मुंबई : एमआयएम पक्षाचे माजी नगरसेवक शहनवाज शेख यांनी गुरुवारी रात्री शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. मुंबई पालिकेच्या अणुशक्ती नगरमधील प्रभाग क्रमांक १४५ मधून ते निवडून आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री वर्षा या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना हा पक्ष सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून विकासाला प्राधान्य देणारा आहे. मुंबईचा सर्वांगीण विकास करताना अणुशक्ती नगर परिसराचा देखील विकास केला जाईल, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबई स्वच्छ आणि सुंदर असावी यासाठी, आमचे प्रयत्न सुरू असून, वाडी वस्तीवर देखील स्वच्छता, आरोग्य, मूलभूत सेवा मिळायला हव्यात. अणुशक्ती नगर परिसरातील नागरिकांना देखील त्या नक्कीच दिल्या जातील असेही एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.