बोरिवली 'नॅशनल पार्क'च्या पक्ष्यांच्या यादीत दोन नव्या प्रजातींची भर
29-Nov-2023
Total Views | 156
मुंबई (विशेष प्रतिनिधी): बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या (sgnp bird) पक्ष्यांच्या यादीत दोन प्रजातींची भर पडली आहे. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) उद्यानामध्ये (sgnp bird) केलेल्या पक्षी सर्वेक्षणात दोन नवीन पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. सध्या 'बीएनएचएस'कडून उद्यानामध्ये दिर्घकालीन पक्षी गणनेचे काम सुरू आहे. (sgnp bird)
मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बीएनएचएसकडून पक्षी गणनेचे काम सुरू आहे. गणनेचे हे काम दिर्घकालीन स्वरुपाचे असून प्रत्येक ऋतूमधील पक्ष्यांची नोंद याव्दारे करण्यात येत आहे. याच गणनेमधून आता उद्यानाच्या पक्ष्यांच्या यादीमध्ये दोन नव्या प्रजातींची भर पडली आहे. उद्यानातील स्थानिक पक्ष्यांच्या यादीमध्ये लाँग-बिल्ड पिपिट आणि व्हेरिएबल व्हीटियर या दोन पक्ष्यांची नव्याने नोंद करण्यात आली आहे. उद्यानातील पक्ष्यांची गणना रविवार दि. २६ नोव्हेंबर रोजी पुर्ण झाली असून ५० समर्पित स्वयंसेवकांच्या मदतीने ७४ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये दर महिन्याला होणाऱ्या पक्षी गणनेमध्ये हे समोर आले आहे. व्हेरिएबल व्हीटियरचा फोटो अश्विन मोहन आणि टीमने (व्हायरल मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालील) फसाचा पाणी ट्रेल (राष्ट्रीय उद्यानाचा सर्वोच्च बिंदू) येथे काढण्यात आला. तर, गोपी तन्ना यांनी शुभंकर गोखले यांच्या नेतृत्त्वाखाली जांभूळ माळ ट्रेलमध्ये लाँग-बिल्ड पिपिट या पक्ष्याचे छायाचित्रण केले होते.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात नोंदवलेल्या २२५ पक्षी प्रजातींच्या यादीत हे दोन पक्षी आता समाविष्ट झाले आहेत. यानिमित्ताने अभयारण्यांचा पर्यावरणीय वारसा अधिकच समृद्ध झाला आहे. 'बीएनएचएस'चे डॉ. आसिफ खान आणि डॉ. राजू कसांबे यांनी या पक्षी गणनेत समन्वयाचे काम केले असून मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले आणि उद्यानाच्या इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले आहे.