नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एका भारतीय नागरिकाविरुद्ध अमेरिकेत गुन्हा दाखल करणे चिंताजनक असल्याचे सांगून हे भारताच्या धोरणांच्या विरोधात असल्याचे म्हटल आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत हे संपूर्ण प्रकरण भारत सरकारच्या धोरणाच्या विरोधात असल्याचे सांगितले. अरिंदम बागची म्हणाले की, द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याबाबत अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेने संघटित गुन्हेगार आणि दहशतवादी यांच्यातील संबंधाशी संबंधित काही माहिती भारतास दिली आहे. त्याची भारताने अतिशय गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सर्व बाजू तपासण्यासाठी स्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
त्याचप्रमाणे कथित हत्येचा कटात सहभाग असल्यावरून भारतीय नागरिकावर दाखल झालेल्या गुन्ह्याविषयी भारत गंभीर आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असून हा प्रकार भारताच्या धोरणाच्या विरोधात असल्याचाही पुनरुच्चार बागची यांनी यावेळी केला आहे.