नवी दिल्ली : संघटित गुन्हेगार, सशस्त्र हल्लेखोर आणि दहशतवादी यांच्यातील संबंधाबाबत अमेरिकेने भारतास माहिती दिली असू त्याविरोधात कारवाई करण्यासाठी भारताने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.
गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका सुरक्षेच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. दोन्ही देशांमध्ये परस्परांना सुरक्षेशी संबंधित गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करणे आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर सहकार्य केले जात आहे. अमेरिकेने काही काळापूर्वी दिलेल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या माहितीविषयी परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याबाबत अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेने संघटित गुन्हेगार, सशस्त्र हल्लेखोर, दहशतवादी आणि इतर यांच्यातील संबंधाशी संबंधित काही माहिती सामायिक केली होते. ही माहिती दोन्ही देशांसाठी चिंतेचे कारण असून त्याविषयी आवश्यक पाठपुरावा करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी भारताने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून समितीच्या निष्कर्षांच्या आधारे भारताकडून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही बागची यांनी म्हटले आहे.