले आहे. राज्यात राज्य सरकारनेही त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. अभियानाचे ध्येय साक्षरतेच्या पलीकडे जात व्यापक ठेवण्यात आले आहे. ते साध्य करण्याचे मोठे शिवधनुष्य आहे. ती साध्य झाली, तरच भविष्यात शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा, समाजाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास करणे शक्य आहे.

भारत सरकारने ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२०’ जाहीर केले. धोरणाने मोठ्या बदलाच्या दिशेने झेप घेण्याची भूमिका प्रतिपादन केली आहे. धोरणात प्राथमिकपासून तर उच्च शिक्षणापर्यंत गुणवत्ता विकासासाठी नव्या संस्थांची निर्मिती, नवा आकृतीबंध, माहिती-तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, १०० टक्के विद्यार्थी शिकावेत म्हणून ‘निपुण भारत’सारख्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. अर्थात, ‘निपुण अभियाना’ची अंमलबजावणी करताना धोरणात म्हटले आहे की, “देशात पाच कोटी मुले शिक्षणाच्या प्रवाहात असूनही ती पायाभूत साक्षरतेपासून दूर आहे. ही संख्या लक्षात घेतली, तर आपल्याला गुणवत्तेसाठी अजूनही बराच मोठा टप्पा पार करावा लागणार आहे, हे वास्तव समोर येते. त्यासाठी केंद्राने ‘निपुण भारत अभियाना’ची अंमलबजावणी करत २०२६-२७ पर्यंत तिसरीच्या वर्गापर्यंत भाषा आणि गणिताच्या क्षमता प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट राखले आहे. राज्यात राज्य सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. अभियानाचे ध्येय साक्षतेच्या पलीकडे जात व्यापक ठेवण्यात आले आहे. ते साध्य करण्याचे मोठे शिवधनुष्य आहे. ते साध्य झाले, तरच भविष्यात शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा, समाजाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास करणे शक्य आहे.”

शिक्षण म्हणजे केवळ लिहिणे, वाचणे नाही, तर त्या पलीकडे विद्यार्थ्याला जगण्यासाठी सक्षम करणे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट शिक्षणात नमूद केले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडणे गरजेचे आहे. पैलू पडले तरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळेल. त्यादृष्टीने आपण किती प्रयत्न करतो, हे महत्त्वाचे आहे. ‘निपुण भारत अभियाना’संदर्भात तीन ध्येय निश्चित करण्यात आली आहे. त्यातील मुले प्रभावी संवादक बनतात, या ध्येयाच्या दिशेने बराच मोठा टप्पा पार करावा लागणार आहे. आपल्याकडे भाषेची चार कौशल्य मानली जातात. त्यात श्रवण, भाषण, वाचन, लेखन. यातील भाषण कौशल्य विकसनाच्या दृष्टीने जितके म्हणून प्रयत्न करण्याची गरज आहे. तितके प्रयत्न होताना दिसत नाही. प्रभावी संवादक बनण्यासाठी भाषा उत्तम यायला हवी. भाषेचे आकलन उत्तम झाले, तरच संवादाची प्रक्रिया घडू शकेल. भाषेच आकलनाच्या दृष्टीने प्रयत्नांची गरज सातत्याने विविध सर्वेक्षणातून समोर आली आहे. मुळात यासाठी पायाभूत स्तरावर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

धोरणातील पायाभूत स्तराचा विचार करता, वय तीन ते नऊमधील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे.अंगणवाडी किंवा बालवाडीत तीन वर्ष विद्यार्थी शिकणार आहे. पुढील पहिली व दुसरीची दोन वर्ष असा पाच वर्षांचा एकत्रित पायाभूत स्तर असणार आहे. तीन वर्षांचे मूल जेव्हा अंगणवाडीत प्रवेश करेल, तेव्हा बालक घरची भाषा घेऊन दाखल होणार आहे. अर्थात, आपल्याकडे बालकांच्या भाषेचा विचार करता घरची भाषा, परिसर भाषा आणि शाळेची भाषा अशा तीन भाषेतून ते येत असते. काही मुलांच्या बाबतीत मुलांची घरची भाषा आणि शाळेची भाषा एक असण्याची शक्यता असते. मात्र, बहुतांश मुलांच्या बाबतीत घरची व शाळेच्या भाषेत फरक असणार आहे. मुलांची भाषा हे शिक्षणाचे माध्यम झाले, तर शिकणे सुलभ होत असते. त्यामुळे या स्तरावर संवादासाठी बोलीला अधिक प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. खरंतर धोरणातही बोलीभाषेचा स्वीकार करण्याबाबत सूचित केले आहे. ध्येयातदेखील ‘प्रभावी संवाद’ असे म्हणताना स्वतःच्या भाषेत संवाद करता यायला हवा.

मुळात आपल्याकडे भाषेचा मोठा प्रभाव आहे. भाषेला प्रतिष्ठादेखील आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रमाणभाषेत संवाद साधता यायला हवा, असे वाटत असते. बोलीत संवाद करताना अनेकांना काहीशी लाजही वाटत असते. बोलीभाषेला प्रतिष्ठा नाही, असा समज केला गेला आहे. मात्र, प्रभावीपणे संवादाची पावले टाकायची असतील, तर आपल्याला बोलीभाषेतून पायाभूत स्तरावर त्याला संवादाची अधिक संधी द्यायला हवी. त्याच्या गरजा, आवडीनिवडी, त्याच्या भावनाचे प्रगटीकरण हे बोलीभाषेतून करण्यास अडथळा येईल, असे काही घडता कामा नये. मुलं ज्या परिसरात वाढतात, त्याच परिसरातील भाषेत अधिक चांगली शिकतात, असे भाषातज्ज्ञ सांगत आले आहेत. समाजात एका विशिष्ट भाषेला प्रतिष्ठा देण्याच्या नादात आपण स्थानिक, बोलीभाषेकडे दुर्लक्ष करत आलो आहोत. हे होणारे दुर्लक्षच मुलांच्या शिक्षणात अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे प्रमाण भाषेकडील प्रवास करण्यापूर्वी पायाभूत स्तरावर विद्यार्थ्यांच्या भाषेत अधिक सुसंवादाची गरज आहे. त्यामुळे बोली हीच शिक्षणाची भाषा व्हायला हवी. या स्तरावर मुलांचा संवाद उंचवण्याकरिता प्रयत्न करताना गाणी, बडबडगीते, गोष्टी सांगितल्या जातात.

मात्र, ते साहित्य हे मुलांच्या भाषेतील असेल, तर मुलांचे भावविश्वास जोपासले जाईल. त्यासाठी शासन स्तरावरदेखील स्थानिक भाषेतील गाणी, गोष्टी, बडबड गीतांची पुस्तके प्रकाशित करण्याची आणि शाळा स्तरावर त्याचे उपयोजन करण्याची गरज आहे. केवळ आपली भाषा शाळेत उपयोगात आणली, या घटनेने शाळा आणि घर यातील अंतर कमी होते. शिक्षक आणि बालक हेही अंतर कमी होण्यास मदत होईल. आपली भाषा शिक्षणात उपयोजन न केले गेल्यास मुलाचा आत्मविश्वास कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे आपली भाषा शिक्षणात उपयोगात आणली गेली, तर शिक्षणास आरंभ होण्यास मदत होईल. शिकण्यात आत्मविश्वास आला, तरच पुढे जाता येणार आहे.

बोली हीदेखील भाषाच आहे. मुलांच्या शिक्षणाचा दुवा म्हणून ही भाषा पाया घालत असते. आपल्या देशात दर दहा कोसाला भाषा बदलते. आपल्या मराठी भाषेशी नाते सांगणार्‍या सुमारे ५२ बोलीभाषा आपल्याच राज्यात बोलल्या जातात. आदिवासी क्षेत्रात बोलली जाणारी भाषा ही शाळेत जोपासली नाही, तर मुले शाळेशी नाते सांगणार नाहीत. कोरकू भाषेतील मुले प्रमाण भाषेत शिकू लागतील, तर त्यांच्यासाठी मराठी हीदेखील नवी भाषा ठरू पाहते. त्या अर्थाने शाळाशाळांत स्थानिक भाषेचे उपयोजन पायाभूत स्तरावर तरी अनिवार्य करायला हवे. अनेक ठिकाणी शाळेत येणारी मुले ही पहिल्याच पिढीचे आहेत. त्यांच्या घरात प्रमाणभाषा असण्याची शक्यता नाही, मग त्याने प्रमाण भाषेतच आरंभी शिकावे, असे वाटणे म्हणजे आपण त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का पोहोचविणे आहे.

शाळेत संवाद कौशल्यवृद्धीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी अनुभवाचे सादरीकरण, नाट्यीकरण, अभिव्यक्तीचे इतर मार्ग आहेत. त्यांचा अवलंब करत मुलांना संवादाची संधी द्यायला हवी. ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ही आपल्या शिक्षणातील परंपरा शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यात अडचणी निर्माण करते. मात्र, तीच परंपरा चांगली मानून आपण पुढे जात राहिलो, तर भाषेच्या विकासाची शक्यता कमी होते. मुलांना अधिकाधिक संवादाची संधी कोणत्या मार्गाने देता येईल, असे अध्यययन अनुभवांच्या योजनाची गरज आहे. खरेतर पहिली काही वर्ष मुले अधिक बोलतील यासाठी प्रयत्न करायला हवेत. वस्तू देऊन त्या विषयी बोलणे, घरातील माणसांविषयी बोलणे, पाहिलेल्या अनुभवलेल्या घटनांविषयी बोलू देणे गरजेचे आहे.

अर्थात, अशा स्वरूपाचे अनुभव मुलांच्या श्रवण आणि भाषण कौशल्यात भर घालणारे आहेत. ही दोन्ही कौशल्य म्हणजे वाचन, लेखन कौशल्याचा पाया आहे. ही कौशल्य जितकी समृद्ध होतील तितके अधिक चांगले शिकणे होणार असते. त्यामुळे बालकांना केवळ व्यक्त होण्याच्या अधिकाधिक संधी कशा मिळतील, त्यावर अधिक विचार करण्याची गरज आहे. ही चारही कौशल्य स्वतंत्र नाहीत, तर ती एकमेकाशी नाते सांगणारी आहेत. विकासाच्या दृष्टीने ती एकमेकाला पूरक आहेत. त्यामुळे सर्व कौशल्य विकसित होतील, असे प्रयत्न करावे लागतील. ऐकलेले किती आकलन झाले, यावर संवाद अवलंबून असतो. त्यामुळे श्रवणाचे आकलन झाले, तर वाचनाचे आकलन होईल. एकूणच आकलनाचा विचार महत्त्वाचा आहे. आकलन उत्तम असेल, तर बालक हळूहळू लिहायला, वाचायला शिकतील. त्यामुळे या स्तरावर अधिकाधिक संवादाच्या संधी देणे म्हणजे शिक्षणासाठी भविष्याचा पाया घालणे आहे.

भाषा समृद्ध झाली, तर माहितीची देवाणघेवाण करणे, जाणून घेणे घडत जाते. त्यादृष्टीने बालकांना भाषिक क्षमता प्राप्त झाल्या, तरच अपेक्षित असलेली उच्च दर्जाची चिकित्सक, सर्जनशील कौशल्य प्राप्त करता येणे शक्य आहे. जेथे भाषा समृद्ध नाही तेथे वरच्या दर्जाची कौशल्य तरी कशी साध्य होतील. त्यामुळे ‘निपुण भारत अभियाना’त मांडलेल्या ध्येयांचा विचार हा व्यापक स्वरूपाचा आहे. संवादावर भर देण्याची अपेक्षा आहे. प्रभावी संवादक बनण्याची अपेक्षा पूर्ण करायची असेल, तर त्याला भाषा, शब्द, त्यांचे अर्थ जाणता यायला हवेत. आकलनाशिवाय आपल्याला पुढचा टप्पा पार करता येणार नाही. आकलन झाले तरच संवादाला गती मिळेल. जितके आकलन समृद्ध होईल, तितक्या मोठ्या प्रमाणावर भाषेतील संवाद अर्थपूर्ण होण्यास मदत होईल. आज समाजात पदवी घेतल्यानंतरदेखील संवाद साधता येत नाही. आपल्या मनातील मताचे, भावभावनांचे प्रगटीकरण करता येत नाही. याचे कारण शिक्षणात संवादाच्या संधीचा अभाव, हेच कारण आहे. आपण शिक्षणासाठी किती प्रमाणात विविध संधींचा विचार करतो, तितक्या मोठ्या प्रमाणात शिक्षणाची गुणवत्ता उंचवण्यास मदत होणार आहे.

संदीप वाकचौरे
sandeepwakchaure२००७@rediffmail.com
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121