१० मुलं जन्माला घाला, १३ लाख मिळवा! पुतीन सरकारचे महिलांना आवाहन
- १० मुलांना जन्म देणाऱ्या महिलांना मिळणार मदर हिरोईन पुरस्कार
01-Dec-2023
Total Views | 26
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियन महिलांना किमान 8 मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी (28 नोव्हेंबर 2023) मॉस्कोमध्ये जागतिक रशियन पीपल्स कौन्सिलला संबोधित करताना पुतीन यांनी 10 किंवा त्यापेक्षा जास्त मुलांना जन्म देणाऱ्या रशियन महिलांना 13 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तिन यांनी सोव्हिएत काळातील 1944 चा 'मदर हिरोईन' पुरस्कार पुन्हा सुरू केला आहे. 10 किंवा त्याहून अधिक मुलांना जन्म देणाऱ्या महिलेला हा पुरस्कार देण्यात येईल.
कोविडनंतर, युक्रेनमधील युद्ध आणि गहिरे आर्थिक संकट यामुळे रशियन जन्मदर घसरत आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात मारल्या गेलेल्या रशियन सैनिकांची संख्या वाढतच आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं रशिया जगातील सर्वात मोठा देश आहे. मात्र, रशियाची लोकसंख्या मात्र १४ कोटी ४१ लाख आहे.
व्लादिमीर पुतीन म्हणाले, "आमच्या अनेक आजी आणि पणजींना सात, आठ किंवा त्याहून अधिक मुले होती. या उत्कृष्ट परंपरांचे जतन आणि पुनरुज्जीवन करूया. रशियामधील प्रत्येकाने मोठ्या कुटुंबांना आदर्श केले पाहिजे. कुटुंब हा केवळ राष्ट्र आणि समाजाचा पाया नाही. ही एक आध्यात्मिक घटना आहे, नैतिकतेचे साधन आहे. आमचे ध्येय रशियाची लोकसंख्या येत्या दशकांसाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी टिकवून ठेवणे आणि वाढवणे हे आहे. हे रशियन जगाचे, सहस्राब्दी-जुन्या, शाश्वत रशियाचे भविष्य आहे."
युक्रेनमधील युद्धामुळे, अंदाजानुसार, 900,000 लोकांना देश सोडून पळून जावे लागले. युक्रेनमध्ये लढण्यासाठी रशियन सैन्यात अतिरिक्त 300,000 लोकांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे रशियामध्ये काम करणाऱ्या लोकांची कमतरता निर्माण झाली आहे. जुलैमध्ये रशियन मीडिया आउटलेट्स मीडियाझोना आणि मेडुझा यांनी केलेल्या सांख्यिकीय विश्लेषणात असे म्हटले आहे की, युक्रेनबरोबरच्या युद्धात सुमारे 50,000 रशियन पुरुष मरण पावले.ऑक्टोबरमध्ये ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, रशियाच्या युक्रेनविरुद्धच्या युद्धात 290,000 लोक मारले गेले.
१९४४ मध्ये सुरु झालेली योजना
मदर हिरोईन ही योजना १९४४ मध्ये सोव्हिएत यूनियनचा नेता जोसेफ स्टॅलिन यांनी सुरु केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाची लोकसंख्या वेगानं घटू लागली होती. त्यामुळं त्यावेळी लोकसंख्या वाढीसाठी सरकारनं ही योजना सुरु केली होती. १९९१ मध्ये रशियाचं विभाजन झाल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली होती. २००० मध्ये पुतीन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर देखील लोकसंख्या घट सुरुच आहे. त्यावेळी १० वर्षात परिस्थिती बदलेलं असं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्याचा परिणाम दिसून आला नाही. अर्थशास्त्रज्ञांनी देखील रशियाच्या घटत्या लोकंसख्येचा फटका बसेल, असा इशारा दिल्यानंतर रशियाच्या अध्यक्षांनी १९५० च्या दशकातील योजना सुरु केली आहे.