नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी दहा राज्यांमध्ये मानव तस्करीविरोधात छापेमारी केली. यावेळी जम्मू काश्मीरमध्ये एका रोहिंग्यास ताब्यात घेतले आहे. एनआयएने त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, पुदुच्चेरी, राजस्थान आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये छापेमारी केली.
आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या मानवी तस्करांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या १० राज्यांमधील चार डझनहून अधिक ठिकाणी छापे टाकले. यावेळी जम्मू येथील बठिंडी येथून जफर आलम या म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमास पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या महिन्यात बंगळुरू येथील एनआयएच्या पथकाने श्रीलंकेतील मानवी तस्करी प्रकरणात तामिळनाडूतून एका फरार आरोपीला अटक केली होती. इम्रान खान नावाच्या आरोपीने इतर सहआरोपींसह श्रीलंकन नागरिकांची बेंगळुरू आणि मंगळुरू येथे विविध ठिकाणी तस्करी केली होती. त्यानंतर एनआयएने देशव्यावापी मोहिम हाती घेतली आहे.
त्याचप्रमाणे निरपराध लोकांना तस्करांकडून खोटी आश्वासने देऊन आमिष दाखवल्या जाणाऱ्या प्रकरणांचाही तपास करत आहे. यामध्ये प्रामुख्याने कॅनडामध्ये स्थलांतर करण्यासाठी वैध कागदपत्रे मिळवणे आणि रोजगाराच्या संधी सुरक्षित करणे आणि इतर अमिषे दाखविली जातात.