मुंबई : महाराष्ट्र आणि भारताबाहेरील मराठी माणसांच्या गौरवाची व सांस्कृतिक देवाण घेवाणीसाठी दरवर्षी विश्व मराठी साहित्य संमेलन घेतले जाते. यवर्षे हे संमेलन दि. २६ नोव्हेम्बर रोजी लक्षद्वीप द्वीपकल्पांजवळील एका जहाजावर संपन्न होते आहे. यावर्षीच्या संमेलनाचे हे आकर्षण ठरणार आहे. शिवसंघ प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेले हे दहावे संमेलन आहे. 'भारतीय सागरी सुरक्षा आणि जलवाहतूक' असा या संमेलनाचा विषय ठरवण्यात आलेला आहे. तसेच जेष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे तर राष्ट्रपती पदक, शौर्यचक्र विजेते अजय चिटणीस संमेलनाचे अध्यक्षपद भूषवतील.
गेली नऊ वर्षे भारताबाहेर ही संमेलने होत आहेत. कंबोडिया, बाली, दुबई, मॉरिशिअस, थायलंड अशा अनेक ठिकाणी संपन्न झाली आहेत, परंतु जहाजावर संमेलन घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी गो बं देगलूरकर, विश्राम बेडेकर, विनय सहस्रबुद्धे, डॉ. तात्याराव लहाने यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. नुकतेच या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण पुण्यात निवृत्त एयर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते झाले.
मराठी भाषेचा प्रसार व प्रचार सर्वदूर व्हावा, मातृभूमीपासून दूर जावे लागलेल्या मराठी माणसांच्या पुढील पिढीला आपल्या मातृभाषेचा विसर पडू नये व तिच्यात भर पडून तिने समृद्ध मात्र व्हावे या हेतूने हे संमेलन भरवण्यात येते. तसेच इतर देशातील आपल्या बांधवांशी ओळख व्हावी व त्यायोगे संवाद वाढावा असाही उद्देश या संमेलनामागे असतो.