नवी दिल्ली : पिकांच्या अवशेषांपासून (पराली) होणारे प्रदूषण टाळण्यासाठी केंद्र सरकार त्यापासून बायोगॅस तयार करण्याची चाचपणी करत आहे. त्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बर्लिनमध्ये जर्मन बायोगॅस असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) क्लॉडियस दा कोस्टा गोमेझ यांची भेट घेऊन चर्चा केली.
देशाची राजधानी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसर (एनसीआर) सध्या वायु प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. प्रामुख्याने पंजाब राज्यातील शेतकऱ्यांकडून या कालावधीत मोठ्या प्रमाणात पराली जाळण्यात येते. त्यापासून निर्माण होणारा धूर हा दिल्ली एनसीआरमध्ये साठला आहे. त्यामुळे राजधानीतील वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्युआ) हा पाचशेपार गेला आहे.
पराली जाळण्याच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी केंद्र सरकार सज्ज झाले आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बर्लिनमध्ये जर्मन बायोगॅस असोसिएनशसोबत चर्चा केली. त्याविषयी त्यांनी ‘एक्स’वर माहिती दिली. ते म्हणाले, पंजाबमधील पराली जाळण्याच्या प्रकारामुळे वायु प्रदूषणाची गंभीर स्थिती निर्माण होते. त्यासाठी जर्मन बायोगॅस असोसिएशनचे सीईओ क्लॉडियस दा कोस्टा गोमेझ यांच्यासोबत चर्चा केली आहे.
बायोगॅस निर्मितीसाठी परालीचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामध्ये जर्मनी आघाडीवर असल्याचे केंद्रीय मंत्री पुरी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारतातील पराली प्रदूषणावर मार्ग काढण्यासाठी त्यापासून बायोगॅस बनवण्यासाठीचा प्रकल्प भारतात राबविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताच्या स्वच्छ उर्जा स्त्रोतांच्या शोधाला गती मिळेल आणि शेतकर्यांसाठी उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण होईल, असेही केंद्रीय मंत्री पुरी यांनी नमूद केले आहे.