झारखंड पोलिसांची मोठी कारवाई! इसिसशी संबंध असलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक
09-Nov-2023
Total Views | 44
रांची : इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या दोन दहशतवाद्यांना झारखंड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. अरिज हसनैन आणि मोहम्मद नसीम अशी या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. ते दोघेही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या इस्लामिक दहशतवादी संघटनांशी संबंधित होते.
यातील अरिज हसनैन हा पॅलेस्टाईनला जाण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे. तेथील अल अक्सा मशीदीला आत्मघाती हल्ला करून ज्यूंपासून वेगळे करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. दहशतवाद विरोधी पथकाने पहिल्यांदा अरिज हसनैनला अटक केली. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसच्या विचारसरणीचा प्रचार करत होता. त्याची चौकशी केली असता त्याने मोहम्मद नसीमबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, इसिसशिवाय पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशीही त्यांचे संपर्क असल्याचे पुरावे मिळाले आहेत. चौकशीदरम्यान, अरिज हसनैन याने अनेक खुलासे केले आहेत. नसीमने त्याला हमास, इसिस आणि इतर दहशतवादी संघटनांची माहिती दिली असल्याचे त्याने सांगितले.
तसेच मोहम्मद नसीमने 'जिहाद' आणि 'क्रुफ बीथ तागूत' ही पुस्तकेही त्याने अरिज हसनैनला पाठवल्याचे त्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, हसनैन सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने दहशतवादी विचारसरणीचा प्रसार करत होता. दहशतवाद विरोधी पथकाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.