कलाक्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणारे, नवनिर्मितीचा ध्यास घेतलेले अवलिया शिरीष पवार यांच्याविषयी...
शिरीष विजय पवार यांचा जन्म मुंबईचा. शिरीष यांचे वडील वित्त विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते, तर आई ही सर्वसामान्य गृहिणी. शिरीष यांचे प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण त्यांनी राजा शिवाजी विद्यालय, दादर येथून पूर्ण केले. त्यानंतर कला शाखेत त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून कनिष्ठ महाविद्यालयीन आणि पदवीचे शिक्षण घेतले. तसेच पदवीच्या शिक्षणानंतर भविष्यात आपण उद्योजक व्हावं, असं शिरीष यांना वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधून ‘एमबीए इन एचआर मॅनेजमेंट’चा कोर्स केला. पण, उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणार्या शिरीष यांच्या नशिबात नियतीने कला क्षेत्रातील उज्ज्वल भविष्याची तरतूद आधीच करून ठेवली होती.
शिरीष पवार यांचा ओढा लहानपणापासूनच गायन आणि नृत्य यांकडे अधिक होता. आज एकीकडे एकत्र कुटुंब पद्धतीचा र्हास होत असताना, शिरीष पवार यांचं संपूर्ण २२ जणांचं कुटुंब एकाच घरात वास्तव्याला आहे. मात्र, कोरोनाचा काळ शिरीष यांच्या कुटुंबीयांसाठी फार कठीण होता. कारण, त्यावेळी घरातील सगळ्यांनाच कोरोनाची लागणी झाली होती. त्यावेळी ही संपूर्ण कुटुंबाची, अशोक पवार आणि वडील विजय पवार यांची साथ शिरीष यांच्यासाठी महत्त्वाची होती. खरंतर शिरीष यांच्यात उपजत गायन कला रुजण्यामागे त्यांचे चुलत आजोबा कवी संजय पवार असल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगतात. त्यामुळे गायनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, फक्त चुलत आजोबा संजय पवार यांच्यामुळेच गायनाची कला शिरीष यांच्यात निर्माण झाली असावी, अशी शिरीष यांच्या कुटुंबाची धारणा.
पण, गायन कलेच्या विकासासाठी शिरीष यांनीही विशेष मेहनत घेतली. आपल्यातल्या गायन कलेचा विकास व्हावा, यासाठी २००४ मध्ये शिरीष यांनी पंडित बी. ए. तुपे यांच्याकडे गायनाचे धडे गिरवले. खरंतर कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असताना, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये गायनात शिरीष यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यामुळे आपण गायनाचे रितसर प्रशिक्षण घेण्याची कल्पना शिरीष यांच्या मनात आली. त्यामुळेच शिरीष पवार हे पंडित बी. ए. तुपे यांच्याकडे गायन कला शिकण्यासाठी जाऊ लागले. मात्र, त्यावेळी जवळ-जवळ एक वर्ष गुरुजींनी त्यांना गायनाचे मार्गदर्शन केलं नव्हतं. मग एकदा शिरीष यांनी हा सगळा प्रकार आपल्या आत्याला सांगितला. तेव्हा शिरीष यांच्या आत्याने गुरुजींना शिरीष यांच्या गायनाच्या आवडीबद्दल जाणीव करून दिली. त्यानंतर मात्र गुरुजींनी शिरीष यांना गायनाचे उत्तम धडे दिले आणि पुढील काही दिवसांतच शिरीष पंडित बी. ए. तुपे यांचे लाडके शिष्य झाले.
त्यादरम्यान झोपडपट्टीमध्ये कलाशिक्षण देण्यासाठी येणार्या ’त्रौलोक्य बौद्ध महासंघा’च्या माध्यमातून शिरीष यांनी रंगमंचावर गायनाला सुरुवात केली. तिथेच ‘त्रौलोक्य बौद्ध महासंघा’च्या माध्यमातून अभिनयाचे बाळकडू शिरीष यांना मिळाले. त्यानंतर प्रशांत लोखंडे या गुरुमित्राकडून सिद्धार्थ महाविद्यालयात शिरीष यांनी अभिनयाचे अनौपचारिक प्रशिक्षण घेतले. त्यावेळी शिरीष यांना वाटणारी भीती आणि न्यूनगंड रंगमंचामुळे नाहीसा झाला. मग विविध एकांकिका स्पर्धांतमध्ये शिरीष सहभागी होऊ लागले. शिरीष यांच्या ’आख्यान तुकाराम भाऊ’ या नाटकाला ’झी नाट्य गौरव पुरस्कार’ मिळाला. तसेच ‘जलसा महाराष्ट्राचा’, ’बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेमध्ये पार्श्वगायक म्हणून शिरीष यांनी काम केले.
दरम्यान शिरीष यांनी विकास सोनताटे, स्वप्नील केदारे यांच्यासह ’अनुसया आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. त्यामुळे आजी अनुसया पवार यांच्या नावावरूनच लहानपणीचे उद्योजक होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून त्यांनी ’आपलं संविधान, आपला आत्मसन्मान’ हा कार्यक्रम सुरू केला. त्या कार्यक्रमाची दखल अनेक वृत्तवाहिन्यांनी घेतली. तसेच या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून त्यांनी चार चित्रपटांचीदेखील निर्मिती केली. आज शिरीष नवी मुंबईत प्रवीण दाभाडे यांच्यासह ’अनुसया आर्ट्स’चा प्रशस्त स्टुडिओ चालवत आहेत. दरम्यान, शिरीष यांनी सुमित्रा भावेंच्या ‘मन की आंखे’ या लघुपटात ही त्यांनी अभिनय केला आहे.
त्याचबरोबर सुमित्रा मावशींच्या ‘दिठी’ चित्रपटात साहाय्यक दिग्दर्शक, अभिनेता आणि पार्श्वगायक म्हणून ही शिरीष पवार यांनी काम केले. त्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून शिरीष यांना पुरस्कार मिळाला आहे. तसेच ’एकच साहेब बाबासाहेब’, ‘कोर्ट’, ‘दीड’, ‘रौद्र’ अशा चित्रपटांत अभिनयदेखील शिरीष यांनी केला आहे. दरम्यान, शिरीष पवार अनेक सामाजिक संस्थांसोबत काम करत असतात. त्यांचा ’भीमस्पंदन’ हा कार्यक्रम ही ते प्रवीण ढोणे यांच्यासह सादर करत असतात. त्यामुळे नवनिर्मितीचा ध्यास घेऊन शिरीष निवेदन, गायन, अभिनय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी करत असतात. अस्मिता वाहिनीला रेडिओ जॉकी म्हणून ही काम करत आहेत. दरम्यान, शिरीष यांचा ’गणगोंधळ’ नावाचा त्यांचा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे, तरी त्यांना पुढील वाटचालीसाठी दै.‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
सुप्रीम मस्कर