संगीत ते समाधी

    08-Nov-2023
Total Views | 59
Articel on Music to Samadhi Spirituality

सुर्याच्या किरणांचे पृथक्करण केल्यास त्यातून दृश्यमान होणारे सप्तरंगच असतात. परंतु, या सप्तरंगापूर्वी आणि नंतरही अनेक रंग शलाका असतात. लाल रंगापूर्वीच्या रंग शलाकांना ‘इन्फ्रारेड’, तर जांभळ्या रंगानंतरच्या रंगशलाकांना ‘अल्ट्रावायोलेट’ असे म्हणतात. विद्युत उपकरणात या रंगशलाका दृग्गोचर होतात, पण मानवी नेत्र त्या रंगशलाका पाहू शकत नाही. दर सेकंदाला २० ते २० हजारांपर्यंत कंपन असणारे नादच माणसाला ऐकू येतात. त्या अगोदरचे किंवा त्यानंतरचे नाद माणसाच्या कर्णेंद्रियाला चेतवू शकत नाहीत. माणूस अशा तर्‍हेने मर्यादित स्वरुपात वसत असतो.

म्हणूनच योगशास्त्रात मानवाला ‘क्षिप्त’ अवस्थेचा म्हटले आहे. ‘क्षिप्त’ म्हणजे मर्यादित शक्तीचा. माणसाला आपल्या इंद्रिय शक्तीची क्षमता साधनेने अनेक पटीने वाढविता येते. कुत्र्याला दूरचे ऐकू येते व सूक्ष्म वास का येतात? तर त्या जीवयोनीत तसले ऐकण्याकररिता आणि वास घेण्याकरिता लक्षावधी वर्षापासून सतत धडपड झाली म्हणून. आकाशात मैलोन्मैल उंच उडणार्‍या गरुड पक्ष्याच्या इवल्याशा नेत्रांना पृथ्वीवरील बारीकसारीक वस्तू का दिसते? तर त्या योनीत तसला प्रयत्न लक्षावधी वर्षांपासून झाला म्हणून. आजचे प्राणीशास्त्र या सर्व गोष्टींचे अशाच तर्‍हेने स्पष्टीकरण देते. यावरून हे स्पष्ट आहे की, जीवाने प्रयत्न केल्यास तो ज्या योनीत आहे, त्या योनीच्या इंद्रियशक्तींची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढू शकते. डार्विन नावाच्या जीवशास्त्रज्ञाच्या मते, मानव माकडापासून, माकड कुत्र्यापासून, कुत्रा सरड्यापासून, सरडा मासोळीपासून, गरुड मासोळीपासून आणि मासा अमीबापासून उत्पन्न झाला आहे. म्हणजे मानव योनीमध्ये गरुड आणि कुत्रा या योनींचे गुणधर्म असायला हवेत. परंतु, मानवाने काळाच्या ओघात त्या इंद्रिय शक्ती गमावल्या आहेत.

जनावरे व पशु आपापले कान टवकारु शकतात, तर कानांच्या स्नायूंना ते काम न दिल्याने माणसाच्या कानांचे स्नायू संकोच पावून आता मानवाला कान टवकारता येत नाहीत. आवाज ऐकण्याकरिता त्याला आपली मानच वळवावी लागते आणि एवढे करुनही मानवाला कुत्र्याप्रमाणे सूक्ष्म नाद ऐकू येत नाहीत, हे वेगळे. मनुष्य देह जर निम्न योनीपासून उत्क्रांत झाला आहे, तर मानवी देहावर पुनः योग्य संस्कार केल्यास मानवाला कुत्र्याप्रमाणे दूरचे ऐकता येईल, दूरचा वास घेता येईल, सूक्ष्म वास ओळखता येईल आणि मांजराप्रमाणे अंधारात पाहता येईल. गरुडाप्रमाणे मानवाला दूरचे सूक्ष्मावलोकन करता येईल, तर पक्ष्यांप्रमाणे येणार्‍या ऋतूंचे आगावू ज्ञान होऊन त्याकरिता तयारी करता येईल. आजच्या जीवशास्त्रानुसार मानव निम्न योनीपासून उत्क्रांत झाला आहे. या दृष्टीने सर्वच निम्नयोनी म्हणजे मानव होत. जर्मनीतील एका जीवशास्त्रज्ञाने आपल्या जीवशाळेत भिंतीवर अनेक प्रकारचे जीवंत जीव लटकवले असून पाहणार्‍यांनी त्या जीवांना त्रास देऊ नये म्हणून भिंतीवर लिहून ठेवले आहे ‘तत् त्वं असि’, ते तूच आहेस !

मानवाच्या शक्ती
 
साधनेने माणसाला आपल्या शक्ती आहेत त्यापेक्षा अनेक पटींनी वाढविता येतात. एवढेच नव्हे, तर कोणतीही शक्ती कोणत्याही इंद्रियाला गम्य करता येते. सर्व शक्ती एकाच मूळ शक्तीचा अविष्कार असल्याने कोणत्याही इंद्रियाची शक्ती कोणत्याही इंद्रियाला प्राप्त होऊ शकते. योगी सर्व कंपन लहरींचे प्रकाश पाहू शकतोच, पण तो प्रकाश ऐकूही शकतो, नाद पाहू शकतो, नादाचा स्पर्श आणि गंध अनुभवू शकतो आणि अशा तर्‍हेने इंद्रिय शक्तींची परस्पर देवाणघेवाण करु शकतो. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. असल्या शक्ती असामान्य अवश्य आहेत. परंतु, त्या प्रयत्न साधनाने शक्य आहेत. योगमार्गातील एक मार्ग म्हणजे हठयोग असल्याच असाधारण शक्तींची वाढ करण्याकरिता झटत असतो.

हठयोगी पानकोंबडीप्रमाणे पाण्यावरून चालू शकतो, तर पक्ष्याप्रमाणे आकाशातून गमन करू शकतो. तो भूगर्भातील आणि चंद्रसूर्यावरील नाद ऐकू शकतो, तर अवकाशयानाशिवाय कोणत्याही ग्रहावर फेरफटका मारू शकतो. अवकाशयानाची जी क्षमता व संचालन रचना असते, तसली क्षमता व संचालन रचना योगी स्वतःच्या शरीराची करुन ग्रहमालेवर फेरफटका करू शकतो. याशिवाय ज्या काही शक्ती अजून मानवाला गम्य झाल्या नाहीत, त्या सर्व अदृश्य व अनाकलनीय शक्ती हठयोगी आपल्यात संचारु शकतो. यात अशास्त्रीय किंवा अतर्क्य असे काहीच नाही. केवळ सतत प्रयत्नांची आवश्यकता आहे. असल्या प्रयत्नांना हट्टाने प्राप्त करणारा तो हठयोगी! गानयोग असल्याच असामान्य शक्तींची एक मर्यादित अवस्था आहे. पण, त्याकरिता त्या सर्व अनुभवांना प्रतीत करण्याचे माध्यम जे स्वतःचे शरीर उपकरण, ते तेवढेच क्षमतावान असायला पाहिजे. ते तसे नसल्यास असल्यांना त्या सत्यांचा अनुभवच येणार नाही.

जड असे वैज्ञानिक उपकरण बिघडल्यास त्याद्वारे येणारे अनुभव येऊ शकत नाहीत किंवा एक बँडच्या रेडिओवर जगातील सर्वच आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम ऐकू येऊ शकत नाहीत, हे सर्वांनाच माहीत आहे. १५ कँडल पॉवरच्या बल्बमधून वीज सोडली, तर त्यातून ५०० कँडल पॉवरचा प्रकाश बाहेर पडू शकत नाही. तद्वत् साधकाचे शरीर जितके उच्च धारणेचे असेल, तितकेच उच्च अनुभव त्या साधकाला येतील, हे स्पष्ट आहे. त्याकरिता वाईट वाटण्याचे किंवा अविश्वास ठेवण्याचे काहीच कारण नाही. योग्याच्या असामान्य शक्तींचे रहस्य या शास्त्रीय रहस्यात आहे. हे जाणल्यास योगसामर्थ्यासंबंधी गूढ किंवा अनास्था राहणार नाही. योग्याचे शरीर व त्याचा स्वामी जे ‘चित्त’ हे दोन्ही अतिशय साक्षपी व क्षमतावान असते, म्हणूनच योग्याच्या चित्तात सर्व वैज्ञानिक उपकरणांची क्षमता सामावलेली असते. हे सत्य कळल्यास योगमार्गाबद्दल आस्था निश्चितच वाढेल, यात शंका नाही. वैदिक धर्माचा आधार जे योगशास्त्र ते आजही सर्व मानव जातीकरिता खुले आहे, प्रयत्नांची केवळ आवश्यकता आहे.

शास्त्रांचे शास्त्र योगशास्त्र-शक्ती अभ्यास

वैदिक परंपरेत सर्व शास्त्रांचे आधारशास्त्र म्हणून योगशास्त्र असते. याचे मुख्य कारण म्हणजे, सर्व वैदिकशास्त्रे निर्गत अवस्थेतील व्यक्त अवस्था आहेत. आयुर्वेद, ज्योतिष, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, विज्ञान, स्थापत्य, चित्रकला, वास्तुशास्त्र, आकाशगमन, अंतराळज्ञान एवढेच नव्हे, तर व्याकरणासारख्या अत्यंत तांत्रिक भाषाशास्त्राकरिता सुद्धा योगशास्त्राची आवश्यकता आहे. पाणिनीने १२ वर्षांपर्यंत हिमालयात तपश्चर्या केली आणि नंतरच त्याने त्याचा जगद्विख्यात व्याकरण ग्रंथ लिहिला. काव्य गुणाकरिताही योगाची आवश्यकता असते. कालिदासानेही १२ वर्षे तपश्चर्या करून सरस्वतीला प्रसन्न केले होते, असा निर्देश आहे. संत ज्ञानेश्वर एवढे श्रेष्ठ साहित्यिक का? तर ज्ञानेश्वर योगेश्वर होते म्हणून!

(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे ९७०२९३७३५७)
योगिराज हरकरे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121